‘थर्टी फर्स्ट’ म्हणजे सळसळता उत्साह, मोजमस्ती, जल्लोष. नववर्षांच्या स्वागतासाठी बरेच जण आठवडाभरापासूनच तयारी करतात. पूर्वी घराच्या गच्चीवर, एखाद्या हॉलमध्ये, सोसायटीच्या अंगणात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला जात असे. मात्र आता नववर्षांचे स्वागत निसर्गरम्य ठिकाणी, समुद्राच्या काठी किंवा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी साजरा करण्याची प्रथा वाढीस लागली आहे. यंदा आठवडय़ाच्या अखेरीस नववर्षांच्या प्रथम दिन आल्याने कौटुंबिक सहली काढल्या जात आहेत. कोकणात निसर्गरम्य ठिकाणी किंवा महाबळेश्वर, पाचगणी येथे अनेक जण मौजमस्ती करण्यासाठी जात आहेत. पण लांबचा प्रवास शक्य नसलेले अनेक जण जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी ‘सहजसफर’ घडवत आहेत..ठाणे जिल्ह्यातील  अशाच काही पर्यटनस्थळांविषयी.

येऊर : मुंबई, ठाण्यातील पर्यटकांचे ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचे हक्काचे माहेरघर म्हणजे येऊर. निसर्गरम्य डोंगर, घनदाट जंगल आणि हिरवाईच्या सान्निध्यात थर्टी फर्स्ट साजरा करण्याची मजा काही औरच आहे. या ठिकाणी अनेक हॉटेल, रिसॉर्ट असून नववर्ष साजरा करण्यासाठी ती आधीच बुक झालेली आहेत. मात्र येथे नववर्ष स्वागत करताना वन विभागाचे नियम मोडले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अनेक जण मद्यप्राशन करून येथे धिंगाणा करतात आणि त्याचा त्रास स्थानिकांना होतो. यंदा येथे ‘येऊन एनव्हायर्न्मेंट सोसायटी’ने ‘ग्रीन न्यू इअर’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्नाळा : ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी वसईजवळी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यालाही पर्यटकांची विशेष पसंती असते. अर्नाळाच्या समुद्रकिनारी विविध लहान-मोठे रिसॉर्ट असून तिथे थर्टी फर्स्टला खूप गर्दी असते. किनाऱ्यावर यंदा नववर्ष स्वागतासाठी आणि मौजमस्तीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. त्याशिवाय येथे समुद्रकिनारी ताजी मासळी मिळते. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री या मासळीला खूपच मागणी असते. त्यासाठी खवय्यांसाठी मासळीच्या खास ऑर्डर स्वीकारल्या जातात.

उत्तन : भाईंदरजवळी उत्तन हेही थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठीचे एक उत्तम ठिकाण. येथील निळाशार समुद्र आणि त्यावरील किनाऱ्यावर जल्लोष करणे हा एक वेगळाच आनंद देतो. येथील समुद्रकिनारी अनेक हॉटेल आहेत. हिरवाईने नटलेला डोंगर, नारळाची गर्द वनराई आणि खारे वारे झेलत अनेक जण नववर्षांच्या स्वागतासाठी येथे येतात. येथील माता वेलकनी चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन असते. त्याशिवाय मच्छीमारांचे गाव असल्याने येथे विविध प्रकारचे ताजी मासळीही मिळते.

माथेरान : सध्या गुलाबी थंडी पडली असून ही थंडी अनुभवण्यासाठी अनेकांची पावले माथेरानकडे वळत आहेत. माथेरानमधील विविध हॉटेल, रिसॉर्टमध्ये थर्टी फर्स्टसाठी विविध प्रकारचे आयोजन केले आहे. त्यासाठी विविध खेळ, नृत्य यांचे आयोजन आहे. माथेरानच्या निसर्गरम्य वातावरणात, हुडहुडणाऱ्या थंडीत ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष करण्यास एक वेगळीच मजा आहे.

रिसॉर्ट : अनेक जण थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा करण्यासाठी कुटुंबासह विविध रिसॉर्टला भेट देतात. ठाण्यातील घोडबंदर रोड, कल्याण-शिळ रोड, शहापूर, मुरबाड या परिसरात विविध रिसॉर्ट असून या ठिकाणी नववर्ष जल्लोषासाठीही विशेष आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी विविध संस्थांनी डिजे, विविध स्पर्धा, जल्लोष पार्टी, नृत्य आदींचे आयोजन केले आहे.