सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय नोकरदार त्यांना निवृत्तीनंतर मिळालेला भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युईटीची रक्कम बँका, टपाल कार्यालय अथवा शेअरमध्ये गुंतवितात. पण डोंबिवलीतील अश्विनी साने (पूर्वाश्रमीच्या विद्या जोशी) यांनी मिळालेली ही सर्व रक्कम डोंबिवलीजवळील घारिवली या ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी दान केली.
र. वा. फणसे ट्रस्टतर्फे चालविण्यात येणाऱ्या चंद्रशेखर साने प्राथमिक विद्यालयाच्या त्या संस्थापक-संचालिका आहेत. सध्या येथे शिशूवर्ग ते दहावीपर्यंत ही शाळा आहे. शाळेत २०० विद्यार्थी शिक्षण घेत असून १४ शिक्षक आणि २ शिक्षकेतर कर्मचारी शाळेत आहेत. डोंबिवलीजवळील आठ ते दहा खेडेगावातील विद्यार्थी या शाळेचा लाभ घेतात. यात काटई, कोळेगाव, वडवली, नारवली, हेदुटणे आदी गावांचा समावेश आहे.
आयुष्यभराची मिळालेली सर्व पुंजी नवीन शाळा सुरू करण्यासाठी देण्याचा हा धाडसी निर्णय कसा घेतला यावर त्या नम्रपणे सांगतात, मी काही फार मोठे काम केले आहे असे मला वाटत नाही. आपल्याकडे जे काही पैसे आहेत त्यातून थोडीफार आर्थिक मदत आजारी माणसाला त्याच्या औषधोपचारासाठी किंवा ज्याला शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे ते घेता येत नाही, अशांसाठी केली पाहिजे असे माझे दिवंगत पती चंद्रशेखर साने यांचे तत्त्व होते. माझाही त्याला पाठिंबा होता. आम्ही दोघेही वेळोवेळी अशी मदत करतच होतो. डोंबिवलीतील र. वा. फणसे बाल विद्यामंदिरात २००४ मध्ये इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करायचा होता. माझे पती चंद्रशेखर साने यांच्या निधनानंतर त्यांच्या मिळालेल्या फंडाची सर्व रक्कम (सुमारे साडेपाच लाख रुपये) मी फणसे बालमंदिराला देणगी म्हणून दिली. जेव्हा घारिवली गावात शाळा सुरू करायची ठरविले, तेव्हा माझीही सर्व रक्कम मी शाळेसाठी देण्याचा निर्णय घेतला.
आम्हाला मूल-बाळ नाही. निवृत्तीनंतर शाळा सुरू करण्याचा आणि त्या शाळेसाठी माझी सर्व रक्कम देण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझे दीर, पुतणे, भाऊ, बहिणी या सगळ्यांनी त्याला पाठिंबाच दिला. इतकेच नव्हे तर शाळा उभारणीच्या कामात कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या ना त्या स्वरूपात मदतच केली.
अश्विनी साने या मूळच्या डोंबिवलीकरच. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चोणकरांचे शिशू विद्या मंदिर, स. वा. जोशी हायस्कूलमध्ये झाले. पुढे नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालयातून (एसएनडीटी) मराठी व अर्थशास्त्र विषयात बी.ए., एम.ए. केले. डी.एड.ही केले. १९८२ ते २०१२ या कालावधीत त्यांनी फणसे बाल मंदिर या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली. मुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर शाळा सुरू करावी हे त्यांच्या पहिल्यापासूनच मनात होते. फणसे बाल मंदिर शाळेत नोकरी करत असतानाच एकीकडे शाळा उभारण्याची प्रक्रिया त्यांच्या मनात सुरू होती. निवृत्त झाल्यानंतर या कामाला अधिक गती आली आणि २०१२ मध्ये घारिवली गावात ही शाळा उभी राहिली.
