News Flash

मोबाइल कव्हर असावे ‘मॅचिंग’

हल्ली स्मार्ट फोनचा जमाना आहे. प्रत्येकाकडे मोठय़ा मोठय़ा आकाराचे अँड्रॉइड, विंडोजचे फोन दिसतात.

कॉर्पोरेट ठिकाणी काम करणारे किंवा नेहमीच एक सामान्य लुक आवडणाऱ्या व्यक्ती लेदर कव्हर्स वापरतात.

हल्ली स्मार्ट फोनचा जमाना आहे. प्रत्येकाकडे मोठय़ा मोठय़ा आकाराचे अँड्रॉइड, विंडोजचे फोन दिसतात. मात्र, जवळपास प्रत्येक स्मार्ट फोन सारखाच दिसतो. किंबहुना बाजारात अमुक एखादा स्मार्ट फोन लोकप्रिय होऊ लागला की, तोच स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढू लागते. अशा वेळी आपला स्मार्ट फोन चारचौघांपेक्षा वेगळा दिसावा, अशा इच्छेतून मोबाइल कव्हरची निवड सुरू होते. मोबाइलला संरक्षण देणे असा या कव्हरचा हेतू असला तरी अलीकडे तो ‘फॅशन स्टेटमेंट’ म्हणून अधिक ओळखला जाऊ लागला आहे. त्यातही मुलींमध्ये मोबाइल कव्हर वापरण्याचा आणि त्यात वेळोवेळी बदल करण्याचा ट्रेंड अधिक लोकप्रिय आहे. आता तर रोजच्या रोज मोबाइल फोनचे कव्हर बदलण्याचा चांगलाच ट्रेंड सध्या दिसतोय. कपडय़ांप्रमाणे म्हणजे कधी फॉर्मल्सवर, कधी ट्रेडिशनल कपडय़ांवर शोभतील असे, इतकेच नव्हे तर ड्रेसच्या कलरनुसारही मोबाइल कव्हर्स दररोज बदलली जातात. त्यामुळे या कव्हर्सना मुलींच्या अक्सेसरीजमध्ये समाविष्ट केले जाते. सध्या स्टाइल सिम्बॉल ठरलेल्या मोबाइल कव्हर्सच्या प्रकारांविषयी..

मोबाइल कव्हरवर सेल्फी..
सेफ्लीचे वेड हे केवळ समाजमाध्यमापुरते मर्यादित न राहता त्याच्या वापर मोबाइल कव्हरची शोभा वाढविण्यासाठी करण्यात येत आहे. मोबाइल कव्हरवर फोटोिपट्र करून आपल्या फोनला खास लुक देणे, तरुण मंडळी पसंत करू लागली आहे. तसेच भेटवस्तूंच्या यादीत ‘फोटोप्रिंट कव्हर’ने आपले महत्त्वाचे स्थान तयार केले आहे. तरुण मंडळी काही ‘खास’ मित्रमंडळींना भेट देण्यासाठी अशा प्रकारच्या कव्हरची सध्या चलती आहे.

रबरी कवच
मोबाइलचे संरक्षण व्हावे यासाठी कव्हरचा प्रामुख्याने वापर केला जातो. परंतु डिझायनिंग असलेल्या कव्हरमुळे ते संरक्षण होईलच असे नाही हे लक्षात घेऊन रबराचे कव्हर बाजारात उपलब्ध आहे. हे कव्हर साधारण मोबाइलच्या स्क्रीनचा भाग सोडल्यास इतर सगळ्या बाजूंना आवरण घालते. रबरच्या नवीन आलेल्या कव्हरपैकी सगळ्यात चलती वरच्या बाजूला सशाचे कान असलेल्या कव्हरची आहे. त्यानंतर काही कव्हरला मागच्या बाजूला एक मांजर असते आणि तिचे हात आणि पाय पुढच्या बाजूला मोबाइलच्या कडेला असतात. आणि एका कोपऱ्यात तिचे इवलेसे तोंड असते. ते पाहून असं वाटतं की त्या मांजरीनेच मोबाइलला हाताने आणि पायाने घट्ट पकडून ठेवलंय.

प्रतिष्ठेला शोभणारे ‘लेदर कव्हर’
कॉर्पोरेट ठिकाणी काम करणारे किंवा नेहमीच एक सामान्य लुक आवडणाऱ्या व्यक्ती लेदर कव्हर्स वापरतात. सुरुवातीला अगदी छोटे छोटे मोबाइल हँडपीस लोक वापरायचे तेव्हा प्रत्येकाकडेच मोबाइल ठेवण्यासाठी लेदरचे पाऊच असायचे. आताही लेदरचे पाऊच मोबाइल ठेवण्यासाठी वापरले जाते. पण याशिवाय लेदरचे बॅक कव्हर आणि फ्लॅप कव्हरही वापरले जाते. यामध्ये लेदरची फ्लॅप कव्हर जास्त प्रमाणात वापरली जातात. या फ्लॅप कव्हरच्या पुढच्या बाजूला तो फ्लॅप सतत उघड बंद होऊ नये म्हणून बटणही असते. इतर फ्लॅप कव्हरपेक्षा थोडा डिसेंट लुक याला दिला जातो.

