18 January 2021

News Flash

मुंबई, ठाण्यात डाळींची कृत्रिम भाववाढ?

सर्वसामान्य नागरिकांना येत्या काळात कृत्रिम दरवाढीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

संग्रहित छायाचित्र

जयेश सामंत

मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांना पुढील दोन महिने पुरेल इतका प्रचंड असा धान्यसाठा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या घाऊक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असतानाही गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच डाळी आणि धान्यांचे दर वाढू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना येत्या काळात कृत्रिम दरवाढीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

राज्यभर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित असावा यासाठी राज्य सरकारने सुरुवातीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या घाऊक बाजारपेठा सुरू ठेवल्या आहेत. मुंबई तसेच आसपासच्या परिसरास गेल्या काही दिवसांपासून भाजी तसेच फळांचा थेट पुरवठा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अन्नधान्य बाजार अजूनही बाजार समितीच्या नियमन क्षेत्रात येत असला तरी करोना संकटामुळे सरकारने अन्नधान्याची वाहनेही थेट मुंबई, ठाण्यात नेता येतील अशी सवलत देऊ केली आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर अन्नधान्याची आवक होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने २१ दिवसांची पहिली टाळेबंदी लागू केली तेव्हापासून मुंबई, ठाण्याच्या दिशेने

पावणेचार लाख क्विंटल इतक्या अन्नधान्याची आयात झाली आहे. महानगर क्षेत्रातील लोकसंख्येला किमान दोन महिने पुरेल इतका हा साठा असल्याचा दावा बाजार समितीमधील वरिष्ठ अधिकारी करत आहे. याशिवाय टाळेबंदीचा काळ लक्षात घेता घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी गेल्या पंधरवडय़ापासून अन्नधान्याचा अतिरिक्त साठा मागविण्याचा धडाकाच लावला आहे. गेल्या महिनाभरात वाशी येथील अन्नधान्याच्या बाजारात पावणेनऊ लाख क्विंटल इतक्या अन्नधान्याची आवक झाली आहे. हे प्रमाणही इतर दिवसांच्या तुलनेत बरेच मोठे आहे. घाऊक बाजारात इतक्या मोठय़ा प्रमाणावर अन्नधान्याचा साठा होऊ लागल्याने मध्यंतरी राज्य सरकारकडून या ठिकाणी धाडीदेखील टाकण्यात आल्या होत्या.

स्थिती काय?

बाजार समितीमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार पहिल्या टाळेबंदीनंतर मुंबई शहराच्या दिशेने जवळपास पावणेचार लाख क्विंटल इतका अन्नधान्याचा साठा वाशी बाजारातून रवाना झाला आहे. तर पावणेनऊ लाख क्विंटल इतक्या प्रचंड प्रमाणात डाळी आणि इतर धान्यांचा साठा आजही घाऊक बाजारात उपलब्ध आहे. त्यानंतरही जवळपास सर्वच डाळींच्या घाऊक दरात किलोमागे १० ते २० रुपयांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात प्रमुख डाळींच्या किमती किलोमागे १२५ ते १४५ रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रात टाळेबंदीनंतर मोठय़ा प्रमाणावर अन्नधान्याचा साठा रवाना झाला असून बाजार समितीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार किमान दोन ते अडीच महिने पुरेल इतके धान्य मुंबईत उपलब्ध आहे. वाशी येथील घाऊक बाजारातही मोठय़ा प्रमाणावर धान्याचा साठा उपलब्ध असून अन्नधान्याचा कोणताही तुटवडा निर्माण होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. घाऊक आणि किरकोळ बाजारात दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे ही वस्तुस्थिती आहे.

– अविनाश देशपांडे, सह-सचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

दरवाढ कशी?

टाळेबंदीपूर्वी किलोमागे ८० ते ९० रुपयांनी विकल्या जाणाऱ्या तूरडाळीचे दर १०० ते ११० रुपयांपर्यत पोहोचले असून मसूर मूगडाळ (१०० ते १२० रुपये), उडीद डाळ (९० ते ११०), काबुली चणा ( ६० ते ७५ रुपये), वाल ( ६५ ते

७५) रुपयांनी विकले जात आहेत. मोठा धान्यसाठा उपलब्ध असतानाही घाऊक बाजारात डाळींचे दर किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढल्याने किरकोळ बाजारात तर ग्राहकांची अक्षरश: लूट सुरू झाली आहे. मुंबई, ठाण्यातील किरकोळ बाजारात काही ठिकाणी उत्तम प्रतीची तूरडाळ १४० रुपयांनी विकली जात असून इतरही प्रमुख डाळींच्या किमती किलोमागे १२५ ते १४० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 1:05 am

Web Title: artificial price rise of pulses in mumbai thane abn 97
Next Stories
1 जलप्रदूषण थांबल्याने कल्याण खाडीत मत्स्यसंपदा
2 कल्याण-शिळफाटा मार्गावरील विकासकामांना प्रारंभ
3 टाळेबंदी वाढल्याने लघुउद्योग संकटात
Just Now!
X