16 November 2019

News Flash

शालेय साहित्यावरही ‘अ‍ॅव्हेंजर्स’चा ठसा!

खरेदीसाठी बाजारांमध्ये झुंबड

(संग्रहित छायाचित्र)

मानसी जोशी

शाळांचा हंगाम सुरू होताच मुलांच्या शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी पालकांची बाजारात गर्दी दिसू लागली आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगर येथील बाजारपेठा शालेय साहित्यांनी फुलून गेल्या असून लहान मुलांची दप्तरे, वह्या, पाण्याची बॉटल, छत्री आणि रेनकोट या शालेय साहित्यावर यंदा मोटू पतलू, डोरेमॉन, मिनीयन्स या नेहमीच्या व्यक्तीरेखांसह यंदा अव्हेंजर्समधील पात्रांची छाप दिसून येत आहे.

जून महिना उजाडला असून काही शाळा सुरू झाल्या आहेत तर काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खरेदीला वेग आला आहे. यंदा शालेय साहित्याच्या बाजारात हॉलीवूड पट अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेमचा ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. लहान मुलांच्या शालेय वह्या, कंपास पेटी, पाण्याच्या बाटल्या, डबे आणि रेनकोट यासारख्या साहित्यावर ‘अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेम’ या सिनेमातील पात्रांचा चित्रे असल्याचे पाहायला मिळत आहेत.  शाळकरी मुलेही या चित्रपटाची पात्रांची छाप असलेल्या वस्तूंची मागणी करताना पाहायला मिळत आहे. जगभरात सर्वाधिक गाजलेल्या या सिनेमाच्या शेवटी आयर्न मॅन या पात्राचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदा या पात्राच्या वस्तू सर्वाधिक बाजारात पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या सिनेमातील मुख्य पात्र असलेल्या थानोसच्या हाताच्या पंजाच्या आकारात शार्पनर आणि खोडरबर असलेल्या पेटय़ांनाही पालकांची पसंती मिळत आहे.

पेन्सिल, पट्टी, पेन, वह्या, पाण्याच्या बाटल्या, छत्र्या आणि रेनकोट यावर छोटा भीम, कॅप्टन अमेरिका, मोटू पतलू तसेच शिन चॅन या नेहमीच्या पात्रांची यंदाही छाप आहे. डोरेमॉन, बार्बी, निंजा हातोडी, टॉम आणि जेरी या कार्टूनची चित्रे असणाऱ्या दप्तरांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहेत. ही दप्तरे मुंबईतील धारावी आणि गुजरातच्या कारखान्यात तयार होतात. या  दप्तरांची विक्री प्रति ३०० रुपयांपासून सुरू होत असल्याचे चेतन पुरी या दप्तर विक्रेत्याने सांगितले. यावर्षी ट्रॉली दप्तर हा नवीन प्रकार बाजारात बघायला मिळत आहे. या दप्तराचा वापर ट्रॉलीसारखा करण्यात येतो. दप्तराचे ओझे मुलांच्या पाठीवर पडू नये याकरिता ट्रॉली बॅगला मोठी मागणी आहे. बार्बी आणि किटी या कार्टूनचे चित्र असणारी दप्तरे मुलींमध्ये लोकप्रिय आहेत. या दप्तरांची विक्री किंमत १००० ते १५०० रुपये  एवढी असून आकर्षक रंग आणि कार्टून यामुळे ही दप्तरे लहान मुलांना जास्त पसंतीस उतरत असल्याचेही दप्तर विक्रेत्यांनी सांगितले.

‘कार्टून’मय छत्र्या

पावसाळा सुरू झाल्याने छत्री आणि रेनकोट विकत घेण्यासाठी बाजारात गर्दी होऊ  लागली आहे. यामध्ये पोलका डॉट्स, विविध कार्टून असलेल्या लहान मुलांच्या आकर्षक छत्र्या आणि रेनकोट पाहायला मिळत आहे. या छत्र्यांची विक्री किंमत १५० रुपयांपासून पुढे आहे. दप्तरांचा पाण्यापासून बचाव व्हावा याकरिता विविध आकर्षक रंगांचे पाणीरोधक  कव्हर्स देखील बाजारात उपलब्ध आहेत.

कार्टूनची पात्रांची चित्रे असणाऱ्या लहान मुलांच्या दप्तर, छत्री, रेनकोट यांना मोठी मागणी आहे. सध्या कॅप्टन अमेरिका, थानोस या कार्टूनची चित्रे असणाऱ्या साहित्याची विक्री मोठय़ा प्रमाणावर होत आहे.

– राज सिंग, शालेय साहित्य विक्रेता

First Published on June 15, 2019 12:26 am

Web Title: avengers impression in school literature