आमदार प्रताप सरनाईक यांच्या टिटवाळा परिसरातील जमीन खरेदी व्यवहाराशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) पथक मंगळवारी येथील एका विकासकाच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले होते. विकासकाला करोना झाला असल्याचे सांगितल्यानंतरही पथकाने चौकशी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार विकासकाच्या पत्नीने केली आहे.

टिटवाळा जवळील गुरवली येथील सरनाईक यांनी ७८ एकर जमीन खरेदी केली आहे. या जमीन व्यवहाराची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. मंगळवारी सकाळी ईडीचे १० जणांचे पथक गोदरेज हिल भागात राहणारे विकासक योगेश देशमुख यांच्या घरी दाखल झाले. योगेश यांना करोना झाला आहे, घर प्रतिबंधित आहे असे सांगूनही अधिकाऱ्यांनी घरात शिरण्याचा प्रयत्न याच केला. त्या दरम्यान, योगेश यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरनाईक यांच्या बरोबरचा जमीन व्यवहार आर्थिक कारणामुळे रद्द झाला आहे. याप्रकरणी दावा सुरू आहे. त्यांच्या जमीन प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही, असे योगेश यांच्या पत्नी शीतल यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.