एका प्रभागात सरासरी २० हजार मतदार; शहरात मात्र सरासरी मतदारसंख्या ३५-४० हजार

येत्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी पारूप मतदार यादीची घोषणा निवडणूक व्यवस्थापनाने केली असून यानुसार बहुचर्चित दिवा परिसरातील अकरा जागांसाठी सरासरी १८ ते २२ हजार मतदार संख्या असल्याचे स्पष्ट झाल्याने येथील इच्छुक उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ठाणे शहर, कळवा, मुंब्रा तसेच घोडबंदर भागातील प्रभागांच्या तुलनेत दिव्यातील मतदारांची संख्या खूपच कमी आहे. शहरातील इतर भागात चार जागांसाठी सरासरी ३५ ते ४२ हजार इतकी मतदार संख्या असताना दिव्यात मात्र फारच कमी मतदारांचा आकडा असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, ही यादी प्रारूप असल्याने यामध्ये नवीन मतदारांची वाढ होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवक निवडून येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कळवा आणि मुंब्रा भागात जागांची आखणी करत असताना अधिक लोकसंख्येचे निकष ठेवण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. ही प्रभाग रचना सत्ताधारी शिवसेनेच्या सोयीची असल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजपच्या गोटातही नाराजीचा सूर होता. या पाश्र्वभूमीवर जाहीर झालेल्या पारूप मतदार यादीत दिव्यातील प्रभागांमध्ये तुलनेने खूप कमी मतदार

संख्या दिसून आल्याने शहरातील इतर भागातील इच्छुकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकीकडे राजकीय पक्षांकडून निवडणुकीचे ढोल वाजू लागले असतानाच दुसरीकडे महापालिका प्रशासनाने निवडणुकीची पूर्वतयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदार संघाची सुधारित यादी जिल्हा निवडणूक विभागाने दोन महिन्यांपूर्वी महापालिकेला दिली होती. तसेच प्रशासनाने प्रभागांमधील घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण केले होते. या दोन्हींच्या आधारे महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदारांची यादी तयार केली असून यामध्ये एकूण मतदारांची संख्या ११ लाख ४८ हजार इतकी आहे. या यादीनुसार प्रभागातील मतदारांची संख्या ४३ हजार ते २५ हजारांपर्यंत आहे. तर मुंब्रा-दिव्यातील काही प्रभागांमधील मतदारांची संख्या १७ ते १८ हजार इतकी आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

१२ जानेवारीला अंतिम यादी

ठाणे महापालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने प्रभागनिहाय मतदारांची प्रारूप यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार शहरातील एकूण मतदारांची संख्या ११ लाख ४८ हजार ८७० इतकी आहे. त्यामध्ये काही महिन्यांपूर्वी मतदार नोंदणी करणाऱ्या नवीन मतदारांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रारूप यादीतील मतदारांच्या संख्येत पाच ते सहा टक्क्य़ांनी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.