कल्याण-डोंबिवली महापालिकेवर लेखापरीक्षण विभागाचे ताशेरे

निविदा प्रक्रियेतील टक्केवारी, नगररचना विभागातील अनागोंदी, अनधिकृत बांधकाम विभागातील हेराफेरी, अभियंत्यांची लाचखोरी, मालमत्तांची विल्हेवाट या सगळ्या भ्रष्ट प्रकारांमुळे बदनामीच्या गर्ततेत ओढले गेलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हिशेब नोंदवह्य़ांमध्येही सावळागोंधळ असल्याचा धक्कादायक निष्कर्ष लेखापरीक्षण विभागामार्फत काढण्यात आला आहे. सन २०१३ या कालावधीत महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या आर्थिक हिशेब नोंदवह्य़ांमध्येही गोंधळ घातला असल्याचा लेखा विभागाचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षांतील लाखो रुपयांच्या रकमांचा हिशेब ठेवण्यात पालिका कर्मचाऱ्यांनी अक्षम्य ढिलाई ठेवल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.

येत्या २० सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत हा अहवाल पटलावर ठेवण्यात येणार आहे. यापूर्वीही अशाच पद्धतीचे महत्त्वाचे विषय सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आले होते. मात्र, या विषयांकडे बहुतांश नगरसेवक कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या सर्वसाधारण  सभेपुढे  मांडण्यात आलेल्या हिशेब नोंदवहीतील सावळागोंधळाविषयी नगरसेवक नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

अहवालातील ठपका

कल्याण डोंबिवली महापालिकेने विजया बँक (मोहने), कॉपरेरेशन बँक, महाराष्ट्र बँक (टिटवाळा), बँक ऑफ बडोदा (कल्याण), देना बँक (डोंबिवली), सिंडीकेट बँक, इंडियन ओवरसीज बँक या सात बँकांमध्ये खाती उघडली आहेत. महापालिकेत झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती नोंदणी पुस्तकात नोंदवून जमा झालेल्या रकमा कर्मचाऱ्यांनी वेळच्या वेळी संबंधित बँक खात्यांमध्ये जमा करणे आवश्यक होते. तसेच या बाबतची बँक ताळमेळ (रिकन्सीलेशन) खाती अद्ययावत करणे आवश्यक होते. परंतु, कर्मचाऱ्यांच्या चालढकलपणामुळे जमाखर्चाचे ताळमेळ पूर्ण करण्यात आले नाहीत.काही महत्त्वाच्या नोंदींसाठी लेखापरीक्षकांना महाराष्ट्र बँक, विजया बँकेकडून जमाखर्चाचे स्टेटमेंट आवश्यक होते. तशास्वरूपाची मागणी करूनही महापालिका कर्मचाऱ्यांनी ते उपलब्ध करून दिले नाही.‘क’ प्रभागाच्या वार्षिक लेखा नोंदणी पुस्तकात ८८३६ रुपयांची तफावत आढळून आली आहे.

कल्याण डोंबिवली विभागांच्या वार्षिक लेख्यात ९ लाख ४० हजार ७१७ रुपयांची शिल्लक आहे. ही रक्कम जमा करून लेखे अद्ययावत करणे आवश्यक होते. परंतु अशी कोणतीही कृती न करता कर्मचाऱ्यांनी ही रक्कम खात्यात पडून ठेवण्यात धन्यता मानली आहे. २००९ ते २०१३ पर्यंत अनेक लेखा आक्षेप कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले नाहीत. जमाखर्चाचे ताळमेळ करताना अडचणी येत आहेत, असे लेखापरीक्षकांनी अहवालात म्हटले आहे. या लेखापरीक्षण अहवालांमुळे महापालिकेच्या जमाखर्च नोंदींमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांची मिलीभगत उघड होताना महापालिकेचे आर्थिक गणित कसे बिघडवले जाते, हे स्पष्ट झाले आहे. विभागातील लेखा नोंदींमध्ये गोंधळ घालायचा आणि त्यासंबंधीची कागदपत्रे वर्षांनुवर्षे लेखापरीक्षकांना उपलब्ध करून द्यायची नाहीत, असा प्रकार मागील अनेक वर्षांपासून पालिकेत सुरू आहे. त्यामुळे ‘हातसफाई’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आयतेच फावते असे चित्र आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना काही कर्मचारी किरकोळ पद्धतीने आपली दुकानदारी चालू ठेवून पालिकेला आणखी खड्डय़ात घालण्याचे काम करीत आहेत, अशी टीका होत आहे.

हातसफाई करणाऱ्यांना मोकळे रान

विभागातील लेखा नोंदींमध्ये गोंधळ घालायचा आणि त्यासंबंधीची कागदपत्रे वर्षांनुवर्ष लेखापरिक्षकांना उपलब्ध करून द्यायचे नाहीत, असा प्रकार मागील अनेक वर्षांपासून पालिकेत सुरू आहे. त्यामुळे ‘हातसफाई’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आयतेच फावते असे चित्र आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना काही कर्मचारी किरकोळ पध्दतीने आपली दुकानदारी चालू ठेऊन पालिकेला आणखी खड्डय़ात घालण्याचे काम करीत आहेत, अशी टीका होत आहे.