वारंवार बिघाड होत असल्याने तिकीट खिडक्यांसमोर लांबलचक रांगा

ठाणे स्थानकात रांगेविना तिकीट काढण्यासाठी लावण्यात आलेल्या एटीव्हीएमपैकी सात यंत्रे बंद पडली आहेत, तर उर्वरीत २३ यंत्रांमध्येही सातत्याने बिघाड होत आहेत. कागद अडकणे, सव्‍‌र्हर डाऊन होणे, तिकीट बाहेर पडताना अडचणी येणे नित्याचे झाले असून वारंवार तक्रारी केल्यानंतरही या त्रुटी दूर होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. एटीव्हीएमद्वारे तिकीट काढण्याच्या विचाराने निघालेल्या प्रवाशांना लांबलचक रांग लावून तिकीट काढावे लागत असल्याने विलंब होत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात पश्चिमेकडे लावलेली तीन आणि पूर्वेकडील तिकीट खिडक्यांना लगतची चार यंत्रे महिनाभर बंद आहेत. मध्य रेल्वेने मध्यंतरी जाहीर केलेल्या एका अहवालानुसार ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सहा लाख प्रवाशांची ये-जा सुरू असते. गर्दीच्या स्थानकांतील प्रवाशांना तिकिटांसाठी ताटकळावे लागू नये यासाठी रेल्वेने एटीव्हीएम सुविधा दिली आहे.

एटीव्हीएमचा वापर करून स्मार्टकार्डद्वारे तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण वाढावे आणि तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी व्हाव्यात, यासाठी रेल्वेकडून वारंवार जनजागृती केली जाते, मात्र प्रत्यक्षात यंत्रेच बंद असल्यामुळे स्मार्टकार्डचा फारसा वापरच होत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. यूटीएस अ‍ॅपवरून तिकीट काढणे अनेकांना जमत नाही. एटीव्हीएम बंद असल्याने रांगा लागत आहेत, असे रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

यंत्रांत वाढ, तरीही रांगा कायम

* एटीव्हीएमसमोर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरुवातीच्या काही महिन्यांतच ठाणे स्थानकातील या यंत्रांची संख्या पाचवरून दहावर नेण्यात आली. सध्या ठाणे स्थानकात तब्बल ३० एटीव्हीएम आहेत.

*  सुरुवातीपासून या यंत्रांत वारंवार बिघाड होतो. तिकीट काढताना कागद अडकणे, स्मार्ट कार्ड एटीव्हीएमशी संलग्न न होणे, सव्‍‌र्हरचा वेग कमी असणे अशा समस्या वारंवार उद्भवतात.

*  अनेकदा यंत्रांमधील तिकिटांच्या गुंडाळ्या संपल्या तरी पुन्हा भरण्यात येत नाहीत. त्यामुळे पैसे रेल्वेकडे जमा झाले तरी तिकिटे मिळत नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

*  तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी व्हावी म्हणून लावण्यात आलेल्या या यंत्रांसमोरही आता लांब रांगा लागत आहेत.

ठाणे स्थानकातील ३० एटीव्हीएम सुरू आहेत. सव्‍‌र्हरचा वेग कमी असल्यास तिकीट काढताना अडथळा येतो. मात्र तात्काळ एटीव्हीएम यंत्रणेची दुरुस्ती करण्यात येते.

-राजेंद्र वर्मा, ठाणे स्थानक डायरेक्टर