‘‘खरे सांगू, मी देवकी होऊ शकत नव्हते. म्हणून मी यशोदा व्हायचे ठरवले आणि घरात गोकुळ थाटले,’’ डोळ्यातून झिरपणाऱ्या गंगा-यमुनांना हाताने बांध घालत वैशाली पेठे यांनी मन मोकळे केले.

नुकतीच लुईसवाडीतील त्यांच्या पाळणाघराने ९० मुलांच्या बाललीला अनुभवत  पंचविशी ओलांडली आहे. सुरुवातीला वैशालीताई नोकरी करीत होत्या; परंतु प्रवीण ठोंबरे त्यांच्या जीवनात आला आणि त्यांच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. नोकरीसाठी मुंबईत आलेला उच्चशिक्षित प्रवीण, वैशालीताईंच्या शेजारी भाडय़ाने राहायला आला. वैशालीताईंच्या लाघवी स्वभावामुळे पटकन ओळख झाली. एकदा प्रवीण सहज घरी आला असताना, वसंतरावांच्या, वैशालीताईंच्या यजमानांच्या, पंक्तीला जेवायला बसण्याचा वैशालीताईंनी त्याला आग्रह केला, तेही नैवेद्याचे पान ठेवून. खूप वर्षांत असे घरचे कौतुक अनुभवायला न मिळाल्यामुळे प्रवीणचे डोळे भरून आले. वैशालीताईही आतून हेलावल्या. प्रवीणला स्वत:चा मुलगा समजून त्याच्या पोटपूजेची त्या काळजी घेऊ लागल्या. प्रवीणपाठोपाठ त्याचा धाकटा भाऊ प्रसन्नही मुंबईत, नव्हे वैशालीताईंकडे दाखल झाला. या दोन ‘मोठय़ा बाळांची’ काळजी घेताना मनाला आत कुठे तरी समाधान, आनंद, तृप्ती वाटत होती. एक विचार मनात चमकून गेला. नोकरीपेक्षा लहान बाळांना सांभाळले तर.. प्रत्यक्ष लहानग्याला मोठे होताना बघण्याचे सुख अनुभवता येईल. त्याला खेळवता येईल, त्याच्या निरागस हास्यात, बाललीलांत रंगून जाता येईल. ‘जे हवे होते ते’ मिळवता येईल. दिलदार स्वभावाच्या वसंतरावांनाही प्रेमाची भूक होतीच. त्यांना हे वळण भावले आणि वैशालीताईंचे म्हणजे पेठे काकूंचे पाळणाघर १९८९ साली सुरू झाले.

एक बाळ तीन महिन्यांचे आणि बाकी तीन जरा मोठी अशी चार जण शिस्तीच्या, नियमांच्या चौकटीत त्यांच्या घरात किलबिलू लागली. पहिले चार दिवस जरा किरकिरणारे मूल आठ दिवसांत आईला ‘तू जा’ म्हणून सांगू लागते. नवीन येणाऱ्या प्रत्येकाला पहिले १५ दिवस त्या घरात वावरण्याचे, स्वच्छतेचे धडे देतात. प्रत्येकाच्या जेवणाकडे जातीने लक्ष देत, लहानग्यांना भरवत, आग्रह करत काकू मुलांबरोबर गोल करून बसतात. काकूंच्या गरमागरम वरणभातावर मुले तुटून पडतात. थोडीशी झोप झाल्यावर शाळेत जाणारी मुले अभ्यासाला बसतात. एकमेकांच्या नादाने अभ्यासही चांगला होतो. जणू स्कॉलर मुलांचेच हे पाळणाघर आहे. काकूंनी दहा पाटय़ाही ठेवल्या आहेत. लिंबूटिंबूंच्या रेघोटय़ांनी त्या भरत राहतात. दूरचित्रवाणीला मात्र कुलूप. फक्त मे महिन्यात दोन तासांसाठी ते काढले जाते. आजमितीस दहा मुले असली तरी मोठी झालेली सगळी मुले सतत संपर्कात असतात. हक्काने वरणभात खायला येतात.

