नवीन जन्माला आलेलं मूल सर्वसाधारण मुलापेक्षा वेगळे आहे, व्यक्तिगत विकासाच्या मर्यादित क्षमता असणारे आहे, त्यामुळे आयुष्यभर ते कुटुंबीयांवर (विशेषत: पालकांवर) अवलंबून असणार आहे या कटू वास्तवाला सामोरे जावे लागते तेव्हा एका संघर्षमय आयुष्याला सुरुवात होते. वास्तवाचा स्वीकार करून विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुलाचा विकास (प्रत्येकाच्या क्षमतांनुसार) घडवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत राहणे, ही पालकांसाठी एक कसोटीच राहते, कारण ही प्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते. (अगदी हे मतिमंद मूल ३०-४० वर्षांचे झाले तरी) आणि या अथक प्रयत्नांनंतरही मिळणारे यश तुलनेने मर्यादितच असते.
मतिमंद/विशेष मुलांच्या पालकांच्या आयुष्याचा प्रवास हा नागमोडी रस्त्यावरील अवघड वळणांचा आणि अतिशय आव्हानात्मक असतो. प्रत्येक दिवस हा पालकांच्या सर्व क्षमतांची परीक्षा घेणाराच असतो. आपले मूल मतिमंद आहे हे कळल्यावर पालक मानसिकरीत्या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जातात. प्रचंड नैराश्य, न्यूनगंड, नशिबाला दोष देणे इ. अनेक नकारात्मक भावनांनी मनाला घेरले जाते आणि जगण्याविषयी उदासीनता निर्माण होते. जर पालक सुशिक्षित, समंजस असतील तर वास्तवाचा स्वीकार करून ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती पावले उचलतात. इथे पती-पत्नी एकमेकांच्या सहकार्याने वाटचाल करतात आणि त्यांना कुटुंबीयांचेही सहकार्य प्राप्त होते. आर्थिक परिस्थिती हादेखील महत्त्वाचा घटक असतो, कारण अशा मुलाच्या विकासासाठी तज्ज्ञांचा सल्ला, औषधोपचार, विविध उपचार पद्धतींचा अवलंब इ. स्तरांवर प्रयत्न करावे लागतात. मूल मतिमंद आणि बहुविकलांग असले तर परिस्थिती अधिकच बिकट होते. पालक जर अशिक्षित, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील असतील, तर बऱ्याचदा मतिमंद मूल ही फक्त आईची जबाबदारी असते आणि त्यामुळे अशा स्त्रीची शारीरिक, मानसिक कुचंबणा होत राहते. इथे बऱ्याचदा वैवाहिक जीवन संपुष्टात येते, घरगुती कलह/ताणतणाव वाढीस लागतात. परिणामी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक अशा विविध स्तरांवर त्याचे परिणाम होत राहतात. हे परिणाम दूरगामी स्वरूपाचे असतात. त्यामुळे या विशेष मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या समस्या साऱ्या समाजाने लक्षात घेणे गरजेचे ठरते, कारण तेही या समाजाचाच घटक आहेत.
या सर्व पाश्र्वभूमीवर सहसंवेदना असणाऱ्या लोकांकडून मिळणाऱ्या आश्वासक आधाराची सातत्याने आवश्यकता असते. विशेष मुलांच्या पालकांची निकड लक्षात घेऊन ठाणे शहर परिसरातील मतिमंदत्व असलेल्या पाल्यांच्या पालकांनी एकत्र येऊन २००२ साली जागृती पालक संस्था ठाणे, ही संस्था स्थापन केली. आज या संस्थेत मतिमंद, स्वमग्न, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग अशा प्रकारांत समावेश असणारी मुले-मुली आहेत. आवर्जून नमूद करण्याजोगी बाब म्हणजे सध्या संस्थेचे ३०० सभासद आहेत आणि त्यापैकी बहुसंख्य पालक आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील आहेत.
