खाडीकिनारी वसलेले ठाणे एक टुमदार शहर! तीन बाजूने खाडीकिनारा लाभल्याने या निसर्गरम्य शहराचे सौंदर्य आणखीनच खुलते. नुकतेच राज्य सरकारने ठाणे खाडीला सागरी अभयारण्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे खाडीचे मनमोहक दृष्य जर डोळय़ात साठवायचे असेल तर ठाणे पूर्वेकडील मीठबंदर परिसराला जरूर भेट द्यावी. खाडीच्या दुसऱ्या बाजूला दिसणारे निसर्गसौंदर्याने नटलेले खारफुटीचे जंगल, सकाळच्या प्रहरी दिसणारी फ्लेमिंगोंची लालसर रांग आणि संथ वाहणारी खाडी.. ही निसर्गरम्य सौंदर्य डोळय़ात साठवण्यासाठी या परिसराला जरूर भेट द्यायला पाहिजे.
ठाणे स्थानकापासून चालत १५ मिनिटांच्या अंतरावर मीठबंदर परिसर आहे. पूर्वी येथे मीठ तयार केले जाई, त्यामुळे या परिसराला मीठबंदर हे नाव मिळाले. हा परिसर प्रेक्षणीय स्थळ व्हावे यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. हा परिसर म्हणजे लाखो पक्ष्यांचे आश्रयस्थान. पहाटेच्या वेळेला फ्लेमिंगोसह विविध प्रजातीचे पक्षी येथे पाहायला मिळतात. त्यामुळे पक्षीनिरीक्षक व पक्षीप्रेमी सकाळी ६ ते ८ दरम्यान येथे हजेरी लावतात. खाडीच्या एका बाजूला कळवा पूल दिसतो, तर दुसऱ्या बाजूला खारफुटीचे जंगल आणि त्यातून डोकावणारे नवी मुंबई शहराचे पुसटसे चित्र दिसते. सकाळी व संध्याकाळी येथे परिसरातील फिरस्त्यांची बरीच गर्दी असते.
लहान मुलांना खेळण्यासाठी छोटासा बगिचा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खाडीकिनारी जाणाऱ्या रस्त्यावर वाघ, सिंह, हत्ती अशा विविध जंगली प्राण्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या रस्त्यावरून जाताना बच्चे कंपनीला या खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या प्राण्यांसोबत छायाचित्र काढण्याचा मोह आवरत नाही. खाडीकिनारी महापालिकेने एक खुली व्यायामशाळा सुरू केली आहे.
खाडीकिनारी मारुतीचे एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर पोतुर्गिजांच्या काळातील असल्याचे येथे लावलेला फलक सांगतो. पूर्वी या परिसरातील मिठाची वाहतूक करण्यात येत होती. त्यावेळी मीठवाहक कामगारांनी एकत्र येऊन या मंदिराची स्थापना केल्याचे बोलले जाते. चहूबाजूला उद्यान वसविण्यात आल्याने हे मंदिर खूपच आकर्षक व सुंदर वाटते. एक पुरातन तोफेचा अवशेषही आहे. परिसर अत्यंत शांत व निवांत असल्याने खाडीकिनारी भेट द्यायला येणारा फिरस्ता या मंदिरात गेल्यावाचून राहत नाही.

कसे जाल?
ठाणे खाडी, मीठबंदर कसे जाल?
* ठाणे स्थानक पूर्वेतून जाणारा मीठबंदर रोड ठाणे खाडीकिनारी जातो. येथे जाण्यासाठी चालत १५ मिनिटे लागतात.
– संदीप नलावडे