ओला-उबरला प्रतिबंध करणारे फलक कायम; कारवाईसाठी पालिकेकडे बोट

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ओला, उबर, मेरू, टॅब-कॅब या खासगी प्रवासी वाहतुकीला प्रतिबंध आहे, अशास्वरूपाच्या दिशाभूल करणाऱ्या फलकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावाने प्रवाशांची आणि नागरिकांची फसवणूक करणाऱ्या फलकांवर कारवाईची अपेक्षा असताना यासंदर्भात केवळ महापालिकेला कळवून उपप्रादेशिक परिवहन विभागाने बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

कल्याण स्थानकातून लांबपल्ल्याच्या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची अडवणूक करण्यासाठी येथील रिक्षा संघटनांनी ओला, उबर, मेरू यासारख्या खासगी टॅक्सी सेवेला कल्याण स्थानक परिसरात प्रवेशबंदी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावाने या सूचना लावण्यात आल्या असून, कल्याण पश्चिमेकडील वेगवेगळ्या ठिकाणी हे फलक लावले आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या कोणत्याही सहमतीशिवाय हे फलक लावले असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रवाशांची दिशाभूल करणारे हे फलक तत्काळ हटवण्याची गरज असताना परिवहन विभागाने हे फलक हटवण्याचे पत्र महापालिका प्रशासनाला दिले आहे. महापालिका प्रशासनानेही परिवहनच्या पत्राकडे कानाडोळा करत रिक्षाचालकांच्या मुजोरीला साथ दिल्याचा आरोप होत आहे.

ओला-उबरसारख्या खासगी प्रवासाची सेवा देणाऱ्या वाहनांना प्रवाशांची चांगली पसंती असून त्यामुळे हवालदिल झालेल्या रिक्षाचालकांना प्रवाशांची लूट करता येत नाही. त्यामुळे अशा खासगी वाहतुकीला विरोध करण्याबरोबरच या वाहतुकीविषयी खोटी माहिती देणारे फलक लावले जात आहेत. मीटर रिक्षा, प्रिपेड रिक्षा, महिलांसाठी खास रिक्षा यासारख्या सुविधा देण्यात अपयशी ठरलेले कल्याणचे परिवहन विभाग रिक्षाचालकांच्या या मुजोरीला साथच देत आहेत. यामुळे प्रवाशांची रिक्षाचालकांकडून सुरू असलेली लूट सुरूच आहे, असे  सौरभ मजली या प्रवाशाने सांगितले.

फलक काढणे आमचे काम नाही..

स्थानक परिसरात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावाने लावलेला फलक काढण्यासाठी पालिका प्रशासनाला पत्र पाठवून कळवले आहे. फलक काढणे हे आमचे काम नाही. याप्रकरणी रिक्षा संघटनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई  केलेली नाही. हे फलक पुढील एका दिवसात काढले नाहीत तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून पोलीस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

– नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण