घरात शोभीकरणासाठी एखादे फिश टँक ठेवले असले तरी त्यातील काही मासे आपले लक्ष वेधून घेतात. मुळातच माशांना असलेले शारीरिक सौंदर्य मनास भुरळ घालते. अलीकडे फिश टँकमधील माशांच्या वेगवेगळ्या जाती उपलब्ध असल्याने अनेक पर्याय उपलब्ध असतात. चपळ असणारा मासा आपल्या जलद हालचालीतून आपले वेगळेपण दाखवतो. तसेच आपल्या संथ हालचालीच्या माध्यमातून आपल्या शांत स्वभावाची ओळख काही मासे करून देतात. फिश टँकमधील या माशांच्या शांत हालचाली पाहिल्यावर केवळ त्यांना न्याहाळत राहण्याचा मोह होतो. माशांच्या विविध जातींमधील असे आपल्या शांत स्वभावासाठी लोकप्रिय असलेले मासे म्हणजे एंजल मासे. बहुतांश घरांत जास्तीत जास्त पाहायला मिळणाऱ्या या एंजल माशांना आपल्या सौंदर्यामुळे अधिक पसंती असते. १९०६ साली जे. पी. घोष यांना अ‍ॅमेझोनच्या नदीत हे मासे आढळले. १९२० ते १९३० या दरम्यान कॅप्टिविटीमध्ये म्हणजेच एखाद्या बंदिस्त जागेत या माशांचे ब्रीडिंग होऊ लागले. या माशांच्या विशिष्ट रंगांवरून जाती अस्तित्वात आल्या. मार्बल, जेट ब्लॅक, सिल्व्हर अशा वेगवेगळ्या जातींमध्ये एंजल मासे आढळतात. मत्स्यालयात मोठय़ा प्रमाणात पाळले जाणारे मासे अशी एंजल माशांची ओळख आहे. या माशांची शारीरिक सुंदरता पाहताक्षणी मोहित करणारी आहे. २७ डिग्री सेल्सिअस एवढय़ा पाण्याच्या तापमानामध्ये या माशांना ठेवावे लागते.

एंजल मासे इतर माशांप्रमाणे चपळ नसल्याने त्यांच्या शांत स्वभावामुळे हे मासे घरात पाळण्यास अतिशय उपयुक्त ठरतात. घरातील फिश टँकमध्ये हे मासे असल्यावर त्यांची शांत हालचाल आपल्याला मोहित करते. याच कारणामुळे एंजल मासे फिश टँकमध्ये ठेवण्यास लोकांची पसंती असते. या माशांचे वैशिष्टय़ म्हणजे घरातील फिश टँकमध्येसुध्दा नर आणि मादी एकत्र ठेवल्यास यांचे ब्रीडिंग करता येते. या संदर्भात विशिष्ट माहिती मालकाने अभ्यास केल्यास या माशांचे ब्रीडिंग कठीण नसते.

डौलदार हालचाली

एंजल माशांची पोहण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. हे मासे एकाच दिशेने पोहताना दिसतात. इतर माशांप्रमाणे फार हालचाली, धावपळ करत नाहीत. अतिशय गंभीर आणि शांत असल्याने गरज भासेल तेव्हाच एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाण्याचा या माशांचा कल दिसून येतो. या माशांच्या शांत, डौलदार हालचालीकडे पाहिले की आपल्यालादेखील शांततेचा अनुभव सुखद वाटतो. ब्रीडिंग करताना घरात या माशांची वाढ होताना पाहणे हा एक वेगळा आनंद असतो. अगदी लहान असणाऱ्या या माशांची पूर्ण वाढ होण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झाल्यावर आपल्या तळहाताएवढे हे मासे मोठे होतात.

अंडी, पिलांची काळजी

नदीमध्ये असणारी पाणवनस्पती किंवा नदीत पडलेल्या एखाद्या लाकडाच्या ओंडक्यावर एंजल मादी आपली अंडी घालतात. हे या माशांचे वैशिष्टय़ आहे. साधारण एक आठवडय़ापर्यंत नर आणि मादी मासे या अंडय़ातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत अंडय़ांचे रक्षण करतात. शंभर ते हजापर्यंत हे मासे आपली अंडी घालतात.  वाहत्या पाण्याच्या नदीत ही पिल्ले न राहता एखाद्या संथ वाहणाऱ्या किंवा एका ठिकाणी साचलेल्या पाण्यात या माशांचे ब्रीडिंग होते. लारवा आणि डॅफनिस हे लहान किडे खायला या माशांना आवडतात.

फार गर्दी सहन होत नाही

शांत स्वभावाचे असल्याने या माशांना फिश टँकमध्ये जास्त धावपळ करणारे, रागीट मासे सहन होत नाहीत. गोल्ड फिश, टायगर, ब्लॅक मोली यासारख्या रागीट माशांसोबत एकत्र फिशटँकमध्ये राहणे एंजल माशांना कठीण जाते. या कारणामुळे एंजल माशांचे ब्रीडिंगसुद्धा पूर्णपणे स्वतंत्र वेगळे करावे लागते.टॅक्सिडो वेलटेल, मार्बल, जेट ब्लॅक आणि सिल्व्हर या जाती सर्वाधिक लोकप्रिय आहेत. टॅक्सिडो व्ॉलटेलच्या शेपटीकडचा भाग लांब आणि थोडा बाक आलेल्या असल्याने त्याचे वेगळेपण आकर्शित करते.