पक्षाच्या विभागप्रमुखासह सहा जणांवर गुन्हा

ठाणे येथील उपवन भागात शिवसेनेचे माजी नगरसेवक आत्माराम थोरात यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या चार ते पाचजणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या पक्षाच्या बैठकीत विभागप्रमुख जेरी डेव्हीड यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाली होती आणि यातून त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आत्माराम यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात जेरी डेव्हिड यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. शिवसेनेच्या ठाण्यातील बडय़ा नेत्यांच्या निकटवर्तीयांमध्ये डेव्हिड यांचा समावेश असून त्यांच्या पत्नी महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

ठाणे येथील मानपाडा भागातील कल्पतरू गृहसंकुलामध्ये आत्माराम थोरात (४९) राहतात. ते ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. रविवारी सायंकाळी ते उपवन भागात फेरफटका मारण्यासाठी घरातून बाहेर पडले. पवारनगर बसथांब्याच्या परिसरातून ते पायी जात असतानाच दुचाकीवरून आलेल्या चार ते पाचजणांनी त्यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यामुळे हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते आणि दुचाकीच्या क्रमांकावरही माती लावण्यात आली होती. त्यामुळे आत्माराम यांना हल्लेखोरांच्या दुचाकीचा क्रमांक दिसू शकला नाही. याप्रकरणी त्यांनी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यामध्ये विभागप्रमुख जेरी डेव्हिड यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने शनिवारी सकाळी टेंभीनाका येथील सूर्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान जेरी डेव्हिड यांच्यासोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हा हल्ला जेरी यांनीच केला आहे, असा आरोप आत्माराम यांनी तक्रारीत केला आहे. त्या आधारे जेरी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वाचा शोध सुरू आहे, अशी माहिती चितळसर मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली. जेरी डेव्हिड यांच्यावर ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.