सेंचुरी रेयॉन महिला प्रगती संस्थेच्या वतीने अलीकडेच शहाड येथील सेंच्युरी रेयॉन वसाहतीत कलांगण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यात निरनिराळ्या हस्तकलांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तसेच विविध कलावंतांनी पारंपरिक लोककला सादर केल्या. मुंबईतील काळा घोडा महोत्सवाच्या धर्तीवर ठाणे परिसरातील कलावंतांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने राबविण्यात आलेल्या या महोत्सवात अनेक कलावंतांनी कला सादर केली.
यंदाच्या कलांगण उत्सवात वारली चित्रकला, फॅब्रिक आर्ट, कॅनव्हास पेंटिंग, मातीपासून घडविलेली आकर्षक कलाकृती, कागदापासून बनविलेल्या विविध उपयोगी वस्तू तसेच क्रोशिया वर्क आदी कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे लोकसंगीत, लोकनृत्याचे सादरीकरणही झाले. त्याला उपस्थित रसिकांनी दाद दिली. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आदी परिसरातील शेकडो कलाप्रेमी नागरिक या कलांगण महोत्सवात सहभागी झाले होते.
मुंबई येथील सुप्रसिद्ध काळा घोडा फेस्टिव्हलपासून प्रेरणा घेऊन ‘कलांगण’ हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संतोष चितलांगे यांनी दिली. याप्रसंगी सेंच्युरी रेयॉनचे वरिष्ठ अध्यक्ष ओ.आर. चितलांगे, निर्देशक अमित रॉय, कलाकार पवन मल्होत्रा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.