News Flash

अस्सल भारतीय राखणदार!

वैशिष्टय़ांनुसार श्वानप्रेमी आपल्या घरासाठी श्वानाची खरेदी करतात.

कारवान हाऊंड

कुत्र्यांच्या प्रत्येक प्रजातीचे वेगळे वैशिष्टय़ असते. त्या वैशिष्टय़ांनुसार श्वानप्रेमी आपल्या घरासाठी श्वानाची खरेदी करतात. कुत्र्यांच्या परदेशी प्रजातींना श्वानप्रेमींची मोठी पसंती आहे. पण तरीही अस्सल भारतीय अशा कारवान हाऊंड या प्रजातीवरील श्वानप्रेमींचे प्रेम अजूनही कायम आहे. शिकार आणि राखण यासाठी उपयुक्त असणारे हे श्वान संपूर्णत: भारतीय प्रजाती म्हणून ओळखले जाते. कारवान हाऊंड या कुत्र्याच्या प्रजातीचा इतिहास शंभर वर्षे जुना आहे. फार पूर्वीच्या काळात कारवान हाऊंड या प्रजातीचे संदर्भ सापडतात. छत्रपती शाहू महाराज शिकारीसाठी जात तेव्हा त्यांच्यासोबत कारवान हाऊंड असत. त्या काळात शेतकरीही आपल्या शेताच्या तसेच घराच्या राखणदारीसाठी या कुत्र्यांची निवड करत. पूर्वीच्या काळी शिकारीतील मदतनीस आणि राखणदार या दोन कारणांसाठी कारवान हाऊंडला पसंती मिळत असे. अलीकडच्या काळात शिकारीचे प्रमाण नगण्य असल्याने राखणदारीसाठीच या प्रजातीची निवड केली जाते. महाराष्ट्रात बीड, सोलापूर, सांगली, सातारा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा या परिसरात कारवान हाऊंड ही प्रजाती जास्त प्रमाणात आढळते.

शारीरिकदृष्टय़ा वेगळेपण
कारवान हाऊंडचे वेगळेपण त्याच्या दिसण्यापासूनच सुरू होते. सामान्य कुत्र्यांपेक्षा कारवान हाऊंड अधिक काटक आणि कणखर शरीरयष्टी असलेले असतात. लांब पाय, लांब शेपटी, उंच शरीर यामुळे त्यांचे वेगळेपण डोळय़ांत भरते. अन्य प्रजातीतील श्वानांच्या तुलनेत कारवान हाऊंडच्या शरीरात चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सुस्तपणा किंवा आळस त्यांच्यात कमी असतो. हाडे बारीक असली तरी मजबूत असतात. भारतीय असल्यामुळे आपल्याकडील तिन्ही मोसमांत कारवान हाऊंड अतिशय सहजपणे राहू शकतो. परिणामी परदेशी प्रजातीपेक्षा या प्रजातीला सांभाळणे कोणत्याही परिस्थितीत सोयिस्कर असते. विशिष्ट उंचीमुळे या प्रजातीची वेगमर्यादा जास्त आहे. पाय लांब असल्याने चित्ता प्राणी जितक्या वेगात धावतो त्याच वेगात कारवान हाऊंड धावू शकतात.
कारवान हाऊंड ही प्रजाती साधारण गावरान प्रकारात येत असल्याने या कुत्र्यांच्या खाण्याच्या विशिष्ट सवयी नाहीत. शेतकरी या कुत्र्याचे पालन मोठय़ा प्रमाणात करत असल्याने शेतकरी जे साधे अन्न खातो तेच या कुत्र्याचे खाणे आहे. भाकरी खाऊनदेखील हे कुत्रे राहू शकतात. सांभाळण्यासाठी ही प्रजाती अतिशय उपयुक्त आहे, कारण परदेशी प्रजातीला सांभाळण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेत या कुत्र्याला सांभाळणे स्वस्त आहे. मात्र कारवान हाऊंड ही प्रजाती परदेशी प्रजातीप्रमाणे प्रशिक्षणासाठी फारशी उपयुक्त नाही. साधारण बसणे, उठणे या घरगुती कमांड या प्रजातीला शिकवल्या तर तितक्याच तो पाळू शकतो.

तीक्ष्ण दृष्टीचे वैशिष्टय़
कारवान हाऊंड या कुत्र्यांची दृष्टी फार तीक्ष्ण असते. एखाद्या लांबच्या पल्ल्यावरील वस्तू किंवा व्यक्ती त्यांना स्पष्ट दिसते आणि त्वरित समजते. यामुळे राखणीसाठी हे कुत्रे अतिशय उपयुक्त असतात. तीक्ष्ण दृष्टी असल्याने या कुत्र्यांना ‘साइट हाऊंड’ असेही म्हटले जाते.

भारतीय प्रजाती परदेशात प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील
पेणमध्ये राहणारे प्रसाद मयेकर यांनी कारवान हाऊंड ही प्रजाती आपल्याकडे जतन केलेली आहे. प्रसाद मयेकर हे या कुत्र्यांचे संवर्धन करत असून भारतीय प्रजातीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या विविध डॉग शोजमध्ये या कारवान हाऊंड कुत्र्यांनादेखील मागणी आहे. त्यामुळे इतर कुत्र्यांप्रमाणेच कारवान हाऊंड कुत्र्यांचेदेखील महत्त्व वाढले आहे.

रोगप्रतिकारकशक्ती जास्त
शारीरिकदृष्टय़ा मजबूत असल्यामुळे या प्रजातीला कोणताही विशिष्ट आजार नाही, त्यामुळे या कुत्र्यांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. रोगप्रतिकारकशक्ती जास्त असल्याने हे कुत्रे सहसा आजारी पडत नाही. आजार झाल्यास उपचाराला त्वरित प्रतिसाद देतात.
किन्नरी जाधव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 1:54 am

Web Title: article on karwan hound
Next Stories
1 सत्ताधीशांना सुधारण्याची नवीन संधी
2 वाचनाशी मैत्री जुळवण्याची धडपड!
3 कल्याणकरांचे हाल आता तरी संपतील का?
Just Now!
X