मुलांना माहिती व्हावी म्हणून ‘सुगरण’ काकू प्रत्येक सणाचं वैशिष्टय़पूर्ण पक्वान्न सर्व मुलांसाठी करतात. नवरात्रात तर कुमारिकांचे लाड म्हणून रोज वेगळा त्यांच्या आवडीचा गोड खाऊ. दिवाळीलाही मुलांसाठी दोन-तीन प्रकार त्या आवर्जून करतात. सुरुवातीची दहा-बारा वर्षे तर काकू प्रत्येकाच्या वाढदिवसालाही वीस रुपये प्रत्येकी गोळा करून एकूण जमलेल्या रकमेच्या दुप्पट स्वत:चे पैसे घालून एक ग्रॅम सोने प्रत्येकाला द्यायच्या. त्यांच्या पाळणाघरातल्या काही जणांकडे सात-आठ वळी जमलेली आहेत.

काकूंनी माणसे खूप जोडली आहेत. आपण होऊन त्या पालकांना मदत करतात. एकेकटय़ा मुलांना या संस्कारघरात चांगल्या मित्रमैत्रिणी मिळाल्या आहेत. काकू मुलांना, त्यांच्या पालकांना, अगदी त्यांच्या आजी-आजोबांनासुद्धा खर्डीला, मॉलमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी पिकनिकला घेऊन जातात. त्यामुले पालकांमध्येही आपापसांत मैत्रीच्या रेशीमगाठी मारल्या जाऊन नात्यांचा घट्ट गोफ विणला गेला आहे. मुलांच्या आयांचे तर हे माहेर आहे. काकूंशी बोलल्याशिवाय, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय, त्यांच्या पाककौशल्याची चव घेतल्याशिवाय, त्यांच्या घरी जरा विसावल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही.

सौरभ, सचिन, प्रवीण, प्रसन्न हे संसार थाटल्यानंतरही आपल्या या ‘आईबाबांना’ विसरले नाहीत. प्रसन्नने स्वखर्चाने आग्रहाने दोघांना सिंगापूरला नेले. काकू पाळणाघर चालवत असल्याने त्यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारला गेला. त्यामुळे अमेरिकेला त्याच्याकडे जाता आले नाही. काकूंच्या जीवनातील ‘वसंत’ हरपल्यानंतरही काकू ही आपली जबाबदारी आहे याचे भान या मुलांनी राखले आहे. काकूंना याचा अभिमान वाटतो. काकूंनीही पाळणाघरातील प्रत्येक मुलीच्या लग्नात भेट देण्यासाठी अंगठीची तजवीज केली आहे. काकूंनी या नात्यात पैशाला गौण लेखले. मुलांवर पोटच्या मुलांसारखी माया केली. प्रेम केले. त्यांना आपले मानले. सुखाची वाट सोधली. ‘हरवले ते गवसले’ हाच त्यांचा आनंद.

खरे तर लुईसवाडीतील पालकच सुदैवी. मुलांसाठी जीव टाकणाऱ्या, प्रत्येकाची काळजी घेत खाऊपिऊ घालणाऱ्या, उत्तम संस्कार करणाऱ्या, काकूंचे घर हे मुलांसाठी आवडते सेकंड होम झाले. त्यामुळे पालक निर्धास्तपणे नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकतात. मुलांना सांभाळण्याचा सामाजिक प्रश्न काकूंमुळे उत्तमरीत्या सोडवला जातो. मागच्या वर्षी महिला दिनाचे औचित्य साधून विद्युल्लत्ता वुमन पॉवर २०१४, फोटो सर्कल सोसायटीतर्फे कलाभवन येथे म. पा. आयुक्तांतर्फे काकूंचा सत्कार करण्यात आला. हे सगळे सांगताना काकूंची अवस्था मात्र ‘स्नान करिती लोचने, अश्रूंनी पुन्हा पुन्हा’ अशी होते.