नाटय़क्षेत्रात उमेदवारी करू पाहणाऱ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून चार वर्षांपूर्वी जिजाऊ उद्यानात आचार्य अत्रे कट्टय़ाच्या जोडीनेच सुरू झालेल्या अभिनय कट्टय़ाने आता चांगलेच बाळसे धरले आहे. या कट्टय़ावर आतापर्यंत शेकडो एकांकिका, नाटके सादर झाली. ठाणे परिसरातील रंगकर्मीचे कट्टा हे एक प्रमुख केंद्र बनले. कट्टा चळवळीतील कार्यकर्त्यांचा सहभाग असलेला ‘सिंड्रेला’ हा सिनेमा ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने या नाटय़ चळवळीचा घेतलेला आढावा..
कट्टा म्हणजे चारचौघात रंगलेल्या बेसुमार गप्पा, पण कट्टय़ाची ही व्याख्या बदलायला भाग पडणारा असा अभिनय कट्टा. एक चळवळ म्हणून सुरू केलेल्या या कलेच्या बीजांकुराचा आता वटवृक्ष झाला आहे. किरण नाकती आणि सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे ही चळवळ उभी राहिली आहे. नाटय़ व चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असताना, एक नवोदित कलावंत म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करीत असताना, येणारी सारी आव्हाने पेलत मालिका, चित्रपट, आणि पडद्याआड कार्यभार सांभाळत एक यशस्वी व्यक्तिमत्त्व साकारले. पण ‘कुठे तरी या प्रवासाला किमान दुसऱ्यांसाठी सुकर करता आले तर..’ या प्रयत्नातून २७ फेब्रुवारी २०११ रोजी ‘अभिनय कट्टा’ जन्माला आला.
दर रविवार न चुकता कलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ आणि रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम कलाविष्काराची मेजवानी सादर करीत पाच हजार ९०० हूनही जास्त पात्रे रंगवत, २३५ कट्टय़ांचा विक्रम या अभिनय कट्टय़ाने केला. कलाकारांची पंढरी, मूल्यांना व संस्कृतीला जपत फक्त कलाकार नव्हे तर माणूस घडवणारी संस्था, अशी ओळख अभिनय कट्टय़ाने निर्माण केली. अवघ्या पाच वर्षांत नाटय़ क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचलेला कट्टा आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अभिनय कट्टय़ा’चे कलावंत फक्त थिएटर आर्टिस्ट न राहता सिने आर्टिस्ट बनणार आहेत. कारण अभिनय कट्टा व कृपासिंधू पिक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या ‘सिंड्रेला’ या आगामी सिनेमात जास्तीत जास्त कलाकार हे अभिनय कट्टय़ाचे आहेत. या वेळी कट्टय़ाचे विद्यार्थी फक्त पडद्यावरील कलाकार म्हणूनच नव्हे तर पडद्यामागेही यशस्वी भूमिका सांभाळताना दिसतील.
‘सिंड्रेला’ या वैशिष्टय़पूर्ण सिनेमाचे शिल्पकार हे किरण नाकती आहेत. हा सिनेमा फक्त अभिनय कट्टय़ालाच नवी ओळख देणार नसून, कट्टय़ाचे लाडके संचालक, गुरू व सूत्रधार किरण नाकती यांच्या व्यक्तित्वाचेही नवे पैलू समोर घेऊन येत आहे. कारण ही सिनेमाची कथा, पटकथा व दिग्दर्शक या तिन्ही भूमिका त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने निभावल्या आहेत. ‘सिंड्रेला’ या नावातच या सिनेमाचे वेगळेपण दडलेले आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेता मंगेश देसाईने या सिनेमात एक उत्तम व्यक्तिरेखा साकारली असून एका वेगळ्या भूमिकेतून विनीत भोंडेच्या अभिनयाची जादूही आपल्याला पाहायला मिळणार आहे.
याकूब सईद व जनार्दन परब यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध कॅमेरामन राजा फडतरे यांच्या नजरेतून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून येत्या ४ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सिंड्रेला या चित्रपटाला अमेरिकेतील साऊन करोलिना अंडरग्राऊंड फिल्म फेस्टिवल (स्कफ फेस्टिवल) मध्ये उत्कृष्ट चित्रपट, किरण नाकती यांना चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी तर रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर यांना अभिनयासाठी नामांकन जाहीर झाले होते. त्याचप्रमाणे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील इंडिफेस्टमध्ये स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्डअंतर्गत किरण नाकते यांना चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आणि सिंड्रेला चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासाठी गौरविण्यात आले आहे.

