धनश्री लेले, लेखिका, निवेदिका
बहुतेकांना लहानपणीच वाचनाचा छंद लागतो. मी मात्र त्याला अपवाद आहे. मला लहानपणी वाचनाची अजिबात आवड नव्हती. घरात पुस्तके असली तरी मी ती वाचत नव्हते. माझे पाठांतर मात्र चांगले होते. सातवीत असतानाच भगवद्गीतेचे सातशे श्लोक मला तोंडपाठ होते. स्वत:हून वेगळे काही वाचण्याची गरज वाटत नव्हती. माझे पती माझ्या भावाचे मित्र. त्यांचे वाचन खूप आहे. मी पदवीच्या दुसऱ्या वर्षांला असताना ते माझ्या भावाला खूप पुस्तके वाचायला देत. तेव्हापासून पुस्तके वाचायला लागले. त्यामुळे वाचनाची आवड माझ्या पतीमुळे निर्माण झाली असे मला वाटते. पदवीच्या शेवटच्या वर्षांला ऋग्वेद हा माझा विषय होता. नाटककाराचा तौलनिक अभ्यास करणे अपेक्षित असते. त्या वेळी मुख्यत: भासाची नाटके वाचली. ऋग्वेदाचा अभ्यास करायचा म्हणजे केवळ मॅकडॉव्हेल्सचे पुस्तक पुरेसे नाही. मग चित्ररव शास्त्री, स.ग.डांगे, मॅक्स्युलर यांची पुस्तके वाचली. भा.द.खेर यांची कादंबरी वाचली. या वाचनाने खूप अभ्यास झाला. माझे सासरचे घर म्हणजे जणू काही ग्रंथालयच आहे. सासरी आल्यावर लक्षात आले या घरची मंडळी खूप वाचतात. तेव्हा आपणही वाचावे असे वाटू लागले. त्यानंतर मी गंभीरपणे वाचू लागले. माझ्या वाचनाचा वेग वाढला. सुरुवातीला मी खूप ललित साहित्य वाचले. शांताबाई शेळके, अरुणा ढेरे, इंदिरा संत यांचे साहित्य वाचले. कालांतराने पतीने समजावल्यावर ललित वाचन कमी करून वेगळे साहित्य वाचायला सुरुवात केली.
सिंघानिया शाळेत संस्कृत शिकवत असल्यामुळे त्या वेळी वाचन खूप झाले. व्याख्यानाच्या निमित्ताने खूप वाचन होते. कारण आपल्याला ऐकत असलेला श्रोता हुशार असतो. व्याख्यानात संदर्भ द्यावे लागतात. त्यासाठी अवांतर वाचन होते. भास आणि कालिदास याशिवाय संस्कृतला पर्याय नाही. त्यामुळे हे साहित्यही खूप वाचले. या वाचनामुळे माझे वेगळे मत तयार होते आणि ते व्याख्यानात मांडते. नामदेवगाथा मी पूर्ण वाचलेली आहे. मानसी वाढवे, डॉ. हे.वी. इनामदार यांची पुस्तके वाचण्यासारखी आहेत. पंढरपूरचे प्रा. निकते यांची भाषा अधिक प्रभावी आणि प्रवाही आहे. सुरुवातीला ललित वाचनाची माझी आवड अध्यात्माकडे वळली. काही ऐतिहासिक वाचन केले. ज्यातून माहिती उपलब्ध होईल असे वाचन केले. डॉ. अनिल अवचट, प्रकाश नारायण यांचे साहित्य वाचले. कादंबरी वाचायला मला आवडत नाही. जेम बुडार्क यांचे ‘रिजन फॉर होप’, दुर्गाबाईंचे ‘संस्कृतीसंचित’ अशी पुस्तके वाचते. सध्या मासानोवु फुकुओका यांचे नैसर्गिक शेतीपद्धती आणि जीवनदृष्टी यांची ओळख करून देणारे ‘एका कांडातून क्रांती’ आणि २५ समाजसेवकांचे कार्य चतुरंग प्रकाशनने एका पुस्तकात एकत्रित केले आहे ते ‘व्रतस्थ’ अशी पुस्तके वाचत आहे. मी स्वत: पुस्तके खरेदी करतेच, मात्र माझे गुरू डॉ. श्रीराम भातखंडे यांच्याकडील बरीच पुस्तके मला त्यांनी देऊ केली. जी पुस्तके मी केवळ त्यांच्या पुस्तकात पाहायचे ती त्यांनी मला दिली. एकदा यशवंत देव आणि मी गप्पा मारत असताना ओशोंवर बोलत होतो. त्या वेळी त्यांनी त्यांचे पुस्तकांचे कपाट उघडले आणि काही पुस्तके खाली पडली. तेव्हा ही पुस्तके तुझ्यासाठीच पडली असे म्हणत त्यांनी काही पुस्तके मला भेट दिली.
अलीकडेच संग्रहातील पुस्तके संकीर्ण, काव्य, शास्त्र, अभ्यास, पर्यटन अशा वेगवेगळ्या विभागात ठेवलेली आहेत. एखादे पुस्तक सापडले नाही की मी अस्वस्थ होते. ‘रोजेस इन डिसेंबर’ हे मला स्पर्धेत बक्षीस मिळालेले पहिले पुस्तक होते. जे आता माझ्याजवळ नाही. त्यामुळे त्या पुस्तकाची सारखी आठवण होते. मुक्त वाचनाला सध्या वेळ मिळत नाही. सावरकरांवर बोलायचे असल्यास तीच पुस्तके वाचते. त्यामुळे संदर्भासाठी वाचन होते. नीला कोर्डे यांचे कल्पसुमांची माला, महेश एलकुंचवार यांनी राम शेवाळकरांची घेतलेली मुलाखत संवादाचा सुवाबो या पुस्तकात आहे ते पुस्तक, बा.भ.बोरकरांचे चांदणवेल, वृक्षजीवनावर आधारित श्रीकांत इंगळहळीकर यांचे नवा आसमंत, स्वामी विवेकानंदांचे राजयोग, विविध रागांवर डॉ. अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले नादब्रह्म, बाळ सामंत यांचे मर्मबंधातील ठेव, इंग्रजीतील ‘स्टोरी ऑफ फिलोसॉफी’ अशी काही माझ्या आवडीची पुस्तके आहेत.
शब्दांकन – किन्नरी जाधव

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन