News Flash

वसईतील ख्रिस्तायण : विवाह सोहळ्यांची परंपरा

वाडवळ विवाह सोहळे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वाडवळ विवाह सोहळे

वाडवळ समाजात लग्नसमारंभ शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस चालतात. मुलीच्या घरी निरोप पाठवण्यापासून सुरुवात होते, त्यानंतर पुढे भेटीगाठी होतात, मग त्या दोघांचा वाङ्मय केला जातो. त्या वेळी फादर येतात, विधीपूर्वक अंगठी एकमेकांच्या हातात परिधान केली जात आणि मुलाची बहीण मुलीच्या केसात गजरा माळते. त्यानंतर सर्वसाधारणपणे एका वर्षांनंतर लग्न लागते. तोपर्यंत योजना, व्यवस्थापन, जबाबदाऱ्यांचे वाटप इत्यादी गोष्टी केल्या जातात.

लग्नाला १५ दिवस आधी रोज रात्री वाडीतील स्त्रिया जमत आणि हिंदोळ्यावर बसून नवरा-नवरीसाठी वाडवळ भाषेतील लोकगीत म्हणत. लग्नाच्या दोन दिवस आधी गावातील लोक मिळून वर-वधूच्या घरासमोर मंडप बांधत प्रवेशद्वाराला केळीच्या खांबाला केळफूल असते, कारण केळफुलासारखा त्यांचा संसार खुलावा, अशी भावना असते. तसेच या प्रवेशाजवळ आडवे केळीचे लोद ठेवत. जेव्हा नवरा नवरीला घेऊन जातो, तेव्हा नवरा ते पायाने उडवतो. या वेळी तो आपले शक्तिप्रदर्शन करतो. मंडप बनला की तेथे बसून पेयपान आणि घुमट (मातीच्या मडक्यावर, घोरपडीच्या कातडे लावून बनवलेले वाद्य) तालावर गाणी म्हटली जात असत.

पुढल्या दिवशी पहाटे स्त्रिया जमून वडय़ासाठी साधारण ६० ते ९० किलो पीठ घालत. ज्यात उडीद, तांदूळ, तांदुळाची पिठी, गरम पाणी आणि त्यात दोन दिवसांपूर्वीची ताडी किंवा खमीर घालून वडय़ाचे पीठ डाळीत (लाकडी चौकोन) मळत असे. मग गावातील मुले डुक्कर आणण्यासाठी जात. मेलवीन डाबरे सांगतात की, ‘‘वाडवळ लग्नात विशेष इंदेलो, सरपतेल, मोइर आणि स्टू हे चार पदार्थ बनवले जात होते. पूर्वी या डुक्कराचे मांस घेतल्यानंतर त्याचे तेल काढले जात असे आणि त्यात हे वडे तळण्यात येत असे.’’ ११ वाजेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण केली जातात. त्या वेळी आलेल्या पाहुण्यांना कणेरी तांदळाच्या भरडेपासून बनवलेला पदार्थ दिला जातो. मग दुपारच्या जेवणासाठी वांगे, बटाटा आणि सुके बोंबील घालून हा पदार्थ बनवला जातो. पुन्हा संध्याकाळी वडे तळण्याचा चार-पाच तासांचा कार्यक्रम असे. तेव्हा लोक नटापट्टा करत, खूप गाणी गात असे. हे वडे दुसऱ्या दिवशी लग्नात ठेवत, गावात काही ठिकाणी वाटले जात आणि नवऱ्या किंवा नवरीकडे हे पाठवले जात. नंतर रात्री उंबराचे पाणी आणले जात असे. मग त्या सार्वजनिक पाणवठय़ावरून गावातील लोक गाणी गात, कंदील घेऊन, केळी खात पाणी आणायला जात असे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी हळद लावली जात असे. त्या वेळी भावुक गाणी गायली जात असे. मग नवऱ्याला आणण्यासाठी बॅण्ड जात असे. त्याच्या डोक्यावर लाल छत्री धरली जाते त्यानंतर मुलाकडची पाच मंडळी आणि बॅण्ड नवरीला आणायला जात तेव्हा तिच्यासाठी गजरा आणि पायातील वाळे नेत असे. मग धार्मिक विधी झाल्यानंतर वेशीवरून नवरीच्या घरी जातात. तेथे इतर प्रार्थना, भेटवस्तू देणे, सोन्याचे दागिने देणे, जेवण वगैरे झाल्यावर नाचगाणी करतात. या वेळी नवरीला नाचवले जाते, कारण त्या घरातला तिचा शेवटचा नाच असतो. मग नवऱ्याकडचे लोक बॅण्ड घेऊन येतात. हाच कार्यक्रम नवऱ्याच्या घरी होतो. दुसऱ्या दिवशी लग्नाला हातभार लावणारे लोक येतात. ते एकत्र बसून ताडी पितात, नंतर नवरीला चुडे भरले जातात. मग तिचे आई-वडील भेटायला येतात. नवऱ्याच्या घरी दुपारी माशांचे जेवण केले जाते. अशा पद्धतीने विवाह सोहळा संपन्न होतो.

