ठाणे पूर्व परिसर तसा विविध समाज घटकांनी विभागला गेला आहे. मराठी, कोळी,  सिंधी, दाक्षिणात्य समाज येथे मोठय़ा प्रमाणात आढळतो. परंतु विकासाच्या दृष्टीने पश्चिम विभागाच्या तुलनेत हा भाग मागासलेलाच राहिला आहे. ४०  ते ५० वर्षांपूर्वी येथे लोकवस्ती जेमतेम होती. खाडी परिसर असल्याने जागाही ओसाड होती. अजूनही येथे मिठागरे आहेत. ऐतिहासिक वारसा असला तरी तो फार काही चर्चिला गेला नाही. दर वर्षी निवडणुकीच्या वेळी या भागातील नागरिकांना विकासाची स्वप्ने दाखवली जातात. मात्र आतापर्यंत ती कधीही पूर्ण होऊ शकली नाहीत. गेल्या ४० वर्षांत ठाणे पूर्वेकडेही मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली. अनेक विकासकांनी येथे पाय रोवले. कन्हय्यानगर त्यापैकीच एक.
कन्हय्यानगर,
मुंबई महापालिकेच्या कोपरीतील क्षेपणभूमी दरुगधीचा सर्वाधिक त्रास सहन कराव्या लागणाऱ्या ठाणेकरांमध्ये कन्हय्यानगरवासीयांचा समावेश होतो. १५ हजार ८३२ चौरस यार्डमध्ये वसलेल्या या संकुलामध्ये तळ अधिक तीन मजल्यांच्या आठ आठ इमारती आहेत. जुलै १९७२ मध्ये हे संकुल उभे राहिले. या इमारतींमध्ये एकूण १२८ सदनिका आहेत. ४२ वर्षांपूर्वी येथील सदनिका केवळ ३५ ते ४० हजार रुपयांना मिळत होत्या. आता येथील घरांच्या किमती कैकपट वाढल्या आहेत.  कन्हय्यानगरमध्ये ७० टक्के  सिंधी समाज आहे. मराठी आणि दाक्षिणात्य समाजासह इतर भाषिकांचे प्रमाण अल्प आहे. विविध समाजाचे लोक येथे राहत असले तरी येथे कधीही कोणताही तंटा, वादविवाद झालेला नाही. हे या संकुलाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. काही जण नोकरदार तर काही व्यापारी आहेत. अशा या मध्यमवर्गीयांच्या वसाहतीची सोसायटी म्हणून नोंदणी १९७६ मध्ये झाली.नादुरुस्त रस्ते, अतिक्रमण, दरुगधी या कन्हय्या नगर संकुलातील प्रमुख समस्या आहेत. महापालिका प्रशासनाने या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याची तक्रार कन्हय्या नगर को-ऑ. सोसायटीचे अध्यक्ष रत्नाकर सावंत आणि सचिव वालू कृपलानी यांनी केली आहे.
रस्त्यावर वाहनांचे अतिक्रमण
या भागात कचरा उचलणारी घंटागाडी कधीच वेळेवर येत नाही. संकुलातील बाहेरील रस्त्यावर बेकायदा वाहनतळ सुरू झाले आहे. परिसरातील दुचाकी, कार, शालेय बसेस रस्त्यावर बिनधास्तपणे उभ्या केल्या जातात. संकुलाच्या प्रवेशद्वारासमोरच गाडय़ा उभ्या करून ठेवल्या जात असल्याने प्रवेशद्वारातून आत येणे आणि बाहेर पडणे कठीण जाते. खड्डय़ांनी या रस्त्याची अक्षरश: चाळण केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही त्याची दुरुस्ती होत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. भरलेले गॅस सिलेंडर येथे वाहनातून सावकाशपणे न उतरविता ते येथील रस्त्यावर टाकले जातात ते धोकादायक आहे. तसेच भटक्या कुत्र्यांची दहशत असल्यामुळे त्यांची भीतीही कायम असते,अशीही रहिवाशांची तक्रार आहे.
शोभिवंत संकल्पित धबधबा चौकाची दुर्दशा
संकुलाच्या बाहेर परिसराचे सौंदर्य वाढविण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी वाहत्या पाण्याचा संकल्पित धबधबा चौक बांधण्यात आला आहे. काही दिवस तो सुस्थितीत होता. मात्र सध्या देखभालीअभावी त्याची दुर्दशा झाली आहे. त्यातील पाणी वाहणे बंद झाले आहे. त्यामुळे सौंदर्य राहिले बाजूला साचलेल्या पाण्यामुळे दरुगधी आणि मच्छरांची पैदास झाली आहे. त्याचा त्रास या चौकामागील बाजूस राहणाऱ्या कन्हय्यानगर संकुलातील रहिवाशांना गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. त्यामुळे त्यांना आजारांनाही सामोरे जावे लागले आहे. चौकात कचरा टाकला जात असून चौकाचा वापर जाहिरात फलक लावण्यासाठी उपयोगात आणला जात आहे. एक तर चौक सुस्थितीत ठेवा अन्यथा तो तेथून हटवा, अशी मागणी आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे येथील रहिवाशी संदीप दळवी यांनी सांगितले.
