गुरुवारी संध्याकाळपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच पहिल्याच पावसात रेल्वेच्या सर्व मनसुब्यांवर पाणी पावसाने पाणी फेरले आहे. पहिल्याच पावसाचा फटका रेल्वेला बसला असून रेल्वेचा वेग मंदावला आहे. एकीकडे पावसामुळे रेल्वे विलंबाने सुरू असतानाच आसनगाव खर्डी दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील गाड्या 20 मिनिटे उशीराने, तर धीम्या मार्गावरील गाड्या 15 मिनिटे उशीराने धावत आहेत. तर दुसरीकडे कल्याण कसारा रेल्वेसेवाही खोळंबली आहे. मालगाडीच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरही लोकल 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. दरम्यान, पुढचे चार ते पाच तास पाऊस असाच कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतुकीचा वेग मंदावला आहे. धीम्या मार्गावरच्या वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. ठाणे ते मुलुंड दरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साठले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण या ठिकाणीही पावसाची हजेरी आहे. नवी मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. वायू वादळ आल्याने मान्सून चांगलाच लांबला. कुठेही पाऊस नव्हता आता मात्र पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतल्या मालाड, गोरेगाव, अंधेरी या भागांमध्येही पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अखेर मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर, कोकण, औरंगाबाद या ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. मात्र मुंबईत पावसाने हजेरी लावली नव्हती. गुरूवारी नाशिक, पुणे, कल्याण डोंबिवली परिसरातही पाऊस झाला. आता मात्र मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.