डॉ. शुभांगना अत्रे

इसवी सनाच्या बाराव्या शतकातील संत अक्क महादेवी यांनी देवाला विचारलेला हा प्रश्न प्रस्तुत विषयाच्या दृष्टीने विचारात घेण्याजोगा आहे. ‘मन माझे एकच’, हे प्रत्येकाला पुरेपूर माहीत असते, तरीही आपण जेव्हा मनाच्या आतल्या अनेक मनांचा उल्लेख करतो तेव्हा खरे म्हणजे मनाचे अनेक पलू उलगडले आहेत असे वाटणारे आणि कधीच उलगडणार नाहीत असे वाटणारे असे मनातल्या द्वंद्वाला चालना देणारे असतात. मानवी मनातल्या द्वंद्वाच्या स्थितीचे यथार्थ स्वरूप आणि त्यातून सत्य जाणण्यासाठी मानवाने केलेली धडपड व त्याचे फलित यांच्यातून जगातील सर्व संस्कृतींमधील श्रद्धाप्रणाली आणि तत्त्वज्ञान यांची निर्मिती झाली.

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

आज नीज आश्विन महिना सुरू झाला, आश्विनाच्या पहिल्या दिवसाला घट बसतील आणि सगळ्या संकटांचं सावट विसरून आपण आपलं जगणं साजरं करायच्या खटपटीला लागू. निसर्गाची खप्पा मर्जी झाली नाही तर आश्विन महिना सुगीचा आणि यंदाची सुगी चांगली झाली म्हणून जगन्नियंत्याचे स्मरण करत, सगळी त्याचीच कृपा असे म्हणत सण साजरे करत जीवनाप्रति कृतज्ञता व्यक्त करायची. सुगी चांगली नाही झाली, तरी त्या जगन्नियंत्याच्याच दयेनं ‘म्होरल्या सुगीला हुईल समदं नीट’, या श्रद्धेने उदासी, संकटं दूर सारत जगण्याची चिवट आशा तेवती ठेवायची आणि पुढय़ात आलेले दिवस साजरे करायचे. यातून जोपासायचं काय, तर त्या एकाच मनाची अनेक होत आयुष्याला भिडण्याची आपली उपजत ताकद!

शेतीप्रधान जीवनसरणीचा एक अविभाज्य भाग असलेली सण आणि उत्सवप्रियतेची संस्कृती, अनिश्चितता आणि त्या अनिश्चिततेतही जीवनाचा समतोल साधण्याचे मानवाने केलेले विविध प्रयत्न दर्शवणारी आहे; मग शेतीची सुरुवात होण्याआधी अशी अनिश्चितता आणि त्यातूनही आयुष्य जगण्यासाठी उत्सवप्रियता नव्हतीच का, असा प्रश्न अगदी सहजपणे अनेकांच्या मनात येईल. तेव्हाही अनिश्चितता निश्चितपणे होती. शिकार किंवा फळे, कंदमुळे मिळाली तर मिळाली, नाही तर नाही अशीच स्थिती होती. अश्मयुगीन गुहाचित्रांमध्ये समूहनृत्याची चित्रेही पाहण्यास मिळतात, आयुष्य साजरे करण्याचाच तो एक भाग असावा. या चित्रातील काळविटाच्या वेशातील तांत्रिकाचा चेहरा आपल्याला दिसत नसला तरी त्याच्या एकूण शारीरिक बोलीतून तो नृत्य करतो आहे, हे स्पष्ट दिसते आहे, परंतु या नृत्याचे काही विशेष प्रयोजनही आहे, असे लक्षात येते. बहुतेक अभ्यासकांच्या मते तो तांत्रिक करत असलेले नृत्य हे शिकार यशस्वी व्हावी म्हणून करण्याच्या विधींमधील एक भाग आहे.

अश्मयुगातील शिकारीच्या प्रसंगामधील तांत्रिक विधी पुरुषप्रधान असणे स्वाभाविक आहे. परंतु अश्मयुगीन मानवाने निर्मिलेल्या स्री प्रतिमाही मिळाल्या आहेत, त्या एखाद्या धार्मिक किंवा तांत्रिक विधीमध्ये सहभागी झालेल्या असाव्यात, असे वाटत नाही. त्यांचे स्थान त्या विधींमधल्या अधिष्ठात्या देवतेचे असावे असे वाटते. थोडक्यात सांगायचे झाले तर इच्छापूर्तीसाठी कोण्या देवतेची आळवणी करणे ही गोष्ट अश्मयुगीन काळापासून चालत आलेली आहे, हे अगदी स्पष्ट आहे.

