19 February 2020

News Flash

ठाण्यातील चौकांत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून चाचपणी

चौकातून महामार्ग तसेच शहराच्या अंतर्गत मार्गावर जाणारी वाहतूक सुरू असते.

 

 || ऋषीकेश मुळे

ठाणे शहरातील महामार्ग तसेच अंतर्गत मार्गावरील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी या चौकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्याचा विचार सुरू केला आहे.

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी हे तीन प्रमुख चौक आहेत. या चौकातून महामार्ग तसेच शहराच्या अंतर्गत मार्गावर जाणारी वाहतूक सुरू असते. या चौकात मुख्य रस्त्यांसह सेवा रस्त्यांचे एकूण आठ मार्ग येऊन मिळत असून या चौकात सुमारे तीन मिनिटांचा सिग्नल आहे. एका मार्गावरील वाहतूक सुरू असते, त्यावेळेस उर्वरित सात मार्गावरील वाहतूक रोखून धरली जाते. मात्र, तीन मिनिटांचा सिग्नल असल्यामुळे मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागतात. त्याचा परिमाण शहराच्या अंतर्गत मार्गावरील वाहतुकीवर होतो. तीन हात नाका आणि कॅडबरी चौकात सिग्नल यंत्रणा आहे तर नितीन कंपनी चौकात मात्र सिग्नल यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. या ठिकाणी पोलीस वाहतुकीचे नियोजन करतात. सकाळ आणि सायंकाळी या तिन्ही चौकात मोठी वाहतूक कोंडी असते. या तिन्ही चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून या तिन्ही चौकांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्याचा विचार सुरू आहे. ठाणे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांची मध्यंतरी एक बैठक झाली होती. त्यामध्ये या प्रस्तावावर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. या चर्चेनंतर पोलिसांनी चौकातील वाहतुकीचा अभ्यास सुरू केला असून या चाचपणीनंतरच यंत्रणा बसविण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

नितीन चौकात सिग्नल आणखी तीन दिवस नितीन कंपनी चौकातील बंद असलेली सिग्नल यंत्रणा गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा सुरू करण्यात आली असून या बदलामुळे या भागातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हे बदल लागू करण्यात आले होते. मात्र, या बदलाची मुदत आणखी तीन दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे. स्वयंचलित  सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी या चौकातील वाहतुकीचा अभ्यास सुरू असून त्यासाठी या चौकातील सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

यंत्रणेचे स्वरूप

स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे कोणत्या मार्गावर किती वाहने आहेत आणि वाहनांच्या रांगा कुठपर्यंत गेल्या आहेत, याचा अंदाज घेऊन वाहतूक सोडली जाणार आहे. यामुळे एखाद्या मार्गावर जास्त वाहतूक कोंडी असेल तर त्या ठिकाणी वाहतुकीसाठी जास्त वेळ सिग्नल सुरू राहणार आहे. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी असेल तर त्या ठिकाणी सिग्नल कमी वेळ सुरू राहतील.

ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे शहरातील चौकांमध्ये स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्याचा विचार आहे. त्यासाठी चौकातील वाहतुकीचा अभ्यास सुरू असून या अभ्यासाच्या निष्कर्षांनंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. – अमित काळे, उपायुक्त- ठाणे वाहतूक शाखा

First Published on September 10, 2019 3:31 am

Web Title: automatic signal system traffic police akp 94
Next Stories
1 नागरी वस्तीत माकडांचा धुमाकूळ
2 शिळफाटा-महापे मार्गावर अवजड वाहतुकीस प्रवेशबंदी
3 पालिका आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणा!
Just Now!
X