घारिवली गावात जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंतच शाळा आहे. त्यापुढील शिक्षणासाठी गावात शाळा नसल्याने गावकऱ्यांची आणि मुलांचीही गैरसोय होत होती. गावाचे माजी सरपंच वसंत पाटील यांनीही गावात शाळेची आवश्यकता असून येथे शाळा सुरू करावी, अशी विनंती सानेबाई यांना केली होती. आपल्याला शाळा तर काढायची आहेच मग ती या ग्रामीण भागात का सुरू करू नये, असा विचार त्यांनी केला आणि ही शाळा सुरू झाली. सुरुवातीला शाळेची एक खोली, त्यानंतर दोन असे करत करत आज आठ
खोल्यांमधून शिशू ते इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत भरतात. अश्विनी सावंत या सध्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत आहेत.
२००२ पासून बाईंनी ज्ञान प्रबोधिनीचे काम करायला सुरुवात केली होती. एकदा काही कामाच्या निमित्ताने सोलापूरजवळील हरळी या गावी त्यांचे जाणे झाले. उच्चविद्याविभूषित अशा अनेक मंडळींना त्यांनी तेथे सेवावृत्तीने व निरलसपणे काम करताना पाहिले. ज्ञान प्रबोधिनीचे विवेक पोंक्षे, गिरीश बापट यांचेही मार्गदर्शन मिळाले. घारिवली गावात शाळा सुरू करण्याची प्रेरणा या सगळ्यातून मिळाल्याचे त्या सांगतात. शाळा उभारणी, विस्तार आणि शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शाळेला भरीव स्वरूपातील मदत या सर्वासाठी माझी भाची विजया परांजपे यांच्यासह फणसे बाल मंदिर शाळेचे माजी विद्यार्थी व आता शाळेच्या संचालक मंडळावर असलेले अजय जोशी, ‘एक्सप्लोअर’समूहाच्या उषा बोरसे व त्यांचे सहकारी, ज्ञान प्रबोधिनी डोंबिवली केंद्राच्या ज्योती कर्वे, निर्मला बंगेरा, मालती प्रभुणे, त्यांचा मुलगा राजीव प्रभुणे, राज्याचे माजी शिक्षण उपसचिव अनिल भट्टलवार, रोटरी क्लब, पाबळेकर ट्रस्ट, सौदामिनी-रोटरी क्लब ऑफ डोंबिवली यांचे महत्त्वाचे व मोलाचे योगदान असल्याचे साने बाई यांनी आवर्जून सांगितले.
शाळेला कायम विनाअनुदानित तत्त्वावर शासन मान्यता मिळालेली असून यंदाच्या वर्षी शाळेतील दहावीची तुकडी पहिल्यांदा शालांत परीक्षेला बसणार आहे. शाळेत प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने असल्याने त्याची बोली व प्रमाण भाषा सुधारणे, त्यांच्यात लेखन व वाचनकौशल्य विकसित करणे, या मुलांना त्यांचे विचार त्यांच्या शब्दात मांडता यावेत, यासाठी ज्ञान प्रबोधिनीचा ‘विकासिका’ हा उपक्रम शाळेत राबविला जातो. दर मंगळवारी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. नागपंचमीच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रयोगाचे आयोजन करण्यात येते. दीपोत्सव, मातृदिन कार्यक्रम घेतले जातात. मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून बालसभा घेतली जाते. प्रमुख पाहुणा, अध्यक्ष, वक्ता, सूत्रसंचालक सर्व काही विद्यार्थीच असतात. यातून त्यांच्यात सभाधीटपणा येतो. डोंबिवली व ठाणे परिसरातील विविध स्पर्धामधूनही या विद्यार्थ्यांना पाठवले जाते. शाळेतील शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते. शाळेत श्रीमंत, मध्यमवर्गीय ते गरीब अशा सर्व स्तरांतील मुले आहेत. विद्यार्थ्यांचे पालकही आपल्या पाल्याबाबत, त्यांच्या अभ्यासातील प्रगतीबाबत जागृत आहेत. शाळेच्या पालक सभेला ८५ टक्के पालकांची उपस्थिती असते.
शेखर जोशी Shekhar.joshi@gmail.com

अश्विनी साने यांचा ई-मेल – ac23sane@gmail.com

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !