नीलेश पानमंद-आशीष धनगर

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीचा आठवडा मांसाहार खवय्ये आणि मद्यप्रेमींसाठी सुगीचा मानला जातो. या काळात विक्रेत्यांचीही चंगळ असते. यंदा मात्र ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये कडेकोट टाळेबंदी लागू असल्यामुळे मांसाहार खरेदी- विक्रीचे प्रमाण तुलनेने कमी झाले असून कुटुंबीय, मित्रमंडळीसोबत मोठय़ा झोकात गटारीचा बेत आखणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडू लागले आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही २ जुलैपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या टाळेबंदीत वाढ करून १९ जुलैपर्यंत ती लांबविण्यात आली आहे. या टाळेबंदीत जिल्ह्यातील काही शहरांमध्ये चिकन, मटणविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. येत्या सोमवारी आषाढी अमावास्या असून त्यानंतर श्रावण महिना सुरू होणार आहे. आषाढ महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात मांसाहारावर ताव मारत गटारी साजरी करण्याचे बेत हल्ली घराघरांत आखले जात असतात. मात्र यंदा टाळेबंदीमुळे त्यावर निर्बंध येणार आहेत. ठाणे शहरात दरवर्षी आषाढी अमावास्येला ८ ते ९ हजार बकऱ्यांची कत्तल होते आणि कोंबडय़ाही मोठय़ा प्रमाणावर कापल्या जातात. यंदा जिल्ह्य़ात टाळेबंदी असल्यामुळे ठाण्यासह प्रमुख शहरांमधील चिकन आणि मटणची दुकाने १९ जुलैपर्यंत बंद राहणार असून त्याचा फटका या व्यावसायिकांना बसणार आहे. मटणाचे दर ६५० ते ७०० रुपयांपर्यंत खाली आल्याने नागरिकांकडून जास्त खरेदी केली जाईल, अशी आशा विक्रेत्यांना होती. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांची ही आशा मावळली आहे. सध्या २४० ते २६० रुपये किलो चिकनचे दर असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

‘रविवारी तरी परवानगी द्या’

टाळेबंदीमुळे रविवारी मटण आणि चिकनची दुकाने उघडता येणार नसून यामुळे गटारीच्या काळातील उत्पन्न बुडणार आहे. टाळेबंदीमुळे मटण आणि चिकन विक्रेत्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून आता श्रावण महिन्यात मांसाहाराची मागणी घटणार असल्याने आणखी फटका बसणार आहे. त्यामुळे महापालिकेने किमान रविवारी दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वसंत विहार येथील मटण विक्रेते जितू कोथमिरे यांनी केली.