‘इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सव’ कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद

ठाणे : ठाणेकरांच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान असणारा ‘इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सव’ कार्यक्रम ठाणेकर रसिकांच्या भरघोस प्रतिसादात पार पडला. महोत्सवाचे यंदा २४ वे वर्ष होते. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचे सहआयोजक होते. इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सवाचा दोन सत्रांत झालेला हा सोहळा म्हणजे साहित्य, नाटय़, वादन, गायनाची सुरेख मैफल होती.

पहिल्या सत्रात ‘नटसम्राटाला आदरांजली’ या दृकश्राव्य कार्यक्रमात जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रीराम लागूंनी अभिनय साकारलेल्या ‘सामना’ चित्रपटातील ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गाण्याने झाली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, कशी नशिबाने थट्टा ही मांडली, तुम्हावर केली मी मर्जी बहाल आणि अन्य गाणी अमित पाध्ये यांनी संवादिनीवर सादर केली. ‘सामना’ आणि ‘पिंजरा’ या दोन्ही चित्रपटांतील ‘मास्तर’ ही भूमिका डॉ. लागू यांनी कशाप्रकारे साकारली याचे विश्लेषण मकरंद जोशी यांनी केले, तसेच काही लेखांच्या अभिवाचनाने जोशी यांनी डॉ. लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी डॉ. लागू यांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्रातील काही भागाचे, तर ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकातील एका प्रवेशाचे अभिवाचन सादर केले. डॉ. लागू यांच्या काही आठवणींनाही पटवर्धन यांनी उजाळा दिला. अभिनेते सागर तळाशीलकर यांनी ‘कुमारांचं गाणं आणि नाटकातलं गद्य’ या विषयावरील डॉ. लागू यांच्या भाषणाचे अभिवाचन केले. कार्यक्रमाची सांगता ‘जानकी’ चित्रपटातील गाण्याने झाली.

दुसऱ्या सत्रात हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी प्रतिभावंतांचे योगदान या संकल्पनेवर आधारित ‘माहिरे-अर्थात माय मराठीतले हिरे’ हा संगीतमय कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे होते. शरयू दाते, अमृता नातू, जयदीप बगवाडकर, नचिकेत देसाई, कृतिका बोरकर यांनी गाणी सादर केली.

सत्यं शिवं सुंदरम, ज्योती कलश झलके, चाहुंगा मै तुझे, दिल क्या करे, धीरे से आजा रे, भोली सुरत, शाम ढले ते ‘नवराई माझी लाडाची लाडाची गं’ आदी हिंदी चित्रपटातील गाण्यांचा यात समावेश होता. कार्यक्रमाचे संहितालेखन आणि निवेदन ज्येष्ठ चित्रपट पत्रकार ललिता ताम्हणे, अभिनेते पुष्कर श्रोत्री यांचे होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

‘इंदधनू’ पुरस्कार प्रदान सोहळा

‘इंद्रधनू’चा पुरस्कार सोहळाही यावेळी मोठय़ा दिमाखात पार पडला. ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के, ‘इंद्रधनू’चे अध्यक्ष रवींद्र अमृतकर, लोकसत्ता ठाणेचे ब्युरो प्रमुख जयेश सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यंदा सामाजिक, शैक्षणिक आणि अन्य विविध क्षेत्रांत काम केलेले शिक्षणतज्ज्ञ अ.गो. टिळक यांना ठाणे मानबिंदू पुरस्काराने गौरवण्यात आले. शाळेत शिकविताना माझा विद्यार्थी असलेल्या आणि आता शहराचा प्रथम नागरिक झालेल्या नरेश म्हस्के यांच्या हातून माझा सन्मान होणे हा क्षण कृतार्थतेचा असल्याचे टिळक यांनी सांगितले. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मिताली मिलन टोपकर हिला युवोन्मेष पुरस्काराने, तर संवादिनीवादक सागर साठे यांना सुधीर फडके युवोन्मेष पुरस्काराने गौरवण्यात आले.