ज्याला वेदना होते त्यालाच त्याचे दु:ख कळते. त्यामुळे मतिमंद मूल आणि त्याचे कुटुंब, त्यांच्या जगण्याची वेदना, त्यांची कष्टप्रद वाटचाल उर्वरित समाज समजून घेऊ शकत नाही. अशा वेळी जागृती पालकसंस्था ही मार्गदर्शकाच्या रूपात सर्व पालकांना सावलीसारखी सोबत करत राहते. मतिमंदत्वाचा स्वीकार, अपंगत्वाचे निदान करणाऱ्या अधिकृत संस्था/ मार्गदर्शन केंद्र/ तज्ज्ञ डॉक्टर, विविध सरकारी योजना, कायदे/ सोयीसुविधा/ सवलती आणि त्यात वेळोवेळी होणारे बदल याविषयीची अद्ययावत माहिती जागृतीतर्फे दिली जाते.
विशेष मुलांच्या पालकांना सातत्याने मार्गदर्शनाची गरज असते. ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे जिद्द विशेष शाळेतर्फे एका समाजसेवी संस्थेच्या मदतीने मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजण्यात आली होती. या व्यासपीठाचा उपयोग करून पालकांना एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले. जिद्द शाळेच्या पुढाकाराने जागृती पालकसंस्था स्थापन करण्यात आली.
जागृती संस्था ही परिवार, परिवार सह्य़ाद्री आणि नॅशनल ट्रस्टशी संलग्न असून त्यांनी दिलेले उपक्रम राबवीत असते. कायदेशीर पालकत्व, निरामय हेल्थ इन्शुरन्स, पालकत्व पौगंडावस्था, वागणुकीतील दोष याविषयी पालक आणि समाजातही प्रबोधन करण्याचा (विविध कार्यशाळांच्या माध्यमातून) प्रयत्न संस्थेतर्फे सातत्याने केला जातो.
अपंग शालेय नियमानुसार वय वर्षे १८ झाल्यावर मुलांची नावे पटावरून कमी केली जातात. अशा मुलांसाठी संस्थेच्या स्फूर्ती अ‍ॅक्चिव्हिटी सेंटरमध्ये व्यावसायिक आणि व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते. शहरात उपलब्ध असलेल्या अशा केंद्रांमध्ये जाऊन शिक्षण घेणे सामान्यांना शक्य नाही अशा विशेष मुलांसाठी हा उत्तम पर्याय आहे. या सेंटरमध्ये पाकिटे, भेटकार्डे, शॉपिंग बॅग्ज त्याचप्रमाणे शोभेच्या वस्तूंमध्ये राख्या, दिवे, तोरणे, मोबाइल कव्हर, रंगीत कंदील तयार केले जातात. या सेंटरमध्ये निवडलेल्या भाज्या, कडधान्ये सोलून त्याची पॅकेट्स तयार केली जातात (मागणीनुसार). या सर्व वस्तू मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार बनवल्या जातात.
जागृती पालक संस्थेतर्फे तीन वर्षांवरील मतिमंद असलेल्या पाल्यांसाठी ममता डेकेअर सेंटर, हे एक प्रकारचे पाळणाघरच चालवले जाते. ज्या पालकांना अर्थार्जनासाठी किंवा वैयक्तिक कामाकरिता बाहेर जायचे असते आणि मुलांना घेऊन जाणे शक्य नसते अशा वेळी या मुलांना सेंटरवर ठेवून जाता येते. सध्या हे सेंटर ११ ते ४ या वेळेत चालते. जागृती पालक संस्थेच्या पाल्यांसाठी बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने बस उपलब्ध झाली आहे. दसऱ्यापासून पाल्यांना घरापासून सेंटपर्यंत जाण्यासाठी आता बससेवा पुरवली जात आहे.

हेमा आघारकर
संपर्कासाठी ’ ९३२२९५१५४६, ९८७०२०१६८५

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान