दोन तरुणींसह सहा आरोपींना अटक

मुंबई / अंबरनाथ : विनाशिरस्त्राण दुचाकी चालविणाऱ्या तरुणीला रोखल्याने शुक्रवारी मुंबईत वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण करण्यात आली, तर गुन्हेगारांची मोटार रोखल्याने अंबरनाथमध्ये एका पोलीस शिपायावर चौघांनी प्राणघातक हल्ला केला.

उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे हवालदार बाळू चव्हाण यांच्यावर अंबरनाथ येथील नारायण टॉकीजजवळ तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दिलखूश प्रताप सिंग, अंकुश प्रताप सिंग, युवराज पवार आणि अबीद शेख यांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मुंबईच्या काळबादेवी परिसरात वाहतूक हवालदार एकनाथ पारठे (वय ५४) यांच्यावर हल्ला करून त्यांना शिवीगाळ करणाऱ्या मोहस्सीन निजामुद्दीन खान (३२) आणि सागरिका तिवारी (३२) या दोघींनाही अटक करण्यात आली आहे.

काळबादेवी येथील अत्यंत गजबजलेल्या कॉटन एक्स्चेंज चौकात पोलीस हवालदार एकनाथ पारठे (वय ५४) शुक्रवारी कर्तव्यावर होते. त्यांनी दुपारी तीनच्या सुमारास मोहस्सीन निजामुद्दीन खान (३२) आणि सागरिका तिवारी (३२) यांना विनाशिरस्त्राण दुचाकीवरून जाताना अडवले आणि त्यांच्याशी आदरपूर्वक संवाद साधून हेल्मेट का नाही, अशी विचारण केली. त्यावर हेल्मेट चोरीस गेले आहे, आम्हाला जाऊ द्या, असे मोहस्सीनने सांगितले. मात्र पारठे यांनी कारवाई सुरू केली. मोबाइलमध्ये दुचाकीचे छायाचित्र घेऊन त्यांनी त्यांना जाण्यास सांगितले. परंतु मागे बसलेल्या सागरिका हिने पारठे यांची कॉलर पकडली आणि त्यांना शिवीगाळ सुरू केली. बघ्यांची गर्दी होताच सागरिकाने पारठे यांच्या अनेकदा कानशिलात लगावली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकातील महिला पोलिसालाही सागरिकाने शिवीगाळ केली.

मोहस्सीन आणि सागरिका यांना सरकारी कामात व्यत्यय आणणे, सरकारी नोकराला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी मारहाण, धमकी, शिवीगाळ आदी कलमांनुसार गुन्हा नोंदवून अटक केल्याचे एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम यांनी सांगितले. ही कलमे अजामीनपात्र असून न्यायालयाने दोघींनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अंबरनाथमधील आरोपी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास कल्याण-बदलापूर रस्त्याने मोटारीतून जात होते. त्याच वेळी हवालदार बाळू चव्हाण काम संपवून घरी जात असताना त्यांना कारमधील व्यक्तींच्या कपडय़ांवर रक्ताचे डाग आढळले. त्यामुळे त्यांनी कारच्या पुढे दुचाकी थांबवून कार अडवली. त्या रागातून चौघांनी त्यांच्यावर तलवार, कोयता, रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला चढविला. वर्दळीच्या रस्त्यावर हा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांचीही पळापळ झाली. चव्हाण यांच्या पाठीवर, डोळ्यावर आणि छातीवर वार क रण्यात आले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चौघांनी कार सोडून एक रिक्षा जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोबारा केला. त्यानंतर तासाभरातच पोलिसांनी त्यांना अटक केली.

अंबरनाथ येथे पोलीस हवालदारावर हल्ला करण्यापूर्वी तेथील आरोपींनी आणि त्यांच्या साथीदारांनी शुक्रवारी सायंकाळी  ७ वाजता उल्हासनगर कॅम्प ५ परिसरात शिवसेनेच्या कैलास तेजी यांच्या बंद कार्यालयावर हल्ला केला होता. त्यानंतर कॅम्प ४ परिसरातील सेक्शन २५ येथे नवरात्र उत्सव मंडळात दंगा करून अभिजीत बर्वे यांच्या घरावर आणि गंगाधर भोसले यांच्या कारची नासधूस करून पळ काढला होता. या प्रकरणी हिललाइन आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसाच्या संयमाचे कौतुक

पोलीस हवालदार एकनाथ पारठे यांच्याशी संपर्क साधला असता, मारहाण करणारी महिला असल्याने आपण प्रतिकार केला नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांनी दाखवलेल्या संयमाबाबत वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.