मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन तरुणांनी एका बीट मार्शलला मारहाण केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी नालासोपारा येथे घडली पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी संध्याकाळी वसईचे बीट मार्शल नालासोपारा येथील नवाळे गावात गस्तीवर होते. नवाळे गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मोटारसायकलीला त्यांनी अडवले. मोटारसायकलस्वार तरुणांनी मद्यप्राशन केले होते. पोलिसांनी अडविल्याचा राग आल्याने त्यांनी बीट मार्शल सचिन डेरे यांना मारहाण केलीे. हा प्रकार पाहून ग्रामस्थ आणि इतर पोलीस मदतीला आले. त्यांनी मारहाण करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. गुन्हा नेमका कुठल्या हद्दीत घडला आहे ते आम्ही तपासत आहोत. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल केला जाईल, असे नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी सांगितले.