ठाण्यात रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी रिक्षा चालक-मालक संघटनेने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ठाण्यातील नागरिकांना प्रवासाचा त्रास होऊ नये. यासाठी परिवहन सेवेच्या शंभर बसेस ठेवण्यात आल्या होत्या. बुधवार मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी पालिका प्रशासनाविरोधात संपाच हत्त्यार उपसले.

पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षकांचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील गावदेवी परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्याच्या अंगरक्षकाच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.

ठाण्यात फेरीवाल्यांवर कारवाई करताना पालिका उपायुक्त संदीप माळवी याना झालेल्या मारहाणीनंतर पालिका आयुक्तांनी फेरीवाल्याविरोधात मोहीम उघडली होती. कारवाईमध्ये पालिका प्रशासनाकडून फेरीवाले आणि रिक्षाचालकांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मुंबई-ठाण्यातील रिक्षा संघटना आणि फेरीवाल्यांच्या संघटना एकवटल्या होत्या. पोलीस पथक आणि खाजगी बाऊन्सर्स घेवून मारहाण करुन दहशत पसरविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी मोर्चा काढण्यात आला होता.

सन्मानाने व्यवसाय करता यावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने फेरीवाला धोरण नेमून दिले आहे. परंतु याची अंमलबजावणी होत नाही, याउलट पालिका प्रशासन प्रत्येक फेरीवाल्याकडून २० रुपये शुल्क वसूल करते. या पावतीवर पालिका आयुक्तांसह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाते. तेव्हा, दुर्दैवाने ज्या फेरीवाल्याच्या पावतीवर यांचा उदरनिर्वाह होतो.  त्याचाच उदरनिर्वाह हिसकावण्याचे प्रयत्न सुरु आहे, असा आरोप कामगार नेते रवी राव यांनी केला होता.

फेरीवाल्यांना मैदान खुले?