संगीत नाटय़ाचा आविष्कार अनुभवण्याची संधी डोंबिवलीकरांना शनिवारी चालून आली. ओंकार कला मंडळातर्फे विद्याधर गोखलेलिखित ‘जय, जय गौरीशंकर’ या संगीत नाटकाच्या अभिनव प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. चपखल निवेदनाच्या माध्यमातून सादर होणाऱ्या या कथानकात बहारदार नाटय़गीतांनी एक वेगळीच जाण टाकली आणि उत्तरोत्तर हे नाटक बहरत गेले.
ओंकार कला मंडळाच्या वतीने रसिक श्रोत्यांना भावतील अशा दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. डोंबिवलीतील सुयोग सभागृहात शनिवारी पार पडलेल्या ‘जय, जय गौरीशंकर’ या संगीत नाटकालाही रसिकांनी एकच गर्दी केली होती. १९६६ साली गोखले यांनी आपल्या लेखणीतून अजरामर केलेल्या संगीत नाटकाला येत्या १४ ऑगस्ट रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहे. डोंबिवलीकरांनाही या संगीत नाटकाची गोडी चाखता यावी म्हणून बैठकीचा हा नाटय़प्रयोग येथे भरविण्यात आला.
काशि नाचे छमाछम, प्रियकरा, नारायणा रमा रमणा, निराकार ओंकार साकार, जय जय रमा रमण श्रीरंग, नसे हा छंद भला, सुर गंगा मंगला, शिव शक्तीचा अटीतटीचा खेळ आदी नाटय़गीतांनी रसिकश्रोत्यांचे श्रवण तृप्त झाले. भरे मनात सुंदरा या गीताला रसिकांनी दाद देत पुन्हा सादर करण्याची मागणी केली. शंकर पार्वती यांच्यात रंगलेला सारीपाटाचा खेळ तसेच त्यातील रंजक वर्णन, पार्वतीचे लटके अनघा देशपांडे यांनी उत्तमरित्या सादर केले. स्वरसाज अभय करंदीकर, रश्मी सुळे, संदीप राऊत, प्रतीक फणसे यांसह कळलाव्या नारदमुनींची व्यक्तिरेखा सुनील जोशी यांनी साकारली. त्यांना तबला वादक आदित्य पानवलकर व संवादिनी वादक केदार भागवत यांनी उत्तम साथ दिली.
दुर्गाराज जोशी यांची संकल्पना असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन व निवेदन सुनील जोशी यांनी केले. पुढील प्रयत्नात संगीत देवमाणूस या नाटकातील गीते घेऊन रसिकांसमोर यायचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोली येथे हा प्रयोग झाला आहे, इतर ठिकाणीही या नाटय़ाचे प्रयोग मोठय़ा प्रमाणावर करण्याचा आमचा मानस आहे, असे जोशी यांनी सांगितले.

तरुण पिढीने संगीत नाटय़ाकडे आशादायक दृष्टीने पहावे म्हणून तरुण कलाकारांना घेऊनच संगीत नाटक जागविण्यासाठी या नाटय़ाचे प्रयोग आर्यादुर्गाच्या वतीने सादर करण्यात येत आहेत. मूळ संहितेला कुठेही धक्का न लावता नाटकाचे सादरीकरण करण्याचा मानस असून संगीत नाटय़ पुन्हा मोठय़ा प्रमाणावर रंगमंचावर सादर झाले पाहिजे असा प्रयत्न आहे.
– सुनील जोशी, दिग्दर्शक