‘फ्लॅप’ची उघडझाप
काही अँड्रॉइड फोनवर फ्लॅप कव्हर फ्री मिळतात. त्या कव्हरमुळे मोबाइल व्यवस्थित राहतो शिवाय स्क्रीनवर कोणताही डाग पडण्याची शक्यता कमी असते. यात बरेच प्रकार आहेत. कधी कधी ही कव्हर्स पूर्णत: बंद असतात त्यामुळे फोन आल्यावर फोन कोणाचा आला आहे बघण्यासाठी ते कव्हर उघडावे लागते. पण या फ्लॅपचा तोटा म्हणजे फोनवर बोलताना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाजारात आता त्या फ्लॅप कव्हरला फोन उचलण्यासाठी आणि कोणाचा फोन आला आहे हे दिसण्यासाठी स्क्रीनच्या कव्हरला दोन जागा असतात. या कव्हरचा वापर कव्हर्स फॅशनच्या प्रेमात न असणाऱ्या व्यक्ती अधिक करतात.

अन्य प्रकार
याशिवाय अनेक मोबाइल कंपन्यांनी स्वत:ची खास अशी कव्हर बाजारात आणली आहेत. यात सगळ्यात पुढे आहे ती अ‍ॅपल कंपनी. आयफोनसाठी थ्रीडी डिझाइन असणारी, सोनेरी, मेटल इफेक्ट असणारी मोबाइल कव्हर्स बाजारात आणली आहेत. कव्हर्समधील अजून
एक विशेष प्रकार म्हणजे कधी कोणी मोबाइलसाठी लाकडाच्या कव्हरचा विचारही केला नसेल, पण फक्त आयफोनसाठी आता बाजारात लाकडाची कव्हर्स उपलब्ध आहेत. ही कव्हर बाजारात अगदी जागोजागी दिसू लागली आहेत. त्यात पुमा यांसारख्या मोठय़ा ब्रॅण्डनेही आपले पाय रोवायला सुरुवात केली
आहे.

पारंपरिक लुक
मोबाइललाही पारंपरिक लुक येण्यासाठी बटव्यांचा वापर केला जातो. हे बटवे पैठणीचे किंवा शालूच्या पदराचे तसेच इतर पारंपरिक डिझायनर असणाऱ्या साडय़ांपासून बनवले जातात. त्यामुळे त्याला एक परिपूर्ण पारंपरिक लुक येतो. अशाच पारंपरिक लुकच्या कपडय़ांपासून बटवे बनवून त्यावर खडे, मोती लावलेले दिसतात. तर कधी पारंपरिक लुक हवा असेल पण बटव्याचा वापर करायचा नसेल तर पारंपरिक लुक असणारे बॅक कव्हर्सही लावले जातात. या बॅक कव्हरला खडे लावून डिझाइन केली जाते.

बहुपयोगी ‘फायबर कव्हर’
मोबाइलचे बॅक कव्हर बनवताना शक्यतो फायबर कव्हरचा वापर अधिक केला जातो. या कव्हरमध्ये मागच्या बाजूला एखादे चित्र किंवा डिझाइन असते. तर काही वेळा एकाच रंगाचे प्लेन कव्हर असतात. फायबर कव्हरचे एक विशेष म्हणजे त्याच्या काही डिझाइन ठरावीक मोबाइलसाठीच असतात. त्यातला एक म्हणजे नोट टू. या फोनसाठी फायबरचे दोन रंगाचे कव्हर बाजारात आले आहे. आणि विशेष म्हणजे या कव्हरच्या मागील बाजूला एक गोलाकार स्टॅण्डही देण्यात आला आहे. त्यामुळे एखादा चित्रपट मोबाइलवर पाहायचा असेल तर ते छोटय़ा स्टॅण्डला लावून तो चित्रपट आरामात पाहता येऊ शकतो.

कुठे-आता ही खरेदी तुम्ही गावदेवी मार्केट, जांभळी नाका, राममारुती रोड, गोखले रोड, कोरम मॉल, डी-मार्ट, विवियाना मॉल, येथे रस्त्यावर अगदी स्वस्तात करू शकता. किंमत – १०० रुपये ते १००० रुपयांपर्यंत.

– शलाका सरफरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 3:02 am

Web Title: article on mobile cover
Next Stories
1 ठाण्याला वेध नाटय़ संमेलनाचे
2 स्वस्तात मस्त
3 नगरसेवकांना बेकायदा बांधकामे भोवणार!
Just Now!
X