निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात सहभाग आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस) सचिन वाझे यांचा ताबा हवा आहे. यासाठी त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नका अशी विनंती ‘एटीएस’ने ठाणे न्यायालयात केली आहे.

४ ते ५ मार्च या कालावधीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळून आला होता. या दिवसांचा घटनाक्रम वाझे यांच्याकडून एटीएसला जाणून घ्यायचा आहे. मनसुख हिरेन यांच्या अंगावरील दागिने आणि रोख रक्कम गायब होती, त्याबाबत एटीएसला जाणून घ्यायचे आहे. १८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान, स्फोटकांनी भरलेले वाहन नेमके कुठे ठेवण्यात आले होते, हेही समजून घ्यायचे आहे. तसेच बनावट वाहन क्रमांकासंदर्भाची माहिती एटीएसला मिळवायची आहे.

३० मार्चला सुनावणी

सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी एटीएसने ४ पानी लेखी जबाब न्यायालयात सादर केला आहे. दरम्यान, एटीएसने सादर केलेल्या  जबाबावर अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी वाझे यांच्या वकील आरती कालेकर आणि मनोज रायचा यांनी केला. त्यामुळे या अर्जावरील सुनावणी ३० मार्चला ठेवण्यात आली आहे.