अभिनेत्री गिरिजा जोशी हे नाव नवोदित कलावंतांच्या यादीतील असले तरी ‘प्रियतमा’, ‘गोविंदा’, अगदी अलीकडेच झळकलेला ‘देऊळबंद’ अशा मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका गिरिजाने साकारल्या आहेत. रुईया महाविद्यालयात शिकत असताना तिने ‘तीच ती दिवाळी’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले. शाळेत असताना एकांकिका स्पर्धामध्ये तर सहभाग घेतला आहेच, त्याचबरोबर ‘वाजलाच पाहिजे गेम की शिणमा’ या चित्रपटातूनही तिने प्रमुख भूमिका केली आहे. मात्र गिरिजाची ओळख एवढय़ापुरतीच मर्यादित नाही. तिने सायकॉलॉजी विषयात शिक्षण घेतले आहे.  गेल्या काही वर्षांपासून जपानी मार्शल आर्ट शिकतेय. प्रवीण तरडे दिग्दर्शित आगामी चित्रपटाबरोबरच अभिराम भडकमकर दिग्दर्शित आगामी विनोदी चित्रपटातही गिरिजा प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. सध्या आपला ‘फोकस’ फक्त चित्रपटांमध्ये काम करण्यावरच आहे, असे सांगताना चांगले नाटक आणि भूमिका मिळाली तर काम करायलाही नक्कीच आवडेल, असे ती म्हणाली.

*ठाण्याविषयी थोडेसे– शालेय शिक्षण पनवेल आणि पुणे येथे झाले आहे. पनवेलला आमचे कुटुंब राहायचे; परंतु १२ वर्षांपूर्वी आम्ही ठाण्याला राहायला आलो. मुंबई मला  फारशी आवडत नाही आणि ठाण्यात मराठीपण आजही जपलेले आहे. म्हणूनच आम्ही ठाण्यात राहायला येणे पसंत केले. घोडबंदर मार्गावरील कासारवडवली येथे मी  राहते. ठाण्याचा प्रेक्षक आणि पुण्याचा प्रेक्षक यांच्यात साम्य आहे असे मला नेहमी वाटते. कारण ठाण्याचा प्रेक्षक हा चोखंदळ आहे, दर्दी आहे, नाटकाला उत्तम दाद  देणारा आहे. गडकरी रंगायतन हे मराठी नाटकांचे केंद्र आहे. गडकरी रंगायतनला प्रयोग रंगतो तसा अन्यत्र कुठे रंगत नाही हे अनेक कलावंतांसारखेच माझेही मत आहे.  बारा वर्षांपूर्वी वास्तव्यास आले असले तरी मी आता पक्की ठाणेकर आहे असे नक्कीच म्हणता येईल. आता तर गडकरी रंगायतनबरोबरच आम्हा घोडबंदरवासीयांना  जवळचे असे उत्तम सोयींनी युक्त असे डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह झाले आहे. मानसिक शांतता, एक प्रकारची स्वत:ची ‘स्पेस’ ठाण्यात राहताना मिळते असे  निश्चितच वाटते. घोडबंदर परिसर तर निसर्गाच्या सान्निध्यात आहे, त्यामुळे अधिकच सुखदायक वाटते. अकरावीत शिकत असतानाच आम्ही ठाण्यात राहायला  आलो. त्यामुळे गडकरी रंगायतन, तलावपाळी ही माझी आवडती ठिकाणं झाली. प्रयोग, तालमी आणि नाटक पाहण्याच्या निमित्ताने गडकरी रंगायतन हे माझे  कलावंत म्हणून निश्चितच आवडते ठिकाण आहे. त्यामुळे घोडबंदर परिसरात राहत असले तरी मूळ ठाण्याशी ऋणानुबंध जुळलेले आहेत. तरुणींच्या दृष्टीने विचाराल  तर ठाणे हे अतिशय सुरक्षित शहर आहे, असे मनापासून वाटते. त्यामुळे ठाणे सोडण्याचा विचार करावासा अजिबात वाटत नाही.

*आवडते मराठी चित्रपट- ‘अशी ही बनवाबनवी’, ‘देऊळ’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘किल्ला’

*आवडते हिंदी चित्रपट- ‘पिकू’, ‘अँग्री इंडियन गॉडेस’

*आवडती नाटकं- ‘जादू तेरी नजर’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘बहुरूपी’, ‘लव्हबर्ड्स’

*आवडते दिग्दर्शक- प्रवीण तरडे, अनुराग कश्यप, इम्तियाज अली

*आवडलेल्या भूमिका- ‘कौन’मधील ऊर्मिला मातोंडकरची भूमिका. सायकॉलॉजिस्ट म्हणून ती भूमिका करायला आवडेल. मराठी अ‍ॅक्शनपटांची नायिका म्हणून      भूमिका करायला नक्की आवडेल.

*आवडते सहकलावंत- सिद्धार्थ जाधव, सहकारी- खूप शिकायला सुबोध भावे सहकलावंत, थ्रिलर चित्रपट

*आवडते अभिनेते- रणबीर कपूर, आयुषमान खुराना

*आवडलेल्या अभिनेत्री- मुक्ता बर्वे, विद्या बालन, दीपिका पदुकोण</p>

*आवडते नाटककार – गिरीश जोशी

*आवडलेली पुस्तके- अगाथा ख्रिस्ती, सिडनी शेल्डन आणि डॅन ब्राऊन यांची पुस्तके, सायकॉलॉजिस्ट असल्यामुळे ‘सिव्हिल’ नावाचं इंग्रजी पुस्तक, जे मल्टिपल  पर्सनॅलिटी डिसॉर्डरवर आहे आणि ते सत्यकथेवरचे आहे.

*आवडता खाद्यपदार्थ- थालीपीठ आणि दही, मिसळ पाव, कॉण्टिनेण्टल फूडमध्ये सिझलर्स आणि थाय फूड

*आवडता फूडजॉइण्ट- मामलेदारची मिसळ

*आवडते हॉटेल- घोडबंदर मार्गावरील आनंद नगर आणि विजय गार्डन परिसरातील ‘३८ बँकॉक स्ट्रीट’ हे नवे हॉटेल. तिथे व्हेजिटेरियन थाय फूड खूप छान मिळते.

*ठाणे जिल्ह्यातील आवडता पिकनिक स्पॉट- येऊर, वाडा