विविध कलाकारांची भेटकट्टय़ावरील वाढत्या लोकप्रतिसादामुळे अनेक नव्या चित्रपटांचे प्रमोशन कट्टय़ावर केले जाऊ लागले. चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने मान्यवर अभिनेत्यांनी कट्टेकऱ्यांशी संवाद साधला. ‘एकुलती एक..’ च्या निमित्ताने सचिन पिळगावकर ,‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा..’ च्या निमित्ताने मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे, ‘बीपी’ व ‘टाइमपास’च्या निमित्ताने रवी जाधव, ‘टपाल’च्या निमित्ताने नंदू माधव व वीणा जामकर, ‘तेंडुलकर आऊट’च्या निमित्ताने अनिकेत विश्वासराव व संतोष जुवेकर या कलाकारांनी आत्तापर्यंत कट्टय़ाला भेट दिली आहे. कट्टय़ाची वाढती लोकप्रियता पाहता कट्टय़ाच्या सदस्यसंख्येत वाढ होत गेली. नवोदित, होतकरू आणि गुणवान कलाकार अभिनय क्षेत्राबद्दलच्या चुकीच्या समजुतीमुळे भरकटू नयेत यासाठी कट्टा नेहमीच प्रयत्नशील असतो. अभिनय क्षेत्र म्हणजे ग्लॅमर व स्वैर वागणूक नसून संस्कार व संस्कृती जपत निष्ठेने काम करणे होय. ही बाब कलाकारांच्या मनावर बिंबवण्यासाठी कट्टय़ात प्रतिज्ञापत्र संकल्पना सुरू करण्यात आली. कट्टय़ाच्या सदस्य कलाकारांनी फक्त कट्टय़ावरच नव्हे तर कट्टय़ातर्फे कुठल्याही रंगमंचावर काम करताना अमलात आणल्या जाणाऱ्या वर्तवणुकीची नियमावली प्रतिज्ञापत्रात दिली आहे. केवळ उत्तम कलाकार म्हणून घडण्यासाठीच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आधी उत्तम व्यक्ती म्हणून घडणे गरजेचे असते. त्यामुळे फक्त अभिनय क्षेत्रासाठीच नव्हे तर संपूर्ण आयुष्यासाठीच हे प्रतिज्ञापत्र महत्त्वाचे आहे. कट्टय़ाच्या कलाकारांना व्यावसायिक मंचावर काम करण्याचा व त्या वातावरणाचा अनुभव मिळावा म्हणून ‘आम्ही रंगकर्मी’ हा उपक्रम अभिनय कट्टय़ातर्फे सुरू करण्यात आला. या माध्यमातून ‘वेटिंग फॉर गोदो’सारखी गाजलेली कलाकृती तसेच ‘बाप गेला रे बाप गेला’, ‘आयला गेम चुकला’, वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नाटक बसते आहे’ या धमाल विनोदी एकांकिका, उत्सव लावण्यांचा, काव्यधारासारखे वैविध्यपूर्ण कार्यक्रम रसिकांसमोर आणले गेले. याच शृंखलेमध्ये ‘बायोस्कोप’ या चित्रपटातील कलाकार परिसंवादाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आले.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

नाटकांची मालिका
२०१३-१४ या वर्षांत कट्टय़ावर ‘तुका म्हणे अवघे सोंग’, ‘अनोळखी’, ‘पुरुषाथ’, ‘प्रश्नचिन्ह’, ‘वोह सात दिन’, ‘रमाच्या मित्राची गोष्ट’, ‘सजा-ए-मौत’, ‘शासन-परशासन’, ‘त्या भिंती पलीकडे’, ‘विट्नेस ऑफ लव्ह’, ‘अनास्थेशिया’, ‘तरुण्याच्या उंबरठय़ावर’, ‘रावणाचा वनवास’ ,‘वस्त्रहरण होत आहे’, ‘कमिटमेंट’, ‘वेटिंग फॉर गोदो’ अशा विविध एकांकिका सादर करण्यात आल्या. त्याचबरोबर ‘पोलिटिक्स ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट’, ‘टिक टिक’, ‘भिखमंगे’, ‘अकबर बिरबल’, ‘पप्पू पास हो गया’ अशी द्विपात्री व एकपात्री कलाकृतींचेही सादरीकरण कट्टय़ाच्या कलाकारांच्या वतीने करण्यात आले आहे. कट्टय़ावरील कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवरील अनेक दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन आणि शुभेच्छाही मिळाल्या. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, अविनाश व ऐश्वर्या नारकर या कलाकारांनी कट्टय़ाला शुभेच्छा दिल्या व मुलाखतीतून कलाकारांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ लेखक आनंद म्हसवेकरांनी कट्टय़ावर येऊन रसिक प्रेक्षक व कलाकारांशी संवाद साधला. एकीकडे कट्टय़ाचा प्रवास सुरू असताना दुसरीकडे आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून कट्टय़ाच्या कलाकारांच्या सहभागातून विविध सामाजिक समस्यांवर पथनाटय़े सादर करण्यात आली. व्यसनमुक्ती, बचतगट, हुंडाबळी, रेल्वे सुरक्षा, नौपाडा पोलिसांच्या मदतीसाठी केलेले पथनाटय़ या कट्टय़ाच्या कलाकृतींचा विशेष गौरव झाला.

– समीर पाटणकर