नाटय़ अभिनेत्री आणि नृत्यांगना कविता कोळी यांची ओळख सांगायची तर ‘सणांच्या गं माहेरी’ या रंगभूमीवर सादर होत असलेल्या गाजलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अशी करून द्यावी लागेल. २० वर्षांपासून ठाणेकर झालेल्या कविता कोळी मूळच्या परळच्या असून किशू पाल, चंद्रकांत हडकर आणि डॉ. मंजिरी देव अशा तीन नृत्यगुरूंकडे त्यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. कृती कला प्रतिष्ठान या संस्थेमार्फत कविता कोळी ठाण्यात नृत्य प्रशिक्षण देतात. ‘डॉ. तुम्हीसुद्धा’ या नाटकाबरोबरच अनेक एकांकिका,नृत्य नाटिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.

आवडते मराठी चित्रपट – ‘नटरंग’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘कटय़ार काळजात घुसली’

आवडते हिंदी चित्रपट – ‘दिल चाहता है’, ‘थ्री इडियट्स’

आवडती नाटकं – ‘वस्त्रहरण’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘गांधी विरुद्ध गांधी’

आवडते अभिनेते – हृतिक रोशन, आमीर खान, अमिताभ

आवडत्या अभिनेत्री – माधुरी दीक्षित, ऐश्वर्या रॉय

आवडते दिग्दर्शक – रवि जाधव, परेश मोकाशी, चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकर</p>

आवडते लेखक  व नाटककार –  पु. ल. देशपांडे, अजित दळवी, प्रशांत दळवी, विजय तेंडुलकर

आवडते खाद्यपदार्थ – तळलेले बोंबिल, तळलेला पापलेट

आवडते फूडजॉईण्ट –  ‘गजानन वडापाव’, ‘मामलेदार मिसळ’

आवडतं हॉटेल – मखमली तलावाजवळचे ‘सत्कार’

ठाण्याविषयी थोडेसे : लग्नानंतर परळहून ठाण्यात राहायले आले तेव्हापासून ठाण्याव्यतिरिक्त दुसरीकडे कायमचे राहायला जाण्याचा विचारच मनात येत नाही. याचे कारण ठाणे शहराला लाभलेले उत्कृष्ट सांस्कृतिक वातावरण. ठाण्याचे वैशिष्टय़ म्हणजे चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, अभिनय अशा सर्व कलांमधील अनेक कलावंत इथे राहतात. अन्यही विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळी इथे राहतात.

गडकरी रंगायतनमध्ये अनेक वर्षांपासून प्रयोग आणि तालमी सातत्याने मी केल्या आहेत.  ठाण्यात आल्यानंतर गडकरी रंगायतन या वास्तूशी निगडित अनेकविध कार्यक्रमांच्या तालमी आणि तिथे रंगलेले प्रयोग याविषयीच्या खूप आठवणी आहेत. आजही आमच्या नृत्याविष्काराच्या तालमी तसेच नृत्याचे वर्ग आम्ही तिथे करतो. त्या अर्थाने गडकरी रंगायतन हे माझे जणू माहेरच म्हणता येईल.

किस्सा

‘सणांच्या गं माहेरी’ या रंगभूमीवरील कार्यक्रमाचे दीडशेहून अधिक प्रयोग मुंबई परिसरातील नाटय़गृहांबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी आम्ही केले आहेत. पती रमेश कोळी यांचे दिग्दर्शन असलेल्या या कार्यक्रमाचे प्रयोग करताना रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. कोल्हापूरमध्ये प्रयोग झाल्यानंतर एक सर्वसामान्य महिला भेटायला आली. त्यांनी कार्यक्रमाचे कौतुक करण्याबरोबरच आम्हाला १०० रुपयाची नोट काढून दिली. आपण एवढेच करू शकतो, असे मायेने हात फिरवून सांगताना त्या बाईंचे डोळे पाणावले होते. आपण चांगले काही करत आहोत यासाठी मिळालेली पोचपावती मला कायमची स्मरणात राहिली आहे.