डोंबिवलीच्या स्वामी शिवानंद संगीत प्रतिष्ठानचा ध्यास
औंध संस्थानचे राजगायक पंडित अनंत मनोहर जोशी आणि त्यांचे पुत्र पंडित गजाननबुवा यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मरणार्थ १९४० साली अश्विन वद्य पंचमीस ‘औंध संगीत महोत्सव’ सुरू केला. हा उत्सव या वर्षी ७५व्या वर्षांत पदार्पण करत आहे. सातारा जिल्ह्य़ातील औंध येथे शिवानंद स्वामी यांच्या समाधीसमोर हा उत्सव होतो.
शहरी भागांत अनेक महोत्सव होतात. मात्र ग्रामीण भागातील रसिकांसाठी, कानसेनांसाठी एवढी वर्षे नि:शुल्क चालणारा ‘औंध संगीत महोत्सव’ हा एकमेव असावा. प्रारंभी जोशी कुटुंबीयांनी चालवलेला हा उत्सव १९८१ पासून स्थापन करण्यात आलेल्या स्वामी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आयोजित करण्यात येतो. जवळपास हजार रसिक या महोत्सवाचा आनंद घेतात. आजपर्यंत या महोत्सवात पंडित गजाननबुवा जोशी, पंडित निवृत्तीबुवा सरनाईक, पंडित वसंतराव देशपांडे, स्वरभास्कर भीमसेन जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांनी संगीतसेवा केली आहे. संस्थेने २००१ मध्ये पंडित गजानन बुवा जोशी (www.gajananbuwajoshi.com) हे संकेतस्थळ सुरू करून त्यावर पंडितजींच्या गायनाचे आणि व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण उपलब्ध करून दिले आहे. संस्था औंध संगीत महोत्सवा व्यतिरिक्त संगीतविषयक तीन ते चार कार्यक्रम डोंबिवली येथे आयोजित करत असते. भविष्यात संगीतविषयक अनेक उपक्रम सुरू करण्याचे संस्थेचे प्रयत्न आहेत. मात्र दिवसेंदिवस निधीअभावी या महोत्सवाचे आयोजन करणे आणि संस्था चालवणे संस्थेला अवघड होत चालले आहे. संगीतप्रेमींनी आर्थिक मदत केल्यास या संस्थेचे कार्य असेच पुढे सुरू ठेवून ग्रामीण भागातील रसिकांसाठी सुरू असलेला हा महोत्सव सुरू ठेवता येणे शक्य आहे.