हुसकावून लावण्यासाठी दिव्यातील स्थानिकांची नवी शक्कल; पोलिसांना काहीच कल्पना नाही
दिवा परिसरात वास्तव्यास असलेले नायजेरियन नागरिक डोईजड होऊ लागल्याने त्यांना आता गावाबाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी स्थानिकांनी नवी शक्कल लढविली आहे. नायजेरियन नागरिकांना घरापर्यंत पोहचण्यासाठी वाहने मिळाली नाहीत तर ते आपोआपच कंटाळून दिवा सोडून जातील, असा स्थानिकांनी अंदाज बांधला असून, त्यासाठी स्थानिक रिक्षाचालकांची मदत घेण्यात येत आहे. त्यास चालकांनी प्रतिसाद देत नायजेरियन नागरिकांना रिक्षामध्ये बसविण्यास बंदी घातली असून, या स्वघोषित बंदीचे पोस्टर्सही काही रिक्षांवर लावण्यात आले आहेत. यामुळे दिव्यात नायजेरियन नागरिकांना रिक्षात ‘नो एंट्री’ असल्याचे चित्र आहे.
दिवा परिसरात वास्तव्यास असलेल्या नायजेरियन नागरिकांची संख्या सुमारे एक हजारांच्या घरात गेली असून, त्यापैकी काही नागरिक बेकायदा वास्तव्य करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. नायजेरियन नागरिक जास्त भाडे देत असल्यामुळे त्यांना वास्तव्यासाठी घरे मिळतात. घरे घेताना ते सोसायटीमधील गच्चीही भाडय़ाने घेतात आणि तिथेच त्यांचा रात्रभर गोंधळ सुरू असतो. दिव्यातील रस्त्यावर नायजेरियन नागरिक बिनधास्तपणे अमली पदार्थ तसेच मद्याचे सेवन करताना दिसून येतात. तसेच या नशेच्या अमलाखाली रात्री उशिरापर्यंत गोंगाट आणि हाणामारी करणे, असे प्रकार त्यांच्याकडून सुरू असतात. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून या नागरिकांची परिसरात दादागिरी वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे अनेक नागरिक घरे खाली करण्यास तयार होत नसल्यामुळे ते नागरिकांसाठी आता डोईजड झाले आहेत, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर दिवा भागातून नायजेरियन नागरिकांना हकलून देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात दिव्यामध्ये निदर्शने करण्यात आली. त्यापाठोपाठ आता नायजेरियन नागरिकांना गावातून पिटाळून लावण्यासाठी रिक्षाचालकांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी नायजेरियन नागरिकांना रिक्षामध्ये बसण्यास स्वयंघोषित बंदी घातली आहे. त्यासाठी दिव्यातील अनेक चालकांनी रिक्षांवर ‘नो एंट्री इन ऑटो’ आणि त्यावर नायजेरियन नागरिकांचा फोटो असे पोस्टर्स रिक्षांवर लावण्यात आले आहेत.

डोकेदुखी वाढली
दिवा परिसरात नायजेरियन नागरिकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे. अमली पदार्थ तसेच मद्याच्या नशेमध्ये या नागरिकांचा रात्रभर गोंधळ सुरू असतो. त्यामुळे या नागरिकांना गावाबाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न सुरू केले असून यातूनच रिक्षाचालकांनी नायजेरियन नागरिकांना रिक्षामध्ये बसण्यास बंदी घातली आहे. प्रवासाकरिता वाहने मिळाली नाही तर ते आपोआपच शहर सोडून जातील, असा दावा रहिवासी विजय भोईर यांनी केला.

नस्ती आफत नको
एखादा नायजेरियन नागरिक रिक्षामध्ये अमली पदार्थची पुडी विसरला किंवा त्याने पोलिसांना पाहून रिक्षातच ती पुडी टाकली, तर त्या गुन्ह्य़ात रिक्षाचालक नाहक अडकेल. त्यामुळे आमच्या सुरक्षेसाठी आम्ही ही बंदी घातली असल्याचे काही रिक्षाचालकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या संदर्भात पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी पोलिसांकडे एकही तक्रार प्राप्त झालेली नाही, मात्र या संबंधीची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.