निवारा थांब्यांवर सुविधा पुरवण्याचा पालिकेचा प्रस्ताव; पिण्याचे पाणी, मोबाइल चार्जिगचीही व्यवस्था
केंद्र तसेच राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेचा एक भाग म्हणून शहरातील वेगवेगळ्या भागांत अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त बसप्रवासी निवारे उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्तावही प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावानुसार एटीएम, शौचालये, हेल्पलाइन, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही, मोबाइल चार्जिग आणि आसन व्यवस्था अशा सुविधा या बसनिवाऱ्यांवर पुरविण्यात येणार आहेत. शहरामध्ये पहिल्या टप्प्यात अशा स्वरूपाचे सुमारे शंभर बसनिवारे उभारण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे, हे निवारे लोकसहभागातून उभारण्यात येणार आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत तसेच हद्दीबाहेरील मार्गावर परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ा धावत असून त्यासाठी परिवहन प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या भागांत ४७० बसप्रवासी निवारे उभारले आहेत; परंतु या निवाऱ्यांमध्ये प्रवाशांना पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, केंद्र तसेच राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरामध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील वेगवेगळ्या भागात अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त बसप्रवासी निवारे उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरामध्ये पहिल्या टप्प्यात अशा स्वरूपाचे सुमारे शंभर बसनिवारे उभारण्याचा प्रस्ताव असून तिथे एटीएम, शौचालये, हेल्पलाइन, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही, मोबाइल चार्जिग आणि आसन व्यवस्था अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच या निवाऱ्यांची निगा, देशभाल व स्वच्छता करण्यासाठी २४ तास कर्मचारी असणार आहेत. त्यामुळे बसनिवाऱ्यांवर स्वच्छता राहणार आहे. याशिवाय, या निवाऱ्यांवर वीजनिर्मितीसाठी सौरऊर्जेचे पॅनलही बसविण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी लागणारा संपूर्ण भांडवली व महसुली खर्च संबंधित ठेकेदार करणार असल्यामुळे महापालिकेस प्रकल्पासाठी काहीच खर्च करावा लागणार नाही. या निवाऱ्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव आज, शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.