गुजरातमध्ये दहशतवादी शिरल्याच्या गुप्तचर खात्याच्या माहितीच्या आधारे पालघर जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पालघर शाखेनेही जिल्ह्यात नाकाबंदी करून संशयितांची तपासणी सुरू केली आहे.

मुंबईवरील हल्ल्यासाठी दहशतवादी गुजरातमधून समुद्रमार्गे मुंबईत आले होते. या वेळीही गुजरातमध्ये समुद्रमार्गे दहशतवादी शिरल्याची माहिती खुद्द पाकिस्तानने दिली आहे. त्या पाश्र्वभूमीवर पालघर पोलिसांनी अ‍ॅलर्ट घोषित करून सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकदेखील सक्रिय झाले असून शहरातल्या मॉल, लॉज आणि रिसॉर्टची तपासणी सुरू केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत असून बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात असल्याचे दहशतवादविरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे आदी ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.