बेकायदा बांधकामांमुळे पालिकेच्या योजनेत अडथळे

वसई-विरार महापालिकेने शहरात वनीकरणाच्या घेतलेल्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात अतिक्रमणांचा अडथळा निर्माण झाला होता. बिलालपाडा, पेल्हार येथे अतिक्रमण झाल्याने पालिकेला नव्या जागेचा शोध घ्यावा लागला. अतिक्रमणांमुळे महापाकिला विरार येथील कोशींबे गावातील जागेवर वनीकरण करावे लागणार आहे.

महापालिकेने शहरातील २५० हेक्टर जागेवर जंगल तयार करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. एकूण तीन टप्प्यात २५० हेक्टर जागेवर वनीकरण करून कृत्रिम जंगल तयार केले जाणार आहे. २०१७ च्या पहिल्या टप्प्यात शिरगाव, गास कोपरी आणि नारिंगी येथील ५० हेक्टर जागेवर ५५ हजार झाडे लावण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात शिरगाव, खंदरपाडा शिरगाव येथील ५४ हेक्टर जागेवर ६० हजार आणि निर्मळ, तसेत शिरगाव तलाव परिसरात १० हजार झाडे लावण्यात आली आहेत. पहिल्या दोन टप्प्यात मिळून १०४ हेक्टर जागेवर वनीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित १४६ हेक्टर जागेवर वनीकरण बाकी आहे.

तिसऱ्या टप्प्यात धानीव, बिलालपाडा, पेल्हार आणि चंदनसार येथे वनीकरण करण्यात येणार होते. परंतु या भागातील बिलालपाडा, पेल्हार येथे अतिक्रमण असल्याचे आढळून आले आहे अतिक्रमण करणाऱ्यांना वनविभागाने प्लॉटही हस्तांतरीत केलेले आहे. चंदनसार येथे उतार असल्याने तेथे वनीकरण शक्य नसल्याने लक्षात आले. १४६ हेक्टरपैकी केवळ ५० जागा वनीकरणासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे आता कोशिंबे येथील भूमापन क्रमांक १५२ येथे ११० हेक्टर जागेवर वनीकरण केले जाणार आहे. शिरसाड वनक्षेत्रपालांनीही या जागेला मंजुरी दिली आहे.

वनीकरणाच्या दोन्ही टप्पे यशस्वी झाले होते. तिसऱ्या टप्प्यात अतिक्रमणाची अडचण आली. मात्र आम्ही कोशिंबे येथील जागेचा शोध घेतला आहे आणि त्याला वनविभागाचीही मंजुरी मिळालेली आहे, असे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले. आमची वनीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण होत आहे, असेही ते म्हणाले.

वनीकरणाच्या या पहिल्या टप्प्यातील जंगलासाठी २ कोटी ९४ लाख रुपये एवढा खर्च आला होता. दुसऱ्या टप्प्यात ३ कोटी ६५ लाख रुपये एवढा खर्च आला तर तिसऱ्या टप्प्यात दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

वनीकरण प्रकल्प काय आहे?

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड या संस्थेमार्फत टप्प्याटप्प्यायने वनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने वनविभागाशी करार केला आहे. पाच वर्षांत ही वृक्ष लागवड केली जाणार असून सात वष्रे वनविभागामार्फत वृक्षांची देखभाल केली जाणार आहे. वनीकरणात बांबू, वड, आंबा, पिंपळ, काजू, विलायती चिंच, खैर, बेल, गुलमोहर, सिताफळ, सावर, रिठा, कडुलिंब, करंज. मोहा, जांभूळ, सप्तपर्णी, बकुळ, चिंच, कदंब, मोहगणी, आपटा, ऐन आदी झाडांचा समावेश आहे. वनविभागाच्या भूखंडाव्यतिरिक्त जे इतर वनविभागाचे भूखंड महानगरपालिकेच्या हद्दीत येत आहेत त्याच्या मंजूर विकास आराखडा (डीपी) नकाशानुसार रेखांकन करून टप्प्याटप्प्याने त्रीपक्षीय करारानुसार वनीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात जी झाडे लागू शकतील, अशीच झाडे लावण्यात येणार आहे. जेणेकरून पाणी आणि देखभालीच्या इतर खर्चात बचत होणार आहे. या ठिकाणी पर्यटनस्थळ, फॉरेस्ट पार्क, पक्षीअधिवास, हरिण पार्क, औषधी वनस्पती उद्याने विकसित केले जाणार आहे.