20 February 2019

News Flash

तीन आसनी रिक्षात पाच प्रवासी

एखाद्या चौकात वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूअसल्याची महिती रिक्षाचालक एकमेकांना देतात.

(संग्रहित छायाचित्र)

ठाण्यात शेअर रिक्षाचा प्रवास धोकादायक; नियमांचे सर्रास उल्लंघन

ठाणे : तीन आसनी रिक्षात चार-पाच प्रवासी कोंबणे, प्रचंड वेगात रिक्षा चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे, गणवेशाचे नियम न पाळणे असे नियमांचे उल्लंघन ठाण्यातील रिक्षाचालक सर्रास करू लागले आहेत. त्यांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलीस सरसावले आहेत, मात्र तरीही त्यांचा डोळा चुकवून ही बेकायदा वाहतूक केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात जाण्यासाठी लोकमान्यनगर, वर्तकनगर, किसननगर, मानपाडा अशा शहराच्या अंतर्गत भागांतून शेअर रिक्षांची वाहतूक सुरू असते. सकाळी आणि सायंकाळी या परिसरातून स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने शेअर रिक्षा मोठय़ा प्रमाणात चालवल्या जातात. सकाळी कार्यालयात जाणारे प्रवासी या शेअर रिक्षा थांब्यावर भलीमोठी रांग लावतात. जवळपास सर्वच रिक्षाचालक एकाच वेळी चार ते पाच प्रवाशांची वाहतूक करतात.

अशा प्रकारे अतिरिक्त प्रवासी रिक्षात बसवले जाऊ नयेत यासाठी शहरातील महत्त्वाच्या नाक्यांवर वाहतूक पोलीस तैनात असतात. रिक्षाचालक भक्ती मंदिर मार्गे सेवा रस्त्याच्या दिशेने जातात. नितीन कंपनी पुलाजवळ वाहतूक पोलिसांची सातत्याने कारवाई सुरूअसते. प्रवाशाला लोकमान्यनगर परिसरातून नितीन कंपनीपर्यंत जायचे असल्यास वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी काही रिक्षाचालक पाच जणांचे भाडे घेऊन दोन प्रवाशांना पुलाच्या अलीकडे उतरवतात. तसेच सायंकाळी स्थानक परिसरातून पाच जणांचे भाडे घेऊन आलेले रिक्षाचालक नितीन पुलाच्या अलीकडे प्रवाशांना उतरवतात आणि पुलाच्या पलीकडे चालत यायला सांगतात. पुलाच्या पलीकडे रिक्षा थांबवली जाते. हे चालत आलेले प्रवासी पुन्हा रिक्षात बसल्यावर ही पाच जणांची बेकायदा प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू होते.

किसनगर, मानपाडा अशा शहराच्या अंतर्गत भागांत ही धोकादायक वाहतूक बिनदिक्कत सुरू असते. महिला रिक्षाचालकही नियमांचे उल्लंघन करत आपल्या बाजूला आणखी एका महिलेला बसवत चार प्रवाशांचे भाडे घेत वाहतूक करतात, असे लोकमान्यनगर येथील प्रवासी नेहा पवार यांनी सांगितले.

‘टिप’ मिळताच मार्गात बदल

एखाद्या चौकात वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूअसल्याची महिती रिक्षाचालक एकमेकांना देतात. अशा प्रकारे ‘टिप’ मिळताच रिक्षाचालक नेहमीचा मार्ग बदलून अन्य मार्गावरून वाहतूक करतात, मात्र त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो, असे शेअर रिक्षाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

मद्यपी रिक्षाचालकांचा त्रास

दिवसेंदिवस रिक्षांच्या संख्येत वाढ होत असून प्रत्येक रिक्षाचालकावर लक्ष ठेवणे वाहतूक पोलिसांसाठीही अवघड होत चालले आहे. काही रिक्षाचालक मद्यपान करून रिक्षा चालवतात. सिग्नल न पाळणे, अतिवेगात रिक्षा चालवणे अशी कृत्ये या मद्यपी चालकांकडून केली जातात. अतिरिक्त प्रवासी बसलेले असताना वेगात रिक्षा चालवल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

First Published on October 12, 2018 3:38 am

Web Title: auto rickshaw drivers carry five passengers in thane