सुसज्ज जॉगिंग ट्रॅक, चहूबाजूंनी झाडांची हिरवळ, बसण्यासाठी बाकडे.. या सुविधा आहेत डोंबिवली पूर्वेतील पुसाळकर उद्यानात. सोयीसुविधांनी हे उद्यान सुसज्ज असल्याने सकाळ-संध्याकाळ पाय मोकळे करण्यासाठी या उद्यानात आबालवृद्धांची गर्दी असते. सध्या थंडीचे दिवस सुरू असल्याने तरुण मंडळीही सकाळी मोकळ्या हवेत जॉगिंग करण्यासाठी येथे येतात. चहूबाजूंनी झाडांची दाटी असल्याने या निसर्गरम्य वातावरणात यायला प्रत्येकालाच आवडते, म्हणून पाय मोकळे करण्यासाठी परिसरातील रहिवासी या उद्यानाचा पुरेपूर उपयोग करतात.

दिनक्रम सुरू होण्यापूर्वी पहाटेच्या वेळेत शहरातील मोकळ्या जागांवर शतपावली, योगासने, सायकल चालविणे, धावणे असे प्रकार करण्याकडे अनेकांचा कल असतो. डोंबिवली पूर्व भागातील टंडन रोडवरील कै. विजय वामन पुसाळकर उद्यान हे रामनगर, दत्तनगर आदी परिसरांतील रहिवाशांना मध्यवर्ती ठिकाणी आहे. यामुळे या भागातील नागरिकांची या उद्यानात सकाळ-संध्याकाळ गर्दी पाहायला मिळते. कल्याण-डोंबिवली महापालिकेने नुकतेच ५४ लाख रुपये खर्च करून या उद्यानाचे सुशोभीकरण केले आहे. नागरिकांना चालण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. उद्यानाच्या मध्यवर्ती भागात वेगवेगळे भाग तयार करून त्याच्या मध्यभागी शोभेची व फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांच्या बाजूला केलेल्या पारावर बसून अनेक नागरिक बैठे व्यायाम करताना दिसतात. उद्यानातील काही भाग हा मोकळा ठेवण्यात आला असून येथे खेळाडू बॅडमिंटन, क्रिकेट असे खेळ खेळतात.

घराजवळच उद्यान विकसित झाल्याने परिसरातील रहिवासी समाधानी आहेत. मात्र उद्यानात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रेमीयुगुले झाडांच्या आडोशाला येऊन बसतात. त्यांच्या विचकट चाळ्यांमुळे उद्यानात फिरणे अवघड होते, तसेच रात्रीच्या वेळेत येथे मेजवान्या, पाटर्य़ा होतात. तो सगळा कचरा येथे नियमित पडून असतो. काही महिला उद्यानात संध्याकाळी भाजी निवडतात आणि त्याचा कचरा येथेच टाकून जातात, मुलांसाठी आणलेली खाऊची पाकिटेही पडलेली असतात. उद्यानाच्या बाहेर उजव्या दिशेला काही नागरिक कचरा टाकत होते, परंतु एका खासगी संस्थेने येथे बाग उभारल्याने आता नागरिकांनी बागेच्या बाजूला असलेल्या गटाराकडे आपला मोर्चा वळविला असून त्या गटारात मोठय़ा प्रमाणात कचरा साचला असल्याची तक्रार येथील नागरिक करतात.

उद्यानाच्या एका बाजूला सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. काही नागरिकांनी येथे स्वच्छतागृह उभारणीसाठी सुरुवातीला विरोध केला होता, परंतु तरीही पालिकेने येथे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारलेच. केवळ स्वच्छतागृह उभारले, तेथे पाण्याची सोय मात्र नाही. आजूबाजूच्या वस्तीतील नागरिक येथे प्रातर्विधीसाठी येतात, परंतु ते स्वच्छ राखले जात नसल्याने दिवसभर या स्वच्छतागृहाच्या दरुगधीचा सामना उद्यानात येणाऱ्या नागरिकांना करावा लागतो. महापालिकेचे हे उद्यान असल्याने येथे सुरक्षारक्षक तैनात करा ही रहिवाशांची मागणी आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

गीतापठण, पुस्तक वाचन

आरती दांडेकर, सुनीता काळे व रोहिणी बेंद्रे या महिला येथे सकाळच्या वेळी व्यायाम झाल्यानंतर गीतापठण करतात. संध्याकाळी काही महिला व मुलांचा ग्रुप येथे पुस्तक वाचन करतो. काही महाविद्यालयीन विद्यार्थी सकाळच्या शांततेत येथे अभ्यास करतानाही दिसतात. बागेमध्ये दोन छोटे कलादालन तयार करण्यात येत आहे. या कलादालनामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे लावण्यात येणार आहेत.

नागरिकांच्या मागण्या

  • बागेमधील अनेक विजेचे खांब नादुरुस्त आहेत, त्याची दुरुस्ती करण्यात यावी.
  • बागेमध्ये प्रवेश करण्यासाठी वेळ ठरवून द्यावी. सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात यावी
  • बागेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी उपलब्ध करून द्यावी.
  • नागरिकांना व्यायाम करण्यासाठी काही साधने उपलब्ध करून द्यावीत.
  • सार्वजनिक कार्यक्रमांचा एखादा फलक व एखादे वृत्तपत्र वाचनालय येथे उभारावे.

गेली पाच ते सहा वर्षे येथे मी सकाळी चालण्यासाठी येते. येथे आल्यानंतर आमच्या मैत्रिणींचा एक गटही तयार झाला आहे. सकाळी आल्यावर दहा-बारा फेऱ्या मारल्यानंतर योगासनांचे काही प्रकार करतो. दिवाळीची पहिली पहाट आम्ही या उद्यानात साजरी केली असून आता नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठीही आम्ही काही बेत आखत आहोत.  – माधुरी मडके

उद्यानातील मोकळ्या जागेत एखादे अ‍ॅम्पी थिएटर उभारले तर अनेक हौशी कलाकारांना तालीम करण्यासाठी एक जागा उपलब्ध होईल.  – दीपाली काळे

बागेचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आल्याने ती सुंदर दिसत आहे. परंतु याची योग्य ती देखभाल ठेवली गेली पाहिजे. बागेतील झाडांना वेळच्या वेळी पाणी देणे गरजेचे आहे.  – संदीप जैन

पुसाळकर उद्यानाची आधी फार दुरवस्था होती, परंतु पालिकेने या उद्यानाचे सुशोभीकरण केल्याने अनेक समस्या कमी झाल्या आहेत. परंतु लहान मुलांसाठी असलेली खेळणी आता या उद्यानात नाही. बागेतील झाडांची निगा येथे येणारे नागरिकच राखतात, त्यासाठी एखाद्या माळ्याची तसेच बागेसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात यावी.   – शंकर कुलकर्णी