News Flash

रात्रशाळेतील शिक्षणाचा ज्ञानदीप

‘‘सध्याच्या काळातही अशा रात्रशाळांची नितांत आवश्यकता आहे.

समाये ग माये नगं तोडू माझी साळा
लई लई शिकून मोठ्ठं व्हायचंय मला..
कवयित्री संजीवनी बोकील यांच्या ‘आर्जव’ या कवितेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणाऱ्या एका मुलीची शिकून मोठं होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपलं मन हेलावून टाकते. ती मुलगी म्हणते-
बेबीताई देनार हायेत तेंची बुकं
वह्य़ांनाच पडतील बग थोडंसं पैकं
पन येक नवं काम हाय मिळनार मला
माये ग माये, नगं सोडू मा
कवितेतल्या या मुलीप्रमाणे परिस्थितीच्या दुष्टचक्रात अडकल्याने अनेक मुली शालेय शिक्षणास मुकतात, अर्धवट सोडतात. अशा मुलामुलींसाठी रात्रशाळांच्या माध्यमातून जे शिक्षण दिले जाते तो त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरतो. या रात्रशाळा त्यांना शिकून आत्मनिर्भर होण्यासाठी, परिस्थितीशी लढण्यासाठी बळ देतात.
कळव्यातील कळवा नाइट हायस्कूलची वाटचाल पाहिल्यावर या कार्याचे महत्त्व प्रकर्षांने जाणवते. सामाजिक बांधिलकी जोपासू पाहणारे समविचारी मंडळी एकत्र आली आणि ज्ञानयोग शिक्षण संस्थेची स्थापना (८४ साली) करण्यात आली. जनसामान्यांसाठी शाळा काढण्याचे ध्येय या मंडळींसमोर होते. समाजातील अत्यंत सामान्य परिस्थितील मुलांचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून करणे ही समाजाची गरज लक्षात घेऊन शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याचे निश्चित झाले. कार्याची सुरुवात रात्रशाळेपासून करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेतर्फे जुना बेलापूर रोड, कळवा येथील ठा.म.पा. शाळा क्र. ६९ मध्ये तीन वर्गखोल्या रात्रशाळेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आणि १९९२ साली इ. ८वीच्या एका वर्गाने ही रात्रशाळा सुरू झाली. अंजली पाटील आणि दिगंबर पवार या दोन शिक्षकांनी प्रारंभीच्या काळात अध्यापनाची जबाबदारी स्वीकारली. सध्या इ. ८, ९, १० अशा प्रत्येक इयत्तेत मिळून ८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि पाच शिक्षक, एक मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकेतर कर्मचारी असा स्टाफ आहे.
या शाळेतील ७५ ते ८० टक्के विद्यार्थी हे ठा.म.पा.च्या शाळेतून ७वीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे खासगी शाळेत जाणे शक्य नसते असे असतात. बहुसंख्य मुले-मुली ही घराला हातभार म्हणून अर्थार्जन करतात. काही जण गॅरेजमध्ये, दुकानात, दवाखान्यात नोकरी करतात. रेल्वेत विक्री करतात. मुली धुणीभांडी करतात किंवा मदतनीस म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात. अशा तऱ्हेने दिवसा काम आणि मग संध्याकाळी ही मुले-मुली रात्रशाळेत शिक्षण घेतात. मुंबई विभागात १५०च्या आसपास रात्रशाळा आहेत आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी परिस्थितीशी टक्कर देत शिक्षण घेत आहे. (काही ठिकाणी मुलींसाठी खास रात्रशाळा आहेत.)
कळवा, बेलापूर आणि मुंब्रामधला परिसर या भागांतील शिक्षणापासून वंचित किंवा शिक्षणात खंड पडलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील विद्यार्थ्यांची रात्रशाळा ही निकड आहे, हे लक्षात घेऊन कळवा नाइट स्कूलचे शिक्षक दरवर्षी फेब्रु. महिन्यातच महापालिकेच्या शाळेमध्ये जाऊन इ. ७वीच्या विद्यार्थ्यांशी, घरी जाऊन पालकांशी संवाद साधतात. त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्रशाळेत येण्यास उद्युक्त करतात. शाळेत आल्यावरही विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन शिक्षण पूर्ण करण्यास सातत्याने प्रोत्साहन देतात.
या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा विज्ञान प्रयोगशाळा, संगणक, ग्रंथालय इ. उपलब्ध आहेत. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य, पूरक पुस्तके, वहय़ा इ. गोष्टीही या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. मुलींना तर सायकलीदेखील पुरवण्यात आल्या आहेत. या शाळेच्या एका विद्यार्थ्यांला अत्यंत प्रतिकूल परिस्थित राहूनही जिद्दीने शिक्षण घेत असल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. गोपीनाथ पाटील यांच्या प्रेरणेने ज्ञानयोग मंडळातर्फे ही शाळा सामाजिक बांधिलकी म्हणून नि:स्वार्थ वृत्तीने चालवली जाते.
ठाण्यातील पी. ई. सोसायटी संस्थेतर्फे १९५७ साली भारत नाइट हायस्कूलची स्थापना करण्यात आली. समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षण प्राप्त व्हावे, ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून रात्रशाळेची स्थापना करण्यात आली. इ. ८वीच्या वर्गाने शाळेला सुरुवात झाली. पुढील काळात इ. ८वी, ९वी, १०वीच्या प्रत्येकी दोन तुकडय़ांमध्ये ५० ते ६० विद्यार्थी शिक्षण घेत होते; परंतु जेव्हा एस.एस.सी. बोर्डातर्फे १७ नं. फॉर्मची व्यवस्था करण्यात आली तेव्हा विद्यार्थ्यांच्या संख्येवर परिणाम दिसून येऊ लागला. ७ ते १० या वेळेत ही शाळा भरते. सध्या इ. ८, ९, १० या वर्गामध्ये २० मुली आणि ७० विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यांच्यासाठी ६ शिक्षक आणि २ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. विद्यार्थ्यांसाठी संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय या सर्व आवश्यक सोयीसुविधा पुरवल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, पूरक साहित्य, वहय़ा इ. सर्व गोष्टी सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर यांच्या सहकार्याने पुरवल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा या सर्व गोष्टींचे आवर्जून आयोजन केले जाते. शाळा, शिक्षक, संस्था यांच्या प्रयत्नांमुळे शाळेच्या निकालात लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. गेल्या वर्षी ६२%, तर या वर्षी ५२% निकाल लागला आहे. शाळेचे मुख्याध्यापक तळेलेसर म्हणतात की, ‘‘सध्याच्या काळातही अशा रात्रशाळांची नितांत आवश्यकता आहे, कारण यामुळे प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या मुलांना शालेय शिक्षण घेता येते, त्यांना आत्मनिर्भर होण्यास साहाय्य प्राप्त होते.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 2:12 am

Web Title: article on girl education
टॅग : Girl
Next Stories
1 प्रेयसीच्या हत्येनंतर दशक्रिया विधी
2 सत्ता कुणाची.. जुनेच दुखणे
3 मराठी कविसंमेलनांचे ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’
Just Now!
X