प्रत्येक रिक्षाचालकाने आपली समग्र माहिती असलेले स्मार्ट कार्ड प्रवासी बसलेल्या दर्शनी भागात लावावे, असा नियम असताना कल्याण, डोंबिवलीतील सर्वच रिक्षांमधून हे स्मार्ट कार्ड गायब झाले आहे. खाकी, सफेद गणवेश परिधान  न करणाऱ्या रिक्षा चालकांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहेत. या मुजोर रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

प्रत्येक प्रवाशाला आपण ज्या रिक्षातून प्रवास करतोय त्या रिक्षेचा क्रमांक, चालकाचे नाव, त्याचा वाहन परवाना क्रमांक, भ्रमणध्वनी, तो कोणत्या वाहनतळावर रिक्षा प्रवासी वाहतूक करतो, अशी समग्र माहिती एका पुठ्ठय़ावर लिहून ती माहिती लॅमिनेट करून चालकाने प्रवासी बसतो त्याच्या समोरील जागेत लावायचे आहे. दोन वर्षांपूर्वी हा कायदा आल्यानंतर तातडीने रिक्षा चालकांनी अशा प्रकारची स्मार्ट माहिती रिक्षात लावली होती.    समग्र माहिती रिक्षेत असल्याने चालकाला वाढीव भाडे घेणे, प्रवाशांनी भाडय़ावरून वाद घालणे असे प्रकार करता येत नव्हते.  रात्रीच्या वेळेत रिक्षा चालकाने काही गैरप्रकार केला तर तातडीने त्या माहितीच्या आधारे महिला प्रवाशाला तातडीने त्या रिक्षा चालकाची माहिती जागीच उपलब्ध होत होती. दिल्लीत निर्भया घटना, ठाण्यात रिक्षा चालकांकडून महिलांच्याबाबतीत गैरप्रकार लक्षात घेऊन चालकांना ही माहिती रिक्षात उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले होते. ही माहितीच गायब झाल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.  याशिवाय बहुतांशी रिक्षाचालक गणवेश परिधान न करता प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यांच्याकडे ही वाहतूक, आरटीओ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.