News Flash

दोन लाखांचा ऐवज परत करणाऱ्या रिक्षाचालकाचा सत्कार

जग्यासी भाडे घेऊन गोडसे यांच्या घराकडून पुन्हा रेल्वे स्थानकाकडे आले.

 

बेशिस्त वर्तणूक आणि उद्दामपणामुळे कल्याण, डोंबिवलीतील रिक्षाचालक सतत प्रवाशांच्या टीकेचे धनी होत असताना डोंबिवलीतील जग्यासी जैस्वाल या रिक्षाचालकाने एका प्रवाशाचा रिक्षात विसरलेला दोन लाखांचा ऐवज परत केला आहे. या रिक्षाचालकाचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्या हस्ते सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

‘सगळे रिक्षाचालक बेशिस्त, उपद्रवी नाहीत. चार ते पाच जणांमुळे नाहक अन्य चालक बदमान होतात. जे प्रामाणिकपणे प्रवासी वाहतूक करतात, त्यांच्यातील प्रामाणिकपणाची भावना वाढीस लागावी म्हणून चालक जग्यासी यांचा सन्मान करण्यात आला. रिक्षा चालविणे हा पैसे कमविण्याचा मार्ग असला तरी तो एक व्यवसाय आहे, याचे भान चालकांनी ठेवणे आवश्यक आहे. या व्यवसायात प्रामाणिकपणे राहिले तर तेथेही सन्मान होऊ शकतो, याची जाणीव रिक्षाचालकांना व्हावी’, असे नाईक यांनी सांगितले. आरटीओ कार्यालयातील सन्मानाच्या वेळी साहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी आय. एच. मासुमदार उपस्थित होते.

विलास व पूर्वा गोडसे हे दाम्पत्य डोंबिवली पश्चिमेतील पं. दीनदयाळ रस्त्यावरील रिक्षा वाहनतळावर जग्यासी यांच्या रिक्षात बसले. गोडसे यांनी साहित्य रिक्षातील आसनाच्या पाठीमागील जागेत ठेवले. आपल्या घराजवळ उतरल्यानंतर गोडसे कुटुंब रिक्षाच्या पाठीमागील कप्प्यात ठेवलेली पिशवी काढण्यास विसरले. घरात गेल्यानंतर १ लाख ८० हजारांचे सोने व दहा हजार रुपये रोख, भ्रमणध्वनी व अन्य ऐवज असलेली पिशवी रिक्षात विसरल्याचे गोडसे यांच्या लक्षात आले.

जग्यासी भाडे घेऊन गोडसे यांच्या घराकडून पुन्हा रेल्वे स्थानकाकडे आले. दरम्यानच्या काळात जग्यासी यांच्या रिक्षात बसलेल्या एका प्रवाशाने जवळील आंब्याची पेटी पाठीमागील जागेत ठेवली. ही पेटी गोडसे यांच्या दागिने असलेल्या व भ्रमणध्वनीवर ठेवण्यात आली. त्यामुळे भ्रमणध्वनी बंद पडला. तो प्रवासी सोडून आल्यानंतर जग्यासी यांनी घरी जाण्याची तयारी केली. रिक्षात काही नाही ना म्हणून चाचपणी करीत असताना जग्यासी यांना पाठीमागील बाजूस पिशवी आढळून आली. ती पिशवी त्यांनी रिक्षाचालक-मालक संघटनेचे चिटणीस शेखर जोशी, कैलास यादव यांच्या स्वाधीन केली. दरम्यानच्या काळात गोडसे दाम्पत्य रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा संघटनेच्या कार्यालयात आले. तेथे त्यांनी कैलास यादव यांच्याकडे ऐवज रिक्षात विसरल्याची तक्रार केली. जग्यासी तेथे हरवलेला ऐवज घेऊन आले होते. ही पिशवी विष्णूनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोडसे दाम्पत्याकडे सुपूर्द केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:54 am

Web Title: auto rickshaw driver return of two lakhs
Next Stories
1 शहरबात- कल्याण : ‘पारदर्शक’ व्यवस्थेचे मारेकरी
2 वसाहतीचे ठाणे : चार इमारतींचे टुमदार संकुल
3 आठवडय़ाची मुलाखत : लोकसहभागामुळे वनांना पुन्हा बहर!
Just Now!
X