इंदिरा चौकात  रिक्षांच्या रांगा
चौक वाहतूक कोंडीच्या विळख्यात; वाहतूक पोलिसांकडून अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे तुणतुणे

डोंबिवली पूर्व भागातील इंदिरा चौकात चार रागांमध्ये रिक्षा उभ्या करण्यात येत आहेत. त्यातच बाजीप्रभू चौकातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीत जाणाऱ्या रिक्षांच्या रांगेचे शेवटचे टोक इंदिरा चौकात येत आहे. इंदिरा चौकातून केळकर रस्त्याने येणारी वाहने मानपाडा, टिळक रस्त्याकडे जातात. या घुसमटीत गेल्या काही महिन्यांपासून इंदिरा चौक वाहतूक कोंडीने गजबजून गेला आहे.
इंदिरा चौकाच्या बाजूला महापालिका कार्यालयालगत कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बसेस, कल्याणकडे जाणाऱ्या रिक्षा रस्त्यावर उभ्या असतात. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत खासगी कंपन्यांच्या बस फडके ररस्त्याने या चौकातून बाहेर पडतात. या चौकाला लागूनच पनवेल बसचा थांबा आहे. संध्याकाळी सातनंतर पनवेल बस थांब्याला उभी असली की पाठीमागे रिक्षांच्या रांगा लागतात. त्यामुळे बाजीप्रभू चौक, केळकर रस्ता, टिळक रस्त्याने येणारी सर्व वाहने इंदिरा चौकात अडकून पडतात. सायंकाळी सातनंतर या भागात एकही वाहतूक पोलीस किंवा वाहतूक रक्षक नियोजनासाठी उभा नसतो. त्यामुळे नेहमीच इंदिरा चौकात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ‘आमच्याकडे पुरसे कर्मचारीच नाहीत. आम्ही काय करणार’ असे साचेबद्ध उत्तर वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. अनेक प्रवाशांनी इंदिरा चौकातील ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.
वाहतूक पोलीस आणि आरटीओने संयुक्तपणे रिक्षा चालक शिस्तीत वाहनतळावर उभे राहतात का? ते गणवेशात आहेत का? त्यांच्याकडे रिक्षेची कागदपत्र आहेत का? याची चाचपणी केली तर बेकायदा रिक्षा चालक रस्त्यावर येण्याचे थांबेल, असे काही चांगल्या चालकांकडून सांगण्यात येते.

भंगारातील रिक्षाही संध्याकाळी रस्त्यावर..
भंगारात गेलेल्या रिक्षा काही चालक संध्याकाळच्या वेळेत प्रवासी वाहतुकीसाठी बाहेर  काढतात. संध्याकाळच्या वेळेत ‘आरटीओ’ अधिकारी फिरकण्याची शक्यता नसल्याने हे रिक्षा चालक नियमाप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी बाद झालेल्या रिक्षा रस्त्यावर आणत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी आठवडय़ातून एक ते दोन वेळा अचानक कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील रिक्षा चालकांच्या कागदपत्रांची तपासणी केली तर निम्मे रिक्षा चालक घरी पळून जातात किंवा लपून बसतात, असे रिक्षा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.