ओळकर किंवा ईस्ट इंडियन विवाह सोहळे :

ओळकरांचे विवाह सोहळ्यांत वर किंवा वधूची आई वरमाई किंवा वधुमाई म्हणून निघते, तेव्हा तिच्यासोबत आणखी काही बायका नटापट्टा करून बाहेर पडतात. आळीतून जाताना त्या बॅण्डच्या किंवा घुमटाच्या तालावर लोकनृत्य सादर करतात आणि काही महिला लोकगीते गात असतात. मग सायंकाळी घराबाहेर ‘मानाची मुहरुत मेर’ (बोलीभाषेतील शब्द) करतात. म्हणजेच नारळाच्या झावळ्यांमध्ये विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले गुंफतात. या वेळी आजूबाजूचे लोक आनंदात उत्साहाने सामील होतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मांडव घालून, प्रवेशद्वाराजवळ केळीचे खांब रोवले जातात. मग रात्री तरुण-तरुणी अंगणात वडय़ाचे पीठ मळण्यासाठी येतात. एक प्रकारे त्यांच्यात कोण चांगले पीठ आणि लवकर पीठ मळते याची स्पर्धा लागलेली असते. सकाळी चुलीची सुपात आरती, केळी ठेवून पूजा केली जाते. एका ज्येष्ठ महिलेला तळण्याचा मान दिला जातो. ‘या गे वरे करावला’ असे गाणेही म्हटले जाते. अनेक शेजारी मदत करायला येतात. त्याचबरोबर फुगे, पापड तळले जातात. उडीद आणि तांदुळाच्या पीठापासून विशेष नवरा-नवरीचा आकार केळीच्या पानावर काढून तेही तळले जाते. मामा मोवा विधी (दाढी करण्याचा विधी) करतो. त्या वेळी साबणाचा फेस एकमेकांना लावत मज्जा केली जाते. नंतर सगळे कळशी घेऊन उंबराचे पाणी आणायला जातात. मग सकाळी त्यांना आंघोळ घालून मग बॅण्डसहित चर्चमध्ये लग्नासाठी जातात.  सॅमसन ग्रॅशिअस सांगतात की, ‘‘वसईतील विवाह पद्धतीवर, येथील मूळ संस्कृती परंपरांचा तसेच जे लोक बाहेरून येऊन या बंदरात वसले आणि पोर्तुगीज-ब्रिटिश ख्रिश्चन पद्धतीचा प्रभाव पडलेला आढळून येतो.’’

दिशा खातू

@Dishakhatu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 12:39 am

Web Title: articles in marathi on wedding ceremony
Next Stories
1 कल्याणमध्ये जमावाच्या हल्ल्यात पत्रकार जखमी
2 महागडी वैद्यकीय साधने आता किफायतशीर
3 भिवंडीत डोंगरावर इमले
Just Now!
X