ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या जलस्त्रोतांमध्ये गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होऊ नये यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या कृत्रिम तलावाच्या प्रयोगाला भक्तांकडून उत्तम प्रतिसाद मिळू लागला असून बुधवारी दिवसभरात या तलावांमध्ये १६ हजार ५७३ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेश मूर्तीची संख्या पाचशेनी वाढली आहे, अशी माहिती ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी पत्रकारांना दिली. शहरात ठिकठिकाणी महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये ९१० मूर्ती आल्या असून या सर्व गणेश मूर्तीचे महापालिकेने विधिवत विसर्जन केले आहे. दीड दिवसांप्रमाणे पाच आणि दहा दिवसांच्या गणेश विसर्जनालाही भक्तांनी कृत्रिम तलावांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

ठाणे महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पने अंतर्गत  यंदाही महापालिकेने शहरात दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनी वाडी) येथे कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. तर पारसिक रेतीबंदर अणि कोलशेत बंदर येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था केली आहे. तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाण्यातील तलावांचे प्रदूषण टाळले जावे यासाठी यंदाच्या वर्षी कृत्रिम तलावांचा अधिक प्रमाणात वापर केला जावा, असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते. याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा कृत्रिम तलावांमध्ये शहरातील दीड दिवसांच्या तब्बल १६,५७३ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे.  गेल्या वर्षी १६,०३३ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे यंदा गणेश मूर्तीच्या संख्येत ५४० इतकी वाढ झाली आहे. निर्माल्यासाठी विसर्जन घाटाजवळ निर्माल्य कलशची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विसर्जन घाटांच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

१६५०० गणेश मूर्तीचे विर्सजन

ढोल-ताशे तसेच डीजेच्या दणदणाटात भाविकांनी गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुका  काढल्या होत्या. मिरणुकानंतर शहरातील कृत्रिम तलावांमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मासुंदा तलावामध्ये २२५२, रायलादेवी येथील दोन कृत्रिम तलावात २०४६, उपवन आणि नीळकंठ ग्रीन येथील दोन कृत्रीम तलावामध्ये २७९५, आंबेघोसाळे यथील कृत्रिम तलावामध्ये ८७२, पारसिक येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाटावर ६८४, आणि कोलशेत घाटासह इतर सात विसर्जन घाटांवर ३११५, कळव्यातील विविध विसर्जन घाटावर १३९७आणि कोपरी परिसरातील घाटावर ९७२, मुंब्य्रात १७ ठिकाणी १०४५ अशा एकूण १६५७३ गणेश मूर्तीचे विर्सजन करण्यात आले.