दक्षिणेकडील खाद्यपदार्थ मुंबई-ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीत इतके रूजले आहेत की, त्यांना वेगळं करणं अशक्य आहे. इडली, डोसा, मेदुवडा या पदार्थाशिवाय अनेकांची सकाळची न्याहरी पूर्ण होत नाही. दुधात साखर विरघळावी इतक्या सहजपणे दाक्षिणात्य खाद्य पदार्थानी महाराष्ट्रीय आहारात स्थान मिळविले आहे. अलीकडे तर डोशाचे इतके प्रकार निघाले आहेत की, त्यांची नावेच जिभेवर पाणी आणतात. अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण डोशांची मेजवानी देणारे एक कॉर्नर ठाण्यामध्ये लोकप्रिय ठरले आहे. त्याचे नाव आहे ‘डोसा प्लाझा’. याठिकाणी तब्बल १०४  प्रकारचे डोसे चाखायला मिळतात आणि प्रत्येकाची चव वेगळी असते, हे सांगायला नकोच!

इडली, डोसा, मेदुवडा या दक्षिणात्य पदार्थाची पाश्चात्य पदार्थाशी सांगड घालून केलेले डोसा, उत्थापा, इडली हे डोसा प्लाझाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. रश्मी शेट्टी आणि रेवती वायकुळे यांनी नव्या पिढीतील खवैय्यांची आवड लक्षात घेऊन नवनवे डोशे उपलब्ध करून दिले आहेत.

येथे विविध प्रकारचे तब्बल १०४ डोसे मिळतात. त्यात पेपर डोसा, मसाला, डोसा, म्हैसुर डोसा, रवा डोसा अशा नेहमीच्या डोशांबरोबरच चीझ ओनियन मसाला डोसा, म्हैसूर मसाला डोसा विथ चीज असे विविध प्रकार मिळतात. कुणाला जर फ्रँन्कीसारखाच परंतु पारंपारिक भाज्यांचे मिश्रण असलेला डोसा चाखायचा असेल तर त्यांच्यासाठी महाराजा मसाला डोसा, हरभरा मसाला डोसा, नवरत्न मसाला डोसा असे डोशांचे विविध प्रकार चाखायला मिळू  शकतात.

हल्ली प्रत्येक गोष्टींमध्ये फ्युजन (सरमिसळ)करण्यात येते. त्याची सुरुवात मात्र खाद्यपदार्थापासून होते. भारतीय खाद्यपदार्थाना पाश्चिमात्य चवीचे बनविणे किंवा त्या उलट पाश्चिमात्य खाद्य पदार्थाना भारतीय जिन्नसांचा वापर करुन पारंपारिक चव देणे असे विविध प्रयोग सर्वत्र होत असतात. डोशांमध्ये अशा प्रकारचे अनेक प्रयोग झाले आहेत. डोसा प्लाझामध्ये विविध प्रयोग करुन चमचमीत असे फ्युजन डोश्यांचा अविष्कार खास खवय्यांसाठी उपलब्ध करुन दिला आहे.

फ्यूजन डोश्यांमध्ये गार्लिक रोस्ट डोसा, ओनियन सदा डोसा, प्रेम डोसा तसेच चायनीज प्रेमींसाठी चायनीज डिलाईट डोसा, पनीर स्प्रिंग रोल डोसा आदी पाहताक्षणीच जिभेला पाणी आणणारे प्रकार येथे उपलब्ध आहेत. चायनीज व फ्युजन डोसे म्हणजे डोसा रसिकांसाठी मेजवानीच ठरले आहेत. येथील डोशांत सॅलेडचा वापर केला जातो. त्यामध्ये  सॅलेड रोस्ट डोसा, पनीर सॅलेड डोसा, मक्सिकन रोस्ट  डोसा, रेड चिली डोसा, साल्सा डोसा, सीझ-ली नुडल्स डोसा असे सॅलेड घालून केलेले डोसे व त्याचबरोबर मक्सिकन व अमेरिकन पद्धतीच्या भाज्या असलेले डोसे खवैय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

‘डोसा प्लाझा’ मध्ये सर्वच नाविन्यपूर्ण आणि चटपटीत आहे. मात्र त्यातही अमेरिकन डिलाईट डोसा अगदी खास. मायोनीज, सिमला मिरची, मिक्स भाज्या, आल्याचे छोटे  तुकडे, लसुन, मिरची, पनीर, पांढरी मिरी असे सर्व पदार्थ एकत्रित करून हा डोसा तयार केला जातो. येथे डोश्याबरोबरच आपल्याला दक्षिण भारतातील पारंपारिक सांबर भात, रस्सम भात, टेमारेंड राइस, लेमन राइस, चेत्तीनाद राइस असे भाताचे विवध प्रकारसुद्धा मिळतात. संपूर्ण दाक्षिणात्य भोजनाची परिपूर्ण मेजवानी येथे खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दाक्षिणात्य चव चाखल्यावर कोल्ड कॉफी, कॅफे मोक्का, कोल स्काय, आयरिश र्बेी अशी काही फ्युजन पेयसुद्धा येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य आणि पाश्चिमात्य  पदार्थाची फ्यूजन चव चाखण्यासाठी हल्ली रसिक खवैय्यांची पाऊले डोसा प्लाझाकडे वळतात.

पत्ता- डोसा प्लाझा, शॉप.नं-५, राम जानकी निवास, घंटाळी मंदिराजवळ, ठाणे(प.)

वेळ- दररोज सकाळी ९ ते ११