विरार पश्चिमेकडील जुन्या विवा कॉलेजच्या बाजूला असलेली ‘चेरीश होम्स’ या संकुलाच्या परिसराला निर्सगाचे वरदान लाभले आहे. निसर्गसान्निध्यातील संकुल असा लौकिक जपत येथे सर्वधर्मीय अगदी गुण्यागोविंदाने राहात आहेत. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, मालवणी, कोकणी, पानमाळी या सर्व जाती-धर्माचे लोक येथे राहतात. या संकुलामध्ये एकूण ६ सोसायटय़ा असून त्यात १५ इमारती आहेत. त्यात ५०० फ्लॅट्स आहेत.

संकुलाच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांची, रोपांची लागवड करण्यात आली आहे. अशोकाचे झाड, ख्रिसमस ट्री, गुलाब, चाफा, नारळ, निलगिरी अशा प्रकारची विविध झाडे येथे पाहावयास मिळतात. मैदानी खेळांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यासाठी संकुलात एक मोठे मैदान आहे. आजच्या संगणकीय जगात मैदानी खेळांचा विसर पडू नये यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे संकुलातील रहिवासी म्हणतात. तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी संकुलातील आवारात एक कट्टा देखील आहे. सायंकाळी येथे ज्येष्ठांच्या गप्पांचा फड रंगतो. या गप्पांच्या वेळी आपला वेळ घालवण्यासोबत संकुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखरेख करण्यास या ज्येष्ठांची मदत होते असे रहिवासी सांगतात. सुरक्षेसाठी संकुलात सीसीटीव्ही बसवण्यात आलेच आहेत. तसेच वेळोवेळी स्वच्छतेबाबत जनजागृती करत स्वच्छता अभियानही राबविण्यात येते.

या ठिकाणी महाविद्यालय अगदी बाजूलाच असल्याने विद्यार्थ्यांना लांब जावे लागत नाही. दिवाळीमध्ये आयोजित केली जाणारी सत्यनारायण पूजा, विविध कार्यक्रम, रांगोळी, नृत्य स्पर्धा, नाटक, विविध मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम याचबरोबर जेवणाचा समारंभ देखील आयोजित केला जातो. हा सर्व खर्च कोणत्याही प्रकारच्या वर्गणीतून न होता सोसायटी स्वत: करत असल्याचे सोसायटीमधील रहिवासी सुरेख कुरकुरे यांनी सांगितले. याचबरोबर महिला दिनही अगदी मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यावेळी सर्व महिला एकत्र येऊन जेवणाचा समारंभ करतात. गप्पागोष्टी, खेळ यांचा अनोखा संगम यावेळी पाहावयास मिळतो. महिलांचा दिवस असल्याने घरातील सर्व कामे, ताण विसरून अगदी या दिवशी महिला येथे आलेल्या दिसून येतात. या दिवशी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे न चुकता दरवर्षी आयोजन करण्यात येते.