News Flash

शहरबात : गलथानपणा की कृत्रिम पाणीटंचाई?

धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी वसई-विरारमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

शहरबात

सुहास बिऱ्हाडे

धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी वसई-विरारमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या मुद्दय़ावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. ही पाणीटंचाई म्हणजे प्रशासनाचा गलथानपणा आहे का?

गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार शहरातील पाणीप्रश्न उग्र झाला आहे. शहरातील अनेक भागांत अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईच्या मुद्दय़ांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. जलकुंभ बनविण्याचे, नव्या जलवाहिन्या अंथरण्याचे काम पूर्ण झालेले नाही. दुसरीकडे सूर्या पाणी प्रकल्पाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठय़ावर परिणाम होऊ लागला आहे.

पालिकेच्या आकडेवारीनुसार सध्या शहराची लोकसंख्या ही २४ लाखांच्यावर आहे. शहराला सूर्या पाणी प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २०० दशलक्ष लिटर्स, उसगाव आणि पेल्हार धरणातून मिळून एकूण २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत आहे. सध्या वसई-विरारला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरली आहेत. तरी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विरारमध्ये तर विविध संघटनांतर्फे तसेच नागरिकांतर्फे पालिकेवर पाण्यासाठी मोर्चे काढण्यात आले. सर्वाना पाणी मिळावे यासाठी पालिकेने २०१६ मध्ये १३९ कोटी रुपयांच्या अमृत योजनेला मंजुरी दिली होती.  या योजनेंतर्गत १८ जलकुंभ उभारणे तसेच ३८४ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामाचा समावेश होता. शहरात असलेल्या जुन्या जलवाहिन्या कमी व्यासाच्या होत्या. तसेच त्या गंजल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळायचे. या सर्व जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार होत्या. मात्र ही योजना रखडली आहे. मागील चार वर्षांत ठेकेदाराने केवळ चार जलकुंभ बांधले आहेत. याशिवाय ३८४ किलोमीटरच्या जलवाहिन्यांपैकी केवळ १८२ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.  शहराच्या पश्चिम पट्टय़ातील गावांना अद्याप पाणी मिळालेले नाही. तसेच शहराच्या अनेक भागांत जलवाहिन्याच नसल्याने त्यांना पाणी देता येत नाही. मुबलक पाणी असल्याने मागेल त्याला नळजोडणी, अशी पालिकेची भूमिका आहे. परंतु ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेचा त्याला फटका बसला आहे. नळजोडणीचे अर्ज करणाऱ्यांना त्यांच्या भागात जलवाहिन्या नसल्याने नळजोडणी देता येत नाही.

विरार पूर्वेकडील फुलपाडा आणि इतर परिसरांना पापडखिंड धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. त्या धरणाची योग्य निगा राखली जात नसल्याने धरणाचे पाणी दूषित झाले होते तरी ते पाणी नागरिकांना दिले जात होते. त्याचे शुद्धीकरणही योग्य पद्धतीने केले जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. पालिकेच्या पाणीपट्टीची भरमसाट देयके भरायची आणि तरी पाणी नसल्याने टँकरचे पाणी मागवून त्यावर खर्च करायचा, अशी येथील नागरिकांची अवस्था  होती. पालिकेच्या वॉलमन आणि पाणी अभियंत्यांकडून  उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. वास्तविक पापडखिंड धरणाचा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी दोन वर्षांपूर्वीच दिले होते. मात्र तरीदेखील हा पाणीपुरवठा सुरू होता. आता पालिकेने नव्याने पापडखिंड धरणाचे पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. येथील नागरिकांना सूर्याचे पाणी दिले जाणार आहे. परंतु पुन्हा जलकुंभ नसण्याची समस्या आडवी येणार आहे.

शहरी भागाबरोबर वसईच्या ग्रामीण भागातली पाणीटंचाई जाणवत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वसईच्या पूर्वेकडील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. वसई पूर्वेतील गावात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागत आहे.

पूर्वेकडील गावांना पाणी पोहचले नसल्याने येथील नागरिकांना विहिरी, तलावे आणि बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. वसई पूर्वेतील भागात कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा या परिसरांत पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील नागरिकांची वणवण सुरूच आहे.

जिथे पाणी मिळेल तेथून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत येथील गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र ते ही काम पूर्ण न झाल्याने पालिकेने यासाठी पुढाकार घेऊन जलवाहिन्या अंथरण्याचे काम सुरू  केले असून कामण, देवदल, चिंचोटी, पेल्हार, कोल्ही, या ठिकाणी १००, १५०, २०० मीमी लांबीच्या व्यासनिहाय जलवाहिन्या अंथरुण येथील पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात येणार होत्या, परंतु त्या कामातही दिरंगाई होत असल्याने अजूनही या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध झाले नाही.

सूर्या पाणी प्रकल्पाचा वीजपुरवठा २४ वेळा खंडित

पाणीपुरवठा वारंवार खंडित होण्याचे आणखी एक कारण म्हणजे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २०० दशलक्ष लिटर्स पाणी हे सूर्या प्रकल्पातून उचलले जाते. पालघरजवळील मासवण येथील उदंचन केंद्रात ते पाणी आणले जाते आणि धुकटण येथील केंद्रात त्याचे शुद्धीकरण केले जाते. उदंचन केंद्रात पाणी आणणे, ते शुद्धीकरण केंद्रात नेणे आणि तेथून पुरवठा करण्यासाठी मोठय़ा क्षमतेची वीज लागते. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने पाणीपुरवठादेखील खंडित होतो. एक मिनिट जरी वीज खंडित झाली की सर्व पंप बंद पडतात. एक पंप पुन्हा सुरू होण्याासाठी १५ मिनिटांचा काळ लागतो. त्यामुळे पाणीपुरवठा बराच काळ खंडित होतो आणि पुढील पाणीपुरवठादेखील अनियमित दाबाने होत असतो. जानेवारी महिन्यात १२ वेळा आणि फेब्रुवारी महिन्यात १२ वेळा अशी दोन महिन्यांत एकूण २४ वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम झाला होता. महावितरणाने काहीच तांत्रिक दोष नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणी कृत्रिमरीत्या पाणीटंचाई निर्माण करत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बहुजन विकास आघाडीने तर हेतुपुरस्सर पाणीपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप केला आहे. निवडणुका तोंडावर आल्या की असे प्रकार करून आमच्याबद्दल जनतेच्या मनात रोष उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला जातो असे ‘बविआ’ने सांगितले आहे.

वाढत्या लोकसंख्येला साडेतीनशे दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. सध्या २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. त्यातही गळतीमुळे तूट असते. त्यामुळे आहे ते पाणी सर्वाना समान पद्धतीने मिळायला हवे, याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्यासाठी राजकारण होतच राहील, परंतु यात सर्वसामान्य नागरिक भरडला जाणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2021 1:44 am

Web Title: artificial water crises dd 70
Next Stories
1 महिला दिनानिमित्त ठाण्यात महिला लसीकरण केंद्रे
2 बांधकाम व्यावसायिकांना थेट नद्यांतून पाणी!
3 हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ कायम
Just Now!
X