अपूर्ण माहिती दिल्याने कारवाई
माहिती अधिकारात मागविण्यात आलेली माहिती अपूर्ण दिल्याने व सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिल्याने अंबरनाथ नगरपालिकेचे सहाय्यक नगररचनाकार विद्यासागर चव्हाण यांना राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची माहिती शहरातील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत अनार्थे यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे २०१४ सालच्या जानेवारी महिन्यात नगरपालिकेकडे मागितली होती. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी प्रथम अपिल त्याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात केले होते. मात्र, प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांचेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अनार्थे यांनी दुसरे अपिल राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठाकडे केले होते. त्याची अंतिम सुनावणी यावर्षी ४ डिसेंबरला झाली. यावेळी पालिकेचे सहाय्यक नगररचनाकार चव्हाण हे उपस्थित न राहिल्याने कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त थँक्सी थेकेकरा यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम २० (१) अन्वये २५ हजार रुपयांची शास्ती लावण्याचे आदेश दिले आहेत.
ही रक्कम सहाय्यक नगररचनाकार विद्यासागर चव्हाण यांच्या वेतनातून पाच मासिक हप्त्यात वसूल करून तसा अहवाल प्रथम अपिलीय अधिकारी यांनी आयोगास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अनार्थे यांना जो त्रास सहन करावा लागला, त्याची भरपाई म्हणून ३०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबत विद्यासागर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता कामात व्यस्त असून नंतर याबाबत बोलेन असे त्यांनी सांगितले.