माणसाची बुद्धी आणि मन जसजसे विकसित होत गेले, तसतसे अनिश्चिततेपोटी त्याच्या मनात उत्पन्न होणारी भीती आणि त्यासाठी त्याला वाटणारी आधाराची गरज यातून त्याने कल्पिलेल्या दैवतांना तो अनेक नामरूपांची जोड देत गेला आणि त्यातून वेगवेगळ्या परिस्थितीशी झुंजण्यासाठी वेगवेगळी दैवते आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी करण्याचे आचारविधी आणि त्यांच्या माहात्म्याचे वर्णन करणारी मिथके यांची व्याप्तीही वाढत गेली.

अर्थातच इच्छापूर्ती साध्य करणे आणि भौतिक गरजा भागवणे एवढय़ावरच मानवी मन थांबणारे नव्हते. ऐहिक पातळीवरील जन्ममृत्यूशी जोडले गेलेले विश्व अशाश्वत आहे याची जाणीव झाल्यावर, वैश्विक पातळीवरील ‘शाश्वत’ काय आहे आणि त्या शाश्वताशी आपण कसे जोडलेले आहोत यासंबंधीची जिज्ञासा मानवाच्या मनात निर्माण झाली नसती तरच नवल होते. मानवी जिज्ञासेचे मूळ त्याला वाटणाऱ्या कुतूहलामध्ये आहे. कुतूहल हा मानवी मनाचा एक अविभाज्य भाग आहे, किंबहुना ती मानवामध्ये उपजतच असलेली एक अंतर्ऊर्मी आहे. कुतूहलापोटी मानवाला त्याच्या अवतीभोवतीची सृष्टी, सृष्टीचक्र, विश्वाची उत्पत्ती, जन्ममृत्यूचे चक्र, मृत्यूच्या पलीकडचे जग यांसारख्या अज्ञाताच्या परिघातील घटितांबद्दल अनेक प्रश्न पडणे आणि त्याने आपल्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे, हे स्वाभाविकच आहे.

थोडे खोलात जाऊन विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला की लक्षात येते की, ऐहिकाच्या पातळीवरील उपासनेचा मार्ग ठरवणारे सांप्रदायिक आचारविधी असोत की विज्ञानाच्या दाव्यानुसार गवसलेले ‘सत्य’ असो किंवा आध्यात्मिक पातळीवरील साक्षात्काराने उमजलेले तत्त्वज्ञान असो, या सर्व गोष्टी मानवी कुतूहलाच्या परिघातीलच आहे. म्हणूनच ज्ञान-विज्ञान हे दोन्ही मानवी जीवनाचे अत्यावश्यक आधार आहेत. एकाशिवाय दुसरे अपूर्ण असल्याचा अनुभव आपण पदोपदी घेतच असतो.

विश्वाच्या निर्मितीचा किंवा कोणत्याही निर्मितीचा प्रश्न आपल्यासमोर असतो, तेव्हा त्या निर्मितीचा सहसंबंध ‘जन्म’ या घटिताशी आपण सहजऊर्मीने जोडतो. असे मानले जाते की मानवी वाटचालीतील सुरुवातीच्या टप्प्यावर स्त्री ही जन्मदात्री आहे हे उघड सत्य असल्यामुळे स्त्रीतत्त्वाला मानवी श्रद्धाप्रणालींमध्ये प्राधान्य मिळावे, हे नैसर्गिक होते. या श्रद्धाप्रणालींमध्ये एक प्रकारचे कुतूहलपूर्ण आकर्षण आणि भय अशा संमिश्र भावनांचा समावेश होता. प्रजननाच्या प्रक्रियेतील पुरुषाची भूमिका अध्याहृत होती ंकिंवा असेही असू शकते की सुरुवातीला तिच्यासंबंधीचे अज्ञानच होते. त्या सुरुवातीच्या काळात स्त्रीतत्त्वाला ‘विश्वाची जननी’ या नात्याने अनन्य स्वरूपाचे स्थान आपोआपच मिळाले.

पशुपालन आणि शेती यांच्यावर आधारित निर्वाहपद्धतीमध्ये कृषी उत्पादन, कुटुंबाचा निर्वाह, साधनस्रोतांचे व्यवस्थापन यामध्ये स्त्रियांची भूमिका आधारस्तंभाप्रमाणे होती. त्या निर्वाहपद्धतीमध्ये ‘माता’ हे बिरुद आणि त्याबरोबर येणारे मोठेपण स्त्रीला नैसर्गिकपणे मिळाले; या मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर विश्वाच्या मूलकारणाची महत्ता स्त्रीतत्त्वाकडे विनासायास दिली गेली. ‘विश्वाचे मूलकारण – आदिमाता’ ही स्वयंभू असल्याची संकल्पना मानवी समाजांमध्ये सहजपणे स्वीकारली गेली आणि समाजमनामध्ये रुजली.

या संदर्भात रवींद्रनाथ टागोरांच्या ‘मदर’ या कवितेतील एका कडव्याचा अनुवाद करून इथे देत आहे. ‘आई’ या संज्ञेभोवती गुंफलेल्या वैश्विक अनुभवाचे अत्यंत समर्पक वर्णन त्यांनी या ओळींमध्ये केलेले आहे.

I cannot remember my mother

Only when from my bedroom

window I send

My eyes into the blue of the distant sky,

I feel that the stillness

My mother’s gaze on my face

Has spread all over the sky

आई माझी मला स्मरत नाही

फक्त जेव्हा शयनगृहाच्या गवाक्षातून

दूरवर आकाशात झेपावते माझी नजर

फिरते अथांग निळ्या आकाशातून

माझ्या चेहऱ्यावर विसावलेली तिची नजर

उरलेली आकाश व्यापून

आदिमातेचे ममत्व जन्मदात्या आईच्या ममत्वाप्रमाणे सुखदायी आहे आणि तिचा क्रोध भयकारी आहे, या कल्पनेतून जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये आदिमातेला म्हणजेच विश्वजननीला अधिष्ठात्या देवतेचे स्थान मिळाले आणि स्थलकालानुरूप तिला अनेक गुणरूपांची आणि नामांची जोड मिळत गेली. आदिमातेच्या अनंत नामरूपांना जगभरातील संस्कृतींमध्ये देवीस्वरूपात प्रतिष्ठापित केले गेले. यामध्ये अनेक ग्रामदेवींचे उन्नयन होऊन त्यांनाही विश्वजननीच्या अनेक नामरूपांच्या पसाऱ्यात सामावून घेतले गेले. या सर्व नामरूपांचा आढावा घेताना प्रकर्षांने लक्षात येणारी गोष्ट म्हणजे आपण आपल्या आराध्य देवीचे लेकरू आहोत, ती प्रसन्न असेल तर तिच्या अथांग कृपेचे छत्र आपल्याला लाभेल आणि त्यायोगे या संसारातील अडचणींचे निवारण होऊन आपले जीवन सोपे व समृद्ध होईल ही श्रद्धा हा तिच्याविषयीची भक्ती आणि आराधना यांमधील एक भाग असतो. ती कोपली तर आपला विनाश अटळ आहे ही भीती, हा त्यातील दुसरा भाग असतो.

स्थानिक ग्रामदेवी असो की समाजातील एखाद्या मोठय़ा समाजाची कुलस्वामिनी म्हणून मान्यता पावलेली असो, सहसा त्या देवीचे स्थान हे एकटीचे स्वतंत्र असते. उदाहरणार्थ, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका, मांढरदेवची काळूबाई अगदी उत्तरेकडची जम्मू आणि काश्मीरमधली वैष्णादेवी तसेच दक्षिणेची कन्याकुमारी अशा अनेक देवी आहेत, ज्या वर्षांनुवर्षे एकटय़ा उभ्या आहेत, त्या कुमारी आहेत किंवा आपापल्या स्थानांवर त्यांच्या पतीशिवाय स्थित आहेत. त्या स्वयंभू असल्याची ती खूण आहे, परंतु पुरुषप्रधान समाजामध्ये त्यांचे असे एकटे असणे अवघडलेपण निर्माण करू लागले; त्यांच्या एकटेपणाचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता भासू लागली. भारतामध्ये प्राचीन काळापासून कथेकरी परंपरा रुजलेली आहे. लोकांना सहज पटतील अशा कथांद्वारे अनाकलनीय वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण देणे, हे कथेकरी परंपरेचे वैशिष्टय़ असते. त्याद्वारे स्वतंत्रपणे पुरुष सहाचराशिवाय असणाऱ्या देवीचे स्वयंभू मातृरूप, समाजमन दैवी चमत्कार म्हणून सहजपणे स्वीकारू शकते.

आपली पुराणे ही एक प्रकारे कथेकरी परंपरेचाच परिपाक आहेत. परंतु हे फक्त भारतीय पुराणांच्याच बाबतीत खरे आहे, असे म्हणता येणार नाही तर जगभरातील संस्कृतींमध्ये कुमारी माता आणि असाधारण पुरुषांच्या अयोनिज जन्मांच्या कथा अशाच प्रकारे चालत आलेल्या दिसतात. म्हणजे मातृपद प्राप्त होऊनही मातेचे कुमारीत्व भंगत नाही आणि स्त्रीच्या पोटी गर्भरूपात राहिलेल्या पुरुषाच्या जन्माचे दैवी माहात्म्यही बाधित होत नाही. आपल्या पुराणांमधल्या अशा चमत्कृतीपूर्ण कथांशी नाते सांगणाऱ्या इतर संस्कृतींमधील कथांचा शोध घ्यायला फार दूर जायला नको. येशू ख्रिस्ताच्या जन्माची कथा आपणा सर्वाच्याच परिचयाची आहे. येशू ख्रिस्ताला जन्म दिल्यानंतरही त्याच्या मातेचे ‘मदर मेरी’ आणि ‘व्हर्जनि मेरी’ हे दोन्ही परिचय पूजनीयच मानले जातात. दैवी पातळीवर समागमाशिवाय गर्भधारणा होण्याची अनेक उदाहरणे देशोदेशींच्या पुराणकथांमध्ये आढळतात. ग्रीक भाषेत ‘पाथ्रेनॉस’ या शब्दाचा अर्थ कुमारी असा आहे. ‘पाथ्रेनोजेनेसिस’ म्हणजे कुमारी मातेद्वारे समागमाशिवाय झालेला जन्म. अशा जन्माचे आणखी एक उदाहरण म्हणजे प्राचीन इजिप्शियन देवी इसिस आणि तिचा मुलगा होरस यांच्या कथेचे। ओसिरिस हा देव इसिसचा पती होता. त्याच्या मृत्यूनंतर इसिस त्याच्या शवाभोवती बहिरी ससाण्याच्या रूपात घिरटय़ा घालत राहिली आणि तिला गर्भधारणा होऊन होरस या देवाचा जन्म झाला.

या कथांना आपण सर्वसाधारण व्यावहारिक तर्क लावू लागलो तर त्या अनाकलनीय आणि अशक्य कोटीतल्या वाटतात. परंतु आपण ज्या दैवी मातृरूपाची अनेक नामरूपे देऊन पूजा बांधतो, तिचे मूळ रूप सकल प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी तसेच सकल विश्व जन्माला घालणाऱ्या आदिमातेचे आहे. ती युगानुयुगे तिचे नवनिर्मितीचे काम चोखपणे पार पाडतेच आहे, स्वतच जन्माला घातलेल्या सृष्टीच्या विनाशाची लीलाही रचतेच आहे. जन्म-मृत्यूच्या या भवनाटय़ातून सुखरूपपणे पार पडण्यासाठी प्रसंगी तिच्या ममतेला आवाहन करत आणि प्रसंगी तिच्या रौद्र रूपाला शरण जात आपणही लौकिक जगातले उत्सव साजरे करत जगण्याचा अनुभव आनंदमय, कल्याणप्रद व्हावा म्हणून मनोमन तिची आळवणी करतच आहोत. अंतर्मनामध्ये तिला स्थित करून मोक्षमार्ग सापडावा म्हणून प्रतीक्षाही करत आहोत.

अक्क महादेवीने चन्न मल्लिकार्जुनाला विचारलेल्या प्रश्नाचे नेमके उत्तर विश्वाचे मूलकारण असणाऱ्या मातृरूपात युगानुयुगे स्थित असणाऱ्या स्त्रीतत्त्वाच्या आराधनेत अधिक नेमकेपणाने मिळते, असे मला वाटते. ती विचारते, कोणत्या मनाने देवा करू तुझे चिंतन आणि कोणत्या देहाने जगू या जगीचे जीवन? आदिमातेच्या आराधनेत हे द्वंद्व उमटत नाही. तिची सत्ता जेवढी लौकिकावर प्रस्थापित आहे तेवढीच पारलौकिकावरही आहे. तिच्या पायाशी लीन होणारा भक्त न दुभंगता लौकिक आणि पारलौकिक, प्रेयस आणि यस दोन्ही साध्य करतो!

सौजन्य : लोकप्रभा