कचऱ्याबाबत पालिकेचे आडमुठे धोरण
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिकेने कन्हय्या नगर संकुलाचा कचऱ्यावरून छळ करण्यास सुरू केले आहे. संकुलाच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देणे सुरू केले आहे. इमारतीत बांधकाम आणि वापर परवाना कचऱ्याची विल्हेवाट संकुलाच्या आवारातच करण्याच्या अटीवर देण्यात आला होता. त्याची जाणीव पालिकेच्या वतीने सातत्याने करून देण्यात येत आहे. आम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावू, परंतु आमच्या संकुलात त्यासाठी जागाच उपलब्ध नाही. महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही आमच्या कचऱ्याची विल्हेवाट लावू, अशी अशी सोसायटीची भूमिका आहे. मात्र महापालिका याबाबतीत काहीच बोलायला तयार नाही. महापालिकेच्या या आठमुठय़ा धोरणाबद्दल सर्वच रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली असून गेली चाळीस वर्षे कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थितीरीत्या होत असताना अचानक हा फतवा कशाला असा प्रश्नही रहिवाशांनी विचारला आहे.
ज्येष्ठांसाठी आसनव्यवस्था
ज्येष्ठ नागरिकांसाठी संकुलात आसनव्यवस्था आहे. त्यांना चढण्या उतरण्यासाठी आधाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. संकुलाच्या बाहेर पालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा म्हणून आसनव्यवस्था केली आहे, परंतु त्याची दुरवस्था झाली आहे. संकुलातील आसनव्यवस्थेवर ज्येष्ठ नागरिकांचा मात्र, सायंकाळच्या सुमारास चांगला गप्पांचा फड रंगत असतो, असे रहिवाशी अजय नायर यांनी या वेळी सांगितले.
सुरक्षा रक्षकांना निवासाची सोय
संकुलाच्या सुरक्षेसाठी चार सुरक्षा रक्षक तैनात असतात. दिवसा दोन, तर सायंकाळी दोन सुरक्षा रक्षक रहिवाशांची सुरक्षा चोख बजावत असतात. या सुरक्षा रक्षकांच्या निवासाची सोयही संकुलातच करण्यात आली आहे.
सर्वच समाजांतील सण,उत्सव साजरे
संकुलात सिंधी, दाक्षिणात्य, मराठी आदी समाजांतील रहिवासी असल्याने त्या त्या समाजातील सण, उत्सव साजरे होत असतात. प्रजासत्ताक दिन, स्वतंत्र्य दिन, दहीहंडी, गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, नववर्ष दिन आदी सण उत्सवातील उत्साह वाखणण्याजोगा असतो. सिंधी समाजातील चेटी चांद, चालिहो आदी सणही उत्साहात साजरे होतात. सर्वच जण समाजाच्या सणांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात, असे कृपलानी यांनी सांगितले. यशोधिनी संस्थेच्या नवरात्रौत्सवात संकुलाच्या बाहेर दांडियाचे विशेष आकर्षण असते. या वेळी मोठी गर्दी असते. या दांडियामुळे कन्हय्यानगरचे नाव ठाणे शहराला परिचयाचे झाले आहे.संकुलात पाण्याची, विजेची कोणतीही समस्या नाही. पोलीस ठाणे जवळच असल्याने चोऱ्या, मारामाऱ्या असे प्रकार येथे होत नाहीत. संकुल ठाणे स्थानकापासून सात ते दहा मिनिटांवर असल्याने वाहतूक व्यवस्थेची फार काही आवश्यकता भासत नाही. सिंधी व्यापारी समाज मोठय़ा प्रमाणात येथे असल्याने उशिरापर्यंत त्यांची रहदारी सुरू असते. महापालिकेचे सुशोभित उद्यान आणि बारा बंगला जवळच असल्याने विरंगुळ्यासाठी ही ठिकाणे रहिवाशांना सोयीची वाटतात. शाळा, महाविद्यालये या शैक्षणिक तशाच पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सेवा आहेत, परंतु अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी मात्र ठाणे पश्चिमेस जावे लागते. पेट्रोल पंप नसल्याने त्यासाठी पश्चिमेचाच आधार असल्याचे येथील रहिवाशी सांगतात.
प्रमुख समस्या

’पालिकेचे आडमुठे धोरण

’कचरा विल्हेवाटीसाठी जागा नाही

’रस्त्यावरील  वाहनांचे अतिक्रमण

’दरुगधी, डासांची पैदास

’खड्डेमय रस्ते
भविष्यातील उपक्रम
सौरऊर्जेद्वारे रस्त्यावरील
दिवे लावणे, गरम पाण्याची सोय
पावसाचे पाणी संचय

प्रकल्प
कचऱ्यापासून खतनिर्मिती
सीसी टीव्ही यंत्रणा