लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस पुलाखाली असलेला थांबा सोडून इतर ठिकाणी रिक्षा उभ्या करण्याचे प्रकार काही बेशिस्त चालकांकडून सुरू असून यामुळे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मार्गात रिक्षांचा अडथळा निर्माण होत आहे. तसेच काही रिक्षाचालक ठाण्यात नव्याने येणाऱ्या प्रवाशांकडून जास्त भाडे घेऊन त्यांची लूटमार करीत आहेत.

ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. त्याचा गैरफायदा आता सॅटिस पुलाखाली असलेला थांबा सोडून इतरत्र उभे राहणारे काही रिक्षाचालक घेऊ लागले आहेत. रिक्षा वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी सॅटिस पुलाखाली रिक्षा थांबा उभारण्यात आला आहे. या थांब्यामधून रांगेत प्रवासी घेणे रिक्षाचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र लवकर प्रवासी भाडे मिळावे आणि नव्याने ठाणे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून जादा प्रवासी भाडे आकारता यावे या उद्देशातून काही रिक्षाचालक थांबा सोडून इतरत्र रिक्षा उभी करत आहेत. हे रिक्षाचालक रेल्वेच्या तिकीट खिडक्या, सॅटिसचे जिने, सॅटिस पुलावर उभे राहून प्रवासी भाडे शोधत असतात. हे चालक घोडबंदरच्या दिशेने किंवा त्यापुढे जाणाऱ्या प्रवाशांकडून ४० ते ७० रुपये जास्त घेत आहेत.

आरपीएफकडून कारवाई मात्र परिणाम नाही

रिक्षाचालक रेल्वेच्या हद्दीत शिरल्यास रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली जाते. यापूर्वीही आरपीएफने रिक्षा संघटनांची बैठक घेऊन त्यात रेल्वेच्या हद्दीत शिरण्याविरोधात व त्यांच्या असभ्य वर्तनाविरोधात चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलीस आणि इतर विभागांसोबत बैठक घेऊन या रिक्षाचालकांना आवर घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रिक्षाचालकांकडून सॅटिस परिसरात